बेत आहे..!
आज थोडेसे चुकीचे वागण्याचा बेत आहे.
आज तुजला एकट्याने गाठण्याचा बेत आहे.
भेटते मजला पुन्हा ती त्याच त्या वळणावरी का
मज कळेना योग हा की गुंतण्याचा बेत आहे.
अंगणी माझ्या कशाला कवडशांनी फेर धरला
ही तुझी चाहूल की हा चांदण्याचा बेत आहे.
टाकली पेटीत जेव्हा मी जराशी जास्त नाणी
देव वदला, आज भलते मागण्याचा बेत आहे.
एकदा भेटून स्वप्नी एकमेका धीर देऊ
की तुझा ढाळीत अश्रू जागण्याचा बेत आहे.
रोजच्यासम आज मरणा मी तुझ्या स्वाधीन नाही
आज माझाही जरासा झुंजण्याचा बेत आहे.
-- अभिजीत दाते
गझल:
प्रतिसाद
आनंदयात्री
मंगळ, 14/04/2009 - 16:05
Permalink
सुंदर
सुंदर गझल...
सगळी आवडली...
'आज भलते मागण्याचा बेत आहे.' भलते ऐवजी अधिक चपखल शब्द हवा होता (असं मला वाटतं.)
बाकी अभिजीत, तुम्ही दाद द्यावी असंच लिहीता...
शुभेच्छा..
मानस६
मंगळ, 14/04/2009 - 18:09
Permalink
चांदण्याचा बेत आहे..
मतला चांगला आहे..पण २र्या शेरात २रा मिसरा नीट स्पष्ट होत नाही... म्हणजे तुला नेमके काय म्हणायचे आहे ते? फक्त योगायोग हा की, गुंतण्याचा बेत आहे?.. असेच तुला म्हणायचे आहे ना?
चांदण्यांचा बेत आहे.. पण कशाचा?
ही तुझी चाहूल देणे, चांदण्याचा बेत आहे...असे काहीसे केल्यास अधिक सोपे होईल का?
एकदा भेटून स्वप्नी एकमेका धीर देऊ
की तुझा ढाळीत अश्रू जागण्याचा बेत आहे... चांगली कल्पना!
मक्ता कळला नाही..
-मानस६
चित्तरंजन भट
बुध, 15/04/2009 - 20:52
Permalink
की तुझा ढाळीत अश्रू जागण्याचा बेत आहे
एकदा भेटून स्वप्नी एकमेका धीर देऊ
की तुझा ढाळीत अश्रू जागण्याचा बेत आहे.
वाव्वा! फार आवडला. खालच्या ओळीतला टोन, लहजा तर फारच.
शक्य होत असल्यास (तुजला, मजला) जुनी वळणे टाळण्याचा प्रयत्न करायला हवे असे मला वाटते.
ज्ञानेश.
गुरु, 16/04/2009 - 10:04
Permalink
मस्त.
शेवटचे तिनही शेर आवडले.
ही गझल पुर्वी वाचली होती. पण 'चांदण्याचा' शेर तेव्हा खटकला नव्हता.
मानस यांनी केलेल्या सूचनेनंतर ती गडबड लक्षात येते आहे.
एकूण 'गझलवाचन' हे सुद्धा गझललेखनाइतकेच बारकाईने करायचे काम आहे, हे कळले.
पुलस्ति
गुरु, 16/04/2009 - 18:21
Permalink
मस्त
मस्त. झुंजणे आणि देवाचा शेर फार आवडले!!
मानसशी सहमत. हेच मत मी मायबोलीवर नोंदले होते -
"बेत असणे" च्या आधी "कोणाचा" पेक्षा "कशाचा" हे आले तर संदिग्धता कमी होते असे मला वाटते. म्हणून चांदण्याचा आणि बुजगावण्याचा हे शेर थोडे अस्पष्ट वाटतात. चु.भू.दे.घे.
अजय अनंत जोशी
गुरु, 16/04/2009 - 21:52
Permalink
सुंदर
भेटते मजला पुन्हा ती त्याच त्या वळणावरी का
मज कळेना योग हा की गुंतण्याचा बेत आहे. छान.
अंगणी माझ्या कशाला कवडशांनी फेर धरला
ही तुझी चाहूल की हा चांदण्यांचा बेत आहे.
...... मानस६ चे मत आणि दिलेली ओळ पटली नाही.
'पहिली ओळ' ही तुझीच चाहूल आहे की हा चांदण्यांनी केलेला बेत आहे? - व्वा!
एक विनोद : ही तुझी चाहूल की हा नांदण्याचा बेत आहे?
रोजच्यासम आज मरणा मी तुझ्या स्वाधीन नाही
आज माझाही जरासा झुंजण्याचा बेत आहे.
..... भिडले हृदयाला.(मी लावलेल्या अर्थाप्रमाणे...)
(माझे वडीलही झोपेतच गेले.)
कलोअ चूभूद्याघ्या