...विचार एखादा


असा अचानक समोर येतो विचार एखादा
पुढ्यात यावा जसा जुना सावकार एखादा
 
किती किती जायचे तडे बंद तावदानांना
कुठूनसा शब्द यायचा टोकदार एखादा
 
कधी कधी वाजतात स्फोटांपरी फटाकेही
असेल का त्यातलाच हाही प्रकार एखादा
 
अजूनही सांज व्हायला वेळ केवढा आहे
मिळेल का चेहरा दिवसभर उधार एखादा
 
नभास बिलगून एवढेही रडू नको वेड्या
चुकून जाईल हुंदका आरपार एखादा
 
शरीर वैतागलेच होते जगून आताशा
मनासही पाहिजेच होता नकार एखादा

उगाच शोधत बसू नको त्या चुकार स्पर्शाला
हजार कैद्यांत होत असतो फरार एखादा
 
कधीतरी सूर्य बंड करणार थांबण्यासाठी
किती दिवस राबणार ना कामगार एखादा



गझल: 

प्रतिसाद



नभास बिलगून एवढेही रडू नको वेड्या

चुकून जाईल हुंदका आरपार एखादा  वा!

उगाच शोधत बसू नको त्या चुकार स्पर्शाला
हजार कैद्यांत होत असतो फरार एखादा
वा! क्या बातहै!

वैभव, सुरेख गझल! फार फार आवडली.

वैभव गझल फार आवडली.
चित्तरंजन यांच्याशी सहमत. ते दोन शेर तर अप्रतिम

कधी कधी वाजतात स्फोटांपरी फटाके
 
'फटाके हे' असणार अन चुकून नुसतेच 'फटाके' टाईप झालेले असणार!
 
वैभवजी - मोठ्या माणसांनाही हे प्रश्न भेडसावतातच शेवटी! टायपिंग!
 
मला आपली गझल आवडली!
 
उत्तम! एकावर एक शेर भारी!
 
अजून एक शेर करा!
 
 
 
  

गौतमीजी
फटाके"ही" असं होतं ते , लिहीतराहूराहिल, माफ करा. चित्त , सोनाली . खूप धन्यवाद

 

असा अचानक समोर येतो विचार एखादा
पुढ्यात यावा जसा जुना सावकार एखादा

- छान.
भटसाहेबांचा शेर आठवला ः
टाळले त्याला तरीही गाठले त्याने मला
वागले आयुष्य माझे सावकारासारखे !
............
किती किती जायचे तडे बंद तावदानांना
कुठूनसा शब्द यायचा टोकदार एखादा
- वा.
............
कधी कधी वाजतात स्फोटांपरी फटाकेही
असेल का त्यातलाच हाही प्रकार एखादा
- सुंदर.
............
अजूनही सांज व्हायला वेळ केवढा आहे
मिळेल का चेहरा दिवसभर उधार एखादा
- वा...वा.
............
नभास बिलगून एवढेही रडू नको वेड्या
चुकून जाईल हुंदका आरपार एखादा
- सुरेख कल्पना.
............
शरीर वैतागलेच होते जगून आताशा
मनासही पाहिजेच होता नकार एखादा
- उत्तम.
............
उगाच शोधत बसू नको त्या चुकार स्पर्शाला
हजार कैद्यांत होत असतो फरार एखादा
- वा. मस्त कल्पना.
............
कधीतरी सूर्य बंड करणार थांबण्यासाठी
किती दिवस राबणार ना कामगार एखादा
- हीही कल्पना अफलातून. मस्त शेर. 
एकंदर गझल फार आवडली.  शुभेच्छा.





सगळेच शेर आवडले........


मस्त गझल! शब्द आणि फरार हे शेर तर फार फार आवडले!

सावकार, टोकदार, उधार, आरपार वगैरे सर्व शेर आवडले.
पण,
कधी कधी वाजतात स्फोटांपरी फटाकेही
असेल का त्यातलाच हाही प्रकार एखादा
या शेरात 'हाही प्रकार' याचा संदर्भ लागला नाही. १ल्या ओळीत उदाहरण दिले आहे. तसेच हेही आहे म्हणजे नेमके काय आहे?
कलोअ चूभूद्याघ्या

वैभव,
आप का है अंदाजे बयाँ और!
तुझ्या प्रतिभेला सलाम!

जयन्ता५२

वैभव,
एकदम झकास.
नेमक्या शब्दांतला मतला तर नेहमीचा अनुभव सांगणारा.

सर्वांचे मनापासून धन्यवाद.
अजय
प्रश्न आवडला. कधी कधी फटाकेही स्फोटकांप्रमाणे वाजतात . आज कानावर येणारे आवाज फटाक्यांचेच असू दे अस विशफुल थिंकिंग व्यक्त करण्याचा प्रयत्न होता. तरीही विचार करतो त्या शेरावर.
धन्यवाद

वैभव, सुंदर लिहीता राव  तुम्ही!
सावकार, नकार, फरार, कामगार.. सगळेच  शेर  आवडले.
"जरी  असे  आपल्यापुढे  मी  कमी  तयारीचा...
लिहून  जातोच  शेर  आता  टुकार एखादा !!"
     :)
 
-ज्ञानेश.

वैभव,
तुझ्या समॄद्ध कल्पना-विश्वाला मनापासून दाद द्यावीशी वाटते... 'जियो' एवढेच म्हणतो..

अजूनही सांज व्हायला वेळ केवढा आहे
मिळेल का चेहरा दिवसभर उधार एखादा
 
नभास बिलगून एवढेही रडू नको वेड्या
चुकून जाईल हुंदका आरपार एखादा
 
शरीर वैतागलेच होते जगून आताशा
मनासही पाहिजेच होता नकार एखादा

उगाच शोधत बसू नको त्या चुकार स्पर्शाला
हजार कैद्यांत होत असतो फरार एखादा... वा वा!
मतला भलताच सही आहे.
-मानस६


असेल च्या ऐवजी 'असावा' असे म्हटल्यास तुला अपेक्षित असलेले विशफुल थिंकिंग जास्त स्पष्ट होईल का?
-मानस६

नभास बिलगून एवढेही रडू नको वेड्या
चुकून जाईल हुंदका आरपार एखादा
सुरेख. हा शेर तर अगदी दुष्यंतकुमारच्या आकाशाला सुराख करणार्‍या शेराशी जवळीक साँगणारा आहे. 

उगाच शोधत बसू नको त्या चुकार स्पर्शाला
हजार कैद्यांत होत असतो फरार एखादा
अतीशय सुरेख.

वैभव
नेहमीप्रमाणेच मस्त..
एक शेर असा वेगळा काढताच येत नाही सगळी गझल अतिशय आवडली...

उगाच शोधत बसू नको त्या चुकार स्पर्शाला
हजार कैद्यांत होत असतो फरार एखादा

लयी आवडला... :-)