जगून काय साधले

 



जगून काय साधले विचारतोस जीवना
निदान तू तरी असे म्हणू नकोस जीवना


अजून वाटते नवल कसा असेल तो बहर
स्मरून ज्यास तू असा तरारतोस जीवना


मला नकोत हे तुझे जगावरील तोडगे
मला हवा तुझ्यावरी उपाय ठोस जीवना


अरे तिला विचार ना , तिनेच हात सोडले
पुन्हा पुन्हा मलाच का सतावतोस जीवना


जरा कुठे स्वतःस मी तजेलदार वाटतो
जुन्या दम्यापरी कसा बळावतोस जीवना


गरीब माणसांहुनी गरीब वाटतोस तू
नवी उमेद ही कुठून आणतोस जीवना


पुरेल का खरेच ही उरामधील धुगधुगी
अजून वेस दूर ती हजार कोस जीवना

गझल: 

प्रतिसाद

जरा कुठे स्वतःस मी तजेलदार वाटतो
जुन्या दम्यापरी कसा बळावतोस जीवना .. क्या बात है!!
गरीब माणसांहुनी गरीब वाटतोस तू
नवी उमेद ही कुठून आणतोस जीवना ... वा!!


पुरेल का खरेच ही उरामधील धुगधुगी
अजून वेस दूर ती हजार कोस जीवना!! .. अतिशय सुंदर!-मानस६




अजून वाटते नवल कसा असेल तो बहर
स्मरून ज्यास तू असा तरारतोस जीवना


क्या  बात  है!
वैभव जी, नतमस्तक! काय लिहीता हो तुम्ही. ग्रेट... खरोखर ग्रेट!! 
मला नकोत हे तुझे जगावरील तोडगे
मला हवा तुझ्यावरी उपाय ठोस जीवना.. कसला शेर आहे.


अरे तिला विचार ना , तिनेच हात सोडले
पुन्हा पुन्हा मलाच का सतावतोस जीवना..
तिनेच  हात "सोडला" पाहिजे  होते का? असो. त्याने  काही  फरक  पडत  नाही.
मस्त  शेर. ठासून  वैताग  भरलेला.


जरा कुठे स्वतःस मी तजेलदार वाटतो
जुन्या दम्यापरी कसा बळावतोस जीवना..
खूप  दिवस  आठवत  राहतात  असे  शेर.
.
.
.
.
.
तुमचे  खूप  खूप  आभार.

उपाय आणि दमा शेर तर फार फार आवडले!

मला नकोत हे तुझे जगावरील तोडगे
मला हवा तुझ्यावरी उपाय ठोस जीवना
वाव्वा...

जरा कुठे स्वतःस मी तजेलदार वाटतो
जुन्या दम्यापरी कसा बळावतोस जीवना
वाव्वा.. फारफार आवडले. नेहमीप्रमाणे दमदार गझल आहे.

अरे तिला विचार ना , तिनेच हात सोडले
पुन्हा पुन्हा मलाच का सतावतोस जीवना
मला नकोत हे तुझे जगावरील तोडगे
मला हवा तुझ्यावरी उपाय ठोस जीवना
जुन्या दम्यापरी ..... जीवना - कॉम्बीनेशन विशेष पटले नाही.
कलोअ चूभूद्याघ्या

दमा, उपाय्.......खासच !!

काफिये आवडले....
वाह गुरूजी....

पुरेल का खरेच ही उरामधील धुगधुगी
अजून वेस दूर ती हजार कोस जीवना
व्वा !