कुठे?

फितुर बोले पापणी डोळ्यास शाकारू कुठे?
पावसा वाचू कसा मी, गाल कौलारू कुठे?


झाडताना बाग माळी फेकतो पाने जुनी
या जुन्या प्रेमातल्या खाणाखुणा सारू कुठे?


हा इथे आलो कुठे ही जाग का आली मला?
मी पुन्हा झोपू कुठे अन स्वप्न साकारू कुठे?


काळ गल्ल्यातून बोळातून नेई जन्म हा
मी विचारत राहतो की सांग ना हारू कुठे?


भागवू ताकावरी मी बिंबवी माझ्यावरी
पण तरीही बोच राही, ती कुठे, दारू कुठे?


संत कोणी भेटला तर एवढे पुसणार मी
हात मी मारू कुठे अन लाच मी चारू कुठे?


वाट थोडी पाहुनी फुकटात विकले मी मला
मुल्य यावे एवढा होतोच बाजारू कुठे?


 


 


   


 


 


 

गझल: 

प्रतिसाद

वाट थोडी पाहुनी फुकटात विकले मी मला
मुल्य यावे एवढा होतोच बाजारू कुठे?
हा शेर सगळ्यात आवडला. वा. वा.    'मूल्य' असे असते तरी चालले असते.
खाणाखुणा ...   छान.
स्वप्न आणि संत जुळविलेला वाटतोय.
मतला, काळ, दारू जमलेसे वाटत नाहीत. (म्हणजे मला समजले नाहीत. संदिग्ध वाटतात.)
कलोअ चूभूद्याघ्या

छान वाटली ही गझल.
स्वप्न आणि संत हे दोन्ही शेर जास्त आवडले.

वाट थोडी पाहुनी फुकटात विकले मी मला
मुल्य यावे एवढा होतोच बाजारू कुठे?
हा शेर भावूक करून गेला आम्हाला. परिस्थितीजन्य मानवीय लाचारीची परिसीमा व्यक्त करणारे असे शेर खूप कमी वाचायला मिळतात.

मतला तेवढा कमजोर वाटतोय.

गझलेची सुरूवात धडपडत झाली पण नंतर वळणावर आली असे वाटले.

'बिंबवी, शाकारू' इत्यादी शब्द ह्या गझलेला बोजड झालेयत असेही वाटले.

त्यामुळेच वरील शब्द असणारे शेर म्हणजे जीन्सवर धोतर घातल्यासारखेही वाटले.

पण एकंदर गझल छान झाली आहे असे आमचे मत.
- आपला गझलग्रस्त.

ग्झल खुप्च छान आहे.
शेट्चे २ शेर...वाह वा...

वाट थोडी पाहुनी फुकटात विकले मी मला
मुल्य यावे एवढा होतोच बाजारू कुठे?

वाट थोडी पाहुनी फुकटात विकले मी मला
मुल्य यावे एवढा होतोच बाजारू कुठे?
छान शेर
मूल्य याऐवजी भाव हा शब्द असता तर आणखी प्रभावी वाटले असते.पण शेवटी हे माझे वैयक्तिक मत आहे.

अजय, गझलग्रस्त, अमित व समीर,
मनापासून धन्यवाद!

१. अजय - तिच्यामुळे येणारी नशा लाभत नसल्यामुळे दारुकडे वळलेला कवी म्हणत आहे की हृदयात अजूनही बोच आहेच की ती कुठे अन दारू कुठे! मतला - पापणीचे काम असते अश्रू बाहेर न पडू देणे! पण ती डोळ्याला फितूर झालेली आहे अन कवीला विचारत आहे की डोळ्याला कसे शाकारू? म्हणुन कवी म्हणत आहे की गाल कौलारू असते तर बरे झाले असते. पण हे अर्थातच माझे अपयश! काळ माणसाला कुठुन कुठुन घेऊन जातो. माणसाला काही कळत नाही, फक्त इतके माहीत असते की कुठेतरी जीव सोडावा लागणार! म्हणुन कवी विचारत आहे की 'सांग ना हारू कुठे'. हेही माझेच अपयश! संत व स्वप्न जुळवल्यासारखे वाटणे यात काहीही वावगे नाही. भरतीचे शेर समजले गेल्यास मला राग येणार नाही. प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!

२. गझलग्रस्त - जीनवरचे धोतर आवडले. बोजड अशब्द टाळण्याचा प्रयत्न करीन. आपण भावूक झालात हे मी स्वार्थीपणे माझे यश समजतो. आपले मनापासून धन्यवाद!

३. समीर - 'जबरदस्त' हे विशेषण मी रचलेल्या शेराला पहिल्यांदाच लाभले. धन्यवाद!


वाट थोडी पाहुनी फुकटात विकले मी मला
मुल्य यावे एवढा होतोच बाजारू कुठे?
छान!

मला माझा एक शेर आठवला -
तू माझा म्हणायाला तसे माझे कुणी नाही
बोली लावतो माझीच बाजारात मी हल्ली