डोळे नाही दृष्टी


एका रेषेचं जसं सौंदर्य आहे, तसं एका ठिपक्याचंही सौंदर्य आहे. तपशीलाचं, पसा-याचं एक सौंदर्य आहे, तसं दृष्टांताचंही आहे. निरुपणाचं सौंदर्य आहे, तसं सूडाचंही आहे. विराटाचं आहे, तसं सूक्ष्माचंही सौंदर्य आहे. या टोकाच्या प्रकृतीचं सौंदर्य, महत्त्व आणि प्रासंगिकता स्थल-कालसापेक्ष असू शकते.आजचा काळ फार बोलतोय, फार बडबड करतोय, फार वाचाळ आणि तोंडाळ आहे. त्याच्या वाचळपणाचं, तोंडाळपणाचं, बडबडण्याचं काय करायचं, याचा काटेकोर विचार आज कवितेने करायला हवा. काळ जे काही बडबडतोय त्यातलं व्यापक आणि पोषक असेल तेच कवितेने अधोरेखीत करायला हवं. कविता काळाचा हा तोंडाळपणा, वाचाळपणा सरसकट स्वीकारणारीही असते आणि त्याचा नीर-क्षीर विवेकानं विचार करणारीही असते. काळाचा वाचाळपणा सरसकट स्वीकारणारी कविता स्वत: धापा टाकत मोडकळीस येते आणि वाचकाची, रसिकाचीही कंटाळवाणी दमछाक करते. या वाचाळपणाला शरण जाते ती कुठल्याही प्रकारातली कविता असू शकते; पण काळाच्या वाचाळपणाला शरण न जाता त्याच्या बोलण्यातलं अर्थपूर्ण आहे तेवढंच अचूक टिपणारं काव्य म्हणजे गझल. आज सातत्याने माहितीचा स्फोट होतोय. मानव समूह आणि समाजाचं आदान-प्रदान वाढतंय. ज्ञानाच्या शाखा-प्रशाखांचा पसारा वाढतोय. सर्व जीवन व्यवहार हे आधीच्यापेक्षा गुंतागुंतीचे तर झालेच आहेत; पण ते बहुआयामी व बहुकेंद्रीही झालेत. आज ज्या वेगाने आणि ज्या प्रमाणात मानव, जीवन आणि विश्व यांची नवी नवी रूपे प्रकट होत आहेत, ती गद्याच्या तपशीलातून जाणून घेणं ही एका बाजूने दमणूक करणारी, तर दुस-या बाजूने भ्रमिष्ट करणारी गोष्ट ठरू शकते. आजच्या माहिती आणि ज्ञानाच्या युगाने सगळ्याच गोष्टींचं डिटेलिंग भयंकर वाढवलंय. हा डिटेलिंगचा भार कविता आज पेलू शकेल, असं वाटत नाही. हे डिटेलिंग म्हणजेच तपशील निदान आजतरी आकर्षक वाटतायत, कधी कधी महत्त्वाचेही वाटतायत, म्हणून ते जवळ बाळगावेसेही वाटतायत. जी कविता हा तपशीलाचा भार वाहू लागेल ती जडही होईल आणि ‘जडही’ होईल. गझलचं वेगळेपण इथेच आहे. ती अनावश्यक तपशिलाचा भुसा पाखडून आवश्यक ते सत्त्व निवडू शकते. गझलला जडत्वात रस नाही, तिचा सगळा रोख आणि प्रवास आहे तो ‘चैतन्याकडे’. गझल जडत्वाला टाळणार नाही, पण त्याला ती सोबत घेणारही नाही. तपशीलजन्य कवितेकडे ‘डोळे’ असतात. अशा कवितेला सतत पाहायचंय, खूप काही पाहायचंय आणि जे पाहिलंय त्याचं ‘वर्णन’ करायचंय. गझलला नुसतं पाहण्यापेक्षा किती तरी अधिक ‘जाणायचंय’. जे जाणलंय त्यातही वरच्या श्रेणीचं तिला जाणून घ्यायचं असतं. जे जाणलं ते आणि तेवढंच आरस्पानी सूत्ररूपात मांडणं हेच गझलचं मूलभूत ‘गझलत्व’. गझलकडे जे डोळे आहेत, त्याच्यापेक्षा अधिक भेदक आहे ती तिच्याकडची ‘दृष्टी’.आजच्या नव्या बहुरंगी, बहुढंगी, बहुकेंद्री, बहुपिंडी विश्वाचा अक्राळ-विक्राळ कारभार समजून घ्यायचा असेल, तर तपशिलाचा नाद सोडावाच लागेल. अशा वेळेला नुसतं पाहण्याने ‘कविता’ लाभणार नाही, तर ती जाणणाऱ्या दृष्टीमुळे लाभणार आहे. ही दृष्टी गझलकडे आहे. दृष्टिवान असणं हाच गझलचा मूळ स्वभाव आहे, तीच तिची मूलभूत प्रकृती आहे.आजच्या काळात मराठीत वाटचाल करणारी गझल आपल्या या प्रवृत्तीमुळे मराठी कवितेत आपली लखलखीत, तेजस्वी मुद्रा उमटवू शकते. भरलेल्या आणि भारलेल्या आभाळातच तेजस्वी वीज चमकते. आजच्या अनेक शक्तींनी भरलेल्या आणि भारलेल्या काळात मराठी गझलची वीज अशीच चमकेल.

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

फारच सुंदर लेख!
दृष्टिकोन देणारा!