मौन तुझे

बोल एकदा काहितरी रे


मौन तुझे घायाळ करी रे


कातर हळवी सांज गातसे


तरल विराणी दर्दभरी रे


श्रावणातही तळ्मळते मी


झेलुनिया अलवार सरी रे


जाणवते ती तुझी असोशी


इथे दाटतो श्वास उरी रे


देहच उरतो माझ्यापाशी


मन घुटमळते तुझ्या घरी रे


अंतरण्याने अंतर वाढे


मिटव दुरावा हा जहरी रे


पंच्प्राण ज्यांच्यात गुंतले


छेड पुन्हा त्या स्वरलहरी रे

गझल: 

प्रतिसाद

बोल एकदा काहितरी रे
मौन तुझे घायाळ करी रे
(वा..!! सुंदर्...पण तो "ए" गुरू मानतात. मलाही माहिती नव्हते. इथे आल्यवर मार्गदर्शनामुळे समजले.)

श्रावणातही तळ्मळते मी
झेलुनिया अलवार सरी रे (सुरेख..)
पंच्प्राण ज्यांच्यात गुंतले
छेड पुन्हा त्या स्वरलहरी रे (सुंदर, सहज...)

गझल आवडली, सर्वच शेर काबिले तारीफ्..पण जरा ते वृत्त सांभाळा.
पुढील गझल लेखनासाठी मनापासुन शुभेच्छा..!!

देहच उरतो माझ्यापाशी
मन घुटमळते तुझ्या घरी रे
---हा शेर  व श्रावणाचा शेर खास.
जयन्ता५२

स्वागत!
श्रावणाचा शेर मलाही फार आवडला.  तसेच "अंतरण्याने अंतर वाढ"" हा मिसराही सुंदर!
एकूण गझल छान आहे!!

फार आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

छान आवडली...
देहच उरतो माझ्यापाशी
मन घुटमळते तुझ्या घरी रे

अहा....... सुरेखच !!
देहच उरतो माझ्यापाशी
मन घुटमळते तुझ्या घरी रे........ हा शेर खूपच आवडला !

धन्यवाद मित्रांनो! माझ्या गझल प्रकारातील आद्य गुरूंच्या नावाच्या संकेतस्थळावर माझं आणि माझ्या गझलचं स्वागत झालेलं पाहून धन्य झाले!