आठवणीला येई डुलकी...!

.....................................
आठवणीला येई डुलकी...!
.....................................

कधी लागतो ठसका़; उचकी कधी कधी !
तुझी आठवण येते इतकी कधी कधी !

सावध असतो तरी फसवते कशी मला -
- तुझी धोरणी ही आपुलकी कधी कधी !

कधी जगाचा सरळपणाही जोखावा !
चाल करावी मध्येच तिरकी कधी कधी !! 

नको सुखांचा मुसळधार पाऊस मला
सर एखादी यावी हलकी कधी कधी !

जसे वाटते तसे न घडते काहीही...
उरात भरते उगाच धडकी कधी कधी !

दोष असावा तुझ्याच नजरेचा नक्की
उंच माणसे दिसती बुटकी कधी कधी !

सुखे आपली तशी कधी नव्हतीच म्हणा
पण दुःखेही परकी परकी कधी कधी !

त्या वाड्याचे गूढ आणखी वाढवते...
ती उघडी असणारी खिडकी कधी कधी !

वठलेला प्राजक्त कधी येतो स्वप्नी ....
भिंत तेथली आणिक पडकी कधी कधी !

छळ आठवतो शतकांपूर्वी झालेला...
मज आठवते गाथा भिजकी कधी कधी !

तुझा चेहरा कधी दिसे तर कधी पुसे ....
आठवणीला येई डुलकी कधी कधी !

- प्रदीप कुलकर्णी
-------------------------------
`चंदन` या पुलस्ती यांच्या गझलेच्या प्रतिसादात मी सुचविले होते की,  ध्वनिसाधर्म्य असलेली अक्षरे (न-नाही) एकापुढे एक शक्यतो आणू नयेत; संपूर्ण गझलेत तरी. एखाद्या-दुसऱ्या शेरात (अगदीच इलाज नसेल तेव्हा) चालेलही.
आणि हे सुचवीत असतानाच, अशीच `चूक` असलेली माझी ही वर दिलेली गझल (की-कधी) मला आठवत होती. मधल्या काळात मी ती शोधून काढली आणि आज तीच गझल मी इथे सादर करीत आहे. ही गझल १९९७ साली सुचलेली आहे. अधूनमधून काही शेर दुरुस्त केले आहेत; तर काही वाढवलेही आहेत.
आपली गझल उच्चारणसुलभ वगैरे असावी,  `न-नाही`, `की-कधी` अशी `चूक` करू नये, याचे भान त्या वेळी नव्हते.[ (ते आता आता आले आहे. कवित्व कमी झाल्यावर व पांडित्य वाढल्यावर :) असो.]
-------------------------------

 

 

 

 

गझल: 

प्रतिसाद

प्रदीपजी
नेहमीप्रमाणेच सफाईदार गझल.. हलकी सर, वठलेला प्राजक्त आणि डुलकी फार आवडले
 

हे दोन फ़ारच सुरेख

नको सुखांचा मुसळधार पाऊस मला
सर एखादी यावी हलकी कधी कधी !

सुखे आपली तशी कधी नव्हतीच म्हणा
पण दुःखेही परकी परकी कधी कधी !

नको सुखांचा मुसळधार पाऊस मला
सर एखादी यावी हलकी कधी कधी !
वा!

जसे वाटते तसे न घडते काहीही...
उरात भरते उगाच धडकी कधी कधी !
वाव्वा!! ही द्विपदी फारच आवडली 

त्या वाड्याचे गूढ आणखी वाढवते...
ती उघडी असणारी खिडकी कधी कधी !
वाव्वा!!

प्रदीपराव, सगळेच शेर अगदी कसलेले व कसदार आहेत. वरील तीन शेर विशेष आवडले.

धडकी, परकी, खिडकी आणि हलकी हे शेर अतिशय आवडले!

झकास....हे विशेश...
दोष असावा तुझ्याच नजरेचा नक्की
उंच माणसे दिसती बुटकी कधी कधी !
त्या वाड्याचे गूढ आणखी वाढवते...
ती उघडी असणारी खिडकी कधी कधी !

छळ आठवतो शतकांपूर्वी झालेला...
मज आठवते गाथा भिजकी कधी कधी !

तुझा चेहरा कधी दिसे तर कधी पुसे ....
आठवणीला येई डुलकी कधी कधी