कितीदा
अता टाळतो मी, बोलणे कितीदा
कुणी ऐकते का ?..... सांगणे कितीदा
कुठे कोण जाणे, हरवले दिवस ते
मला पाहताना, लाजणे कितीदा
कळे ना कधी ही, वाट खिन्न झाली
इथे वेचलेले, चांदणे कितीदा
"कशी तू ?" तसा हा, होय प्रश्न सोपा
"अशी मी.... " तिचे ते, टोचणे कितीदा
उगा संशयाची , भोवती सुई ती
पुन्हा चाळतो मी , वागणे कितीदा
जरा शब्द ओठी, यायचीच खोटी
पदर आवरूनी , खोचणे कितीदा
इथे जन्म घेते, रोज रोज काही
जुने ते नव्याने, चावणे कितीदा
जरी त्याच भिंती, तेच तेच वासे
फुका हे घरांचे, मांडणे कितीदा
अजूनी फुलांची , आस या मनाला
मनाचे मनाशी , भांडणे कितीदा
रिते हात राहो ओंजळी रिकाम्या
नको ते... नको ते... , मागणे कितीदा
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
गुरु, 16/04/2009 - 21:55
Permalink
हा हा
जरा शब्द ओठी, यायचीच खोटी
पदर आवरूनी , खोचणे कितीदा - छान.
सलवार-कुर्ता वाल्यांनी काय करावे?
... आणि हो, जीन्स आणि अर्धवट टॉपवाल्यांची तर पंचाईतच.
कलोअ चूभूद्याघ्या
आनंदयात्री
सोम, 20/04/2009 - 13:48
Permalink
कळे ना कधी
कळे ना कधी ही, वाट खिन्न झाली
इथे वेचलेले, चांदणे कितीदा
सुंदर.....
"कशी तू ?" तसा हा, होय प्रश्न सोपा
"अशी मी.... " तिचे ते, टोचणे कितीदा
एकदम मस्त, सहज...
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!