मयसभा


वाटती दारे तिथे निघतात खिडक्या
जीवनाची मयसभा घेतेय फिरक्या


भेटली नाही तुला स्वप्नात सुद्धा!
काय तू स्वप्नातही घेतोस डुलक्या?


वळण माझे पाहिले तर सरळ होते
घेत होती वाट पण पायात गिरक्या


कातडी सोलून काढा पाहिजे तर
पण नका चघळू मला मारीत मिटक्या


न्याय मागायास का गेलास वेड्या?
कायदा देईल आता रोज धमक्या


सोडता उश्वास तू ... उध्वस्त झालो
कोण सावरणार जर भिंतीच पडक्या?


अंगणी माझ्या कुणी रुजलेच नाही
जाउदे! त्यांच्या बिया असणार किडक्या


कोण वाजवणार आता टाळ चिपळ्या?
बडवितो जो तो इथे अपुल्याच टिमक्या


माणसे सारी वळूगत माजलेली
वाटतो त्यांच्यापुढे तर शांत 'डुरक्या'

गझल: 

प्रतिसाद

वा.............................
भेटली नाही तुला स्वप्नात सुद्धा!
काय तू स्वप्नातही घेतोस डुलक्या?
मस्त कल्पना....
वाटती दारे तिथे निघतात खिडक्या
जीवनाची मयसभा घेतेय फिरक्या
झकास मतला....
अभिनंदन आणि शुभेच्छा!!

 
अंगणी ....
अंगणी माझ्या कुणी रुजलेच नाही
जाउदे! त्यांच्या बिया असणार किडक्या
भेटली नाही तुला स्वप्नात सुद्धा!
काय तू स्वप्नातही घेतोस डुलक्या?

मिल्या, एकंदर गझल चांगली झाली आहे.
भेटली नाही तुला स्वप्नात सुद्धा!
काय तू स्वप्नातही घेतोस डुलक्या?
वा! कल्पना आवडली. शेवटचा शेर नसता तरी चालून गेले असते असे वाटते.


भेटली नाही तुला स्वप्नात सुद्धा!
काय तू स्वप्नातही घेतोस डुलक्या?   - हा हा हा  (एसी मध्ये बसला असेल किंवा 'बॉस'ची भीती वाटत असेल.)
कलोअ चूभूद्याघ्या

प्रतिक्रियांबद्दल खूप धन्यवाद