पसारा !



पसारा !

कधीच हा जन्म खाक सारा झाला !
तरी कुठे गार हा निखारा झाला ?


नकोस काढू पुन्हा फुलांच्या गोष्टी
पहा, पुन्हा हा उदास वारा झाला !


कुणास आता तुझी न वाटे भीती...
तुझा कशाने कमी दरारा झाला ?


समीप येऊ न दें कुण्या लाटेला...
असा कसा कोरडा किनारा झाला ?


जरा कुठे काढले न डोके वर मी
कुणाकुणाचा कुठून मारा झाला !


दिली न वेळेवरी कुणाला ओ मी
कधी न माझा पुन्हा पुकारा झाला !


उगीच मी काळजी जिण्याची केली
कसाबसा शेवटी गुजारा झाला !


पुन्हा अचानक भरून आले डोळे...
पुन्हा अचानक धुरकट तारा झाला !


नको नको ते विचार वाढत गेले...
मनात माझ्या किती पसारा झाला !


- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

क्या बात है!
प्रदीप गझल नेहमीप्रमाणे आवडली.
नको नको ते विचार वाढत गेले...
मनात माझ्या किती पसारा झाला !
फार सुरेख.
सोनाली

दिली न वेळेवरी कुणाला ओ मी
कधी न माझा पुन्हा पुकारा झाला !

..हा शेर सगळ्यात जास्त आवडला.

पुन्हा अचानक भरून आले डोळे...
पुन्हा अचानक धुरकट तारा झाला !
यावरून एक (बहुधा गुलजारचा) शेर आठवला-

जब भी आंखोमें  अश्क भर आए,
लोग कुछ  डूबते नजर आए..

प्रदीप उत्तम गझल. सगळेच शेर आवडले.

उगीच मी काळजी जिण्याची केली
कसाबसा शेवटी गुजारा झाला !
वाव्वा! क्या बात है.

नको नको ते विचार वाढत गेले...
मनात माझ्या किती पसारा झाला !
वाव्वा! अतिशय सुरेख.

हे शेर सध्या गुणगुणतो आहे.

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.

गुजारा आणि तारा हे खासच!
मतला आणि मारा हे शेरही आवडले. गझल सुंदरच!!

व्वा..छानच.....
जरा कुठे काढले न डोके वर मी
कुणाकुणाचा कुठून मारा झाला !

निखारा.. शेर छान. किनारा.. ठीक.
कुणास आता तुझी न वाटे भीती..
तुझा कशाने कमी दरारा झाला ?
पुन्हा अचानक भरून आले डोळे...
पुन्हा अचानक धुरकट तारा झाला !
नको नको ते विचार वाढत गेले...
मनात माझ्या किती पसारा झाला !
वरील तीनही शेरात १ली ओळ जे सांगते तेच २री ओळ सांगते असे वाटते. या दोन ओळीतील आशय एकच गोष्ट सांगतो आहे.
बाकी तुमचे ठेवणीतले शेर छान.
कलोअ चूभूद्याघ्या

प्रदीप जी,
बढीया!

जयन्ता५२

प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे  पुन्हा एकदा मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा. :)

नकोस काढू पुन्हा फुलांच्या गोष्टी
पहा, पुन्हा हा उदास वारा झाला !
मस्त शेर.
समीप येऊ न दें कुण्या लाटेला...
असा कसा कोरडा किनारा झाला ?
छान

जरा कुठे काढले न डोके वर मी
कुणाकुणाचा कुठून मारा झाला !
वाह वाह !
उगीच मी काळजी जिण्याची केली
कसाबसा शेवटी गुजारा झाला !
काळजी करण्याची गरज नव्हती , जगणं घडत गेलं असं म्हणायचं असावं पण मला "कसाबसा" मधे धडपड जाणवली त्यामुळे शेराची लज्जत कमी झाली असे वाटले. आपले मत जाणून घ्यायला आवडेल.  चू. भू. दे. घे.
एकंदर गझल मस्त
 
 

दिली न वेळेवरी कुणाला ओ मी
कधी न माझा पुन्हा पुकारा झाला !
प्रदीपराव सुरेख गझल... अनेक कल्पना नवीन नसल्या तरी अतीशय नेटकेपणाने आणि उत्कटपणे मांडलेल्या आहेत.  कुर्निसात.

उदय



प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

उगीच मी काळजी जिण्याची केली
कसाबसा शेवटी गुजारा झाला !
या शेराविषयी
काळजी करण्याची गरज नव्हती ,
- होय. हे बरोबर.
जगणं घडत गेलं असं म्हणायचं असावं
- नाही. नेमकं उलटं म्हणायचं आहे :)
कसातरी (रडतखडत का होईना) जन्म कडेला गेला, असं म्हणायचं आहे. घडण्यात सकारात्मकता आहे. ती इथे नाही. (पायात त्राण नव्हते तरी पोहोचलो बुवा मुक्कामावर `कसाबसा`, या वाक्यात `कसाबसा`चा जो अर्थ प्रकटेल, तो अर्थ इथे अपेक्षित आहे.)
पण मला "कसाबसा" मधे धडपड जाणवली
- धडपड म्हणजे - उठणे-पडणे, पडणे-उठणे अशी धडपड जाणवली असेल तर योग्यच. पण इथेही लिहिताना  सकारात्मक अर्थ मनात नव्हताच.  (मी) उरकलं आपलं जगणं कसंतरी, किंवा आपोआपही पुढं  सरकत गेलं, असंही म्हणायचं आहे...
माझाच एक जुना मतला होता -
माझ्या मनाप्रमाणे जगलो न फारसे मी !
उरकून टाकले हे जगणे कसाबसे मी !
हा शेर लिहिताना हा मतला डोळ्यांपुढे होता.
त्यामुळे शेराची लज्जत कमी झाली असे वाटले.
- धडपडीमुळे शेराची लज्जत कमी कशी झाली, हे कळले नाही [ (कमी होण्यासाठी शेरात आधी लज्जत होती म्हणायची :) ]
प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार.
 
 
 
 

दिली न वेळेवरी कुणाला ओ मी
कधी न माझा पुन्हा पुकारा झाला
 
हा शेर मस्त झालाय, बाकी सर्व गझल पण सुंदरच

प्रदीपजी,
आवडली गझल..
निखारा, वारा आणि किनारा खूप आवडले...

सगळीच गझल मस्त
पुकारा व पसारा एकदम फ़डाड

गझल चांगली आहेच, पण प्रतिसाद काही कमी मनोरंजक नाहीत : )