वायदे करती हजारो

वायदे करती हजारो पाळणारे शोधतो
माणसाला माणसागत मानणारे शोधतो

बोलणारे भेटले अन् ऐकणारे भेटले
बोलल्याविण अंतरीचे जाणणारे शोधतो

दोन शोधा चार मिळती सूख असता सोबती
दु:खही दिसता जरासे थांबणारे शोधतो

बाह्यरुपाला बघोनी लायकी ठरते जिथे
कातडीच्या आतलेही पाहणारे शोधतो

जाहल्या जखमा कहाण्या यातना झाल्या जुन्या
मी नव्याने घाव आता घालणारे शोधतो

नीज येता पाहणे स्वप्ने सुखाने रोजचे
घेउनी स्वप्ने उराशी जागणारे शोधतो

अंत येता ढाळण्याला आसवे कोणी नको
आज मी पार्थिव माझे जाळणारे शोधतो

जगदिश

गझल: 

प्रतिसाद

ही अप्रतिम गझल आहे. स्वागत म्हणजे? ही पहिली गझल आहे? कमाल आहे. अतिशय सुंदर गझल!

बोलणारे भेटले अन् ऐकणारे भेटले
बोलल्याविण अंतरीचे जाणणारे शोधतो    व्वा!
                                        ...........मी सुद्धा शोधतोय.
कलोअ चूभूद्याघ्या

तसे नसेल तर माफी असावी, मला वाटले जगदीश यांची साईट वर ची पहिलीच गझल आहे.

समीर,
आपला गैरसमज झालेला असल्यास माफ करा. मला असे म्हणायचे होते की ही जर पहिली गझल असेल तर खरच कमाल आहे. अतिशय सुंदर गझल आहे. 'ही पहिली गझल आहे असे म्हणणे कमाल आहे' असे म्हणायचे नव्हते.
धन्यवाद!

या साइटवरची माझी ही पहीलीच गझल आहे....
तशा आतापर्यंत ७-८ वेळा गझल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.....
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !

तिलकधारीला ही गझल वाचून आनंद झाला. splendid!

बोलणारे भेटले अन् ऐकणारे भेटले
बोलल्याविण अंतरीचे जाणणारे शोधतो   
हा शेर, मतला फार सुरेख...!!

गझल छान वाटली. अगदी मनातून आल्यासारखी.