सफाई पाहिजे अजुनी

जरा नक्की ठरव आहे हवा की मी नको आहे
नको असलो तुला मी तर मलाही मी नको आहे


'सुगंधी केस वाळावे तिचे नाहून आली की'
सदिच्छा पाहिजे आहे तरीही मी नको आहे


मला होते हवे, मीही हवा होतो मनाला पण
अता ती पाहिजे त्याला जिला की मी नको आहे


कसा माझा हवा आहे तुम्हाला फायदा सांगा
उगा छाती नका ताणू उगा मी मी नको आहे


कशाला मी असावे का असावे वा नसावे मी?
असाही मी नको आहे तसाही मी नको आहे


सफाई मागण्याची मी सफाई मागतो आहे
जगाला पाहिजे आहे सफाई, मी नको आहे


 


 


 



 



 

गझल: 

प्रतिसाद

सफाई मागण्याची मी सफाई मागतो आहे
जगाला पाहिजे आहे सफाई, मी नको आहे
आवडला  शेर.

छान विषय घेतला. पण, व्यक्त होण्यास अजुनी वाव आहे असे मला वाटते.
अजुन एक घ्या...

जिच्या ओठांतुनी येती सदा आवर्तने माझी...
मला माहीत आहे की तिलाही, मी नको आहे
कलोअ चूभूद्याघ्या

सफाई मागण्याची मी सफाई मागतो आहे
जगाला पाहिजे आहे सफाई, मी नको आहे,


सदिच्छा छान आहे.

म्हणजे काय? तो पुरूष नको की ती स्त्री नको? तरी शेवट्च्या २ ओली चांगल्या वाट्ल्यातल.

सन्माननीय अर्चना लाळेजी,
ओली नाहीयेत हो त्या! ओळी आहेत. ( असो. विनोद बाजूला ठेवू )
सदिच्छा! - शेर आपल्याला समजला नाही हे माझे अपयश!
मला असे म्हणायचे होते की ...जाऊदे...
सांगतोच..
ती नाहून आल्यावर आम्ही दोघांनी  मिळून  तिचे ते सुगंधी केस वाळवावेत अशी माझी इच्छा होती ( म्हणजे काय ते सांगणे न लगे ).
पण तिला 'केस वाळावेत' ही माझी सदिच्छा जरी हवी असली तरी मी जवळ नको होतो.
माफ करा, मला शब्दरचना किंवा अर्थ नीट जमला नसल्यास, किंवा या इच्छेला काही अर्थच नसल्यास.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

भूषण,
तुम्ही रचलेल्या ओळी छानच आहेत. पण, माझी एक बदलवजा सूचना
'सुगंधी केस वाळावे तिचे नाहून आली की'
सदिच्छा पाहिजे माझी ...तरीही मी नको आहे
असे केले तर?
या ओळींमधे न समजण्यासारखे काही नाही. फक्त शब्द बदल हवा आहे. आणि...
सदिच्छा पाहिजे हे तर व्यवस्थित आहे.
अर्चनाजी, थोडे समजून घ्या.
कलोअ चूभूद्याघ्या