कहाणी

कसे  बोलू  जुने  सारे  मला  ते  आठवेनारे
कसे  गाऊ  तसे  गाणे  मला  ते  गाववेनारे


पुन्हा  गोष्टी   पुन्हा  गीते  कशाला  चन्द्र  हा  उगवे?
उशाला  चांदणे  गंधीत  ते ही  प्राशवेनारे


कशाला  बोलणे  काही  कळावे  अर्थ  श्वासांचे
उन्हाने  केतकी  फुलली  झळा  या  सोसवेनारे


कुणाला  सांगते  कोणी  मनोरा  कोसळे  कैसा
निळ्या  उध्वस्त  स्वप्नांचे  ढिगारे  पाहवेनारे


मुक्याने  माळला  चाफा  कसा  हा  गंधही  रुसला
कहाणी  लांबली  इतुकी  मला  ते  साहवेनारे

गझल: 

प्रतिसाद

मला वाटते 'अवेनारे' हाताळताना जड गेले आहे. शोधलेले काफिया चांगलेच आहेत. पण, गाववेनारे जरा जास्तच वाटते. असो. चांगला प्रयत्न.
'अवेनारे' पेक्षा 'एनारे' असते तर अजून सोपे गेले असते. अर्थात हा माझा विचार झाला.

मीही अशाप्रकारे लिहिले होते,
माझ्या कलागुणांची केली कुणी समिक्षा
मागीतलीच नव्हती मी 'ही' कुणास भिक्षा

मी पुढे सर्व पूर्ण केली. पण अशी आठवा-आठवी काही वेळा जड जाते. अर्थात, मी मुळातच जड लिहित असल्याने मला त्याचे काही वाटत नाही.
दुसरे, ४थ्या शेरात निळी स्वप्ने म्हणजे काय म्हणावयाचे आहे?
(बहुतेक कवींची स्वप्ने उध्वस्तच असतात ते सोडून द्या.)
पुन्हा  गोष्टी, पुन्हा  गीते, कशाला  चन्द्र  हा  उगवे?
उशाला  चांदणे  गंधीत  ते ही  प्राशवेनारे                'असुनी' चालेल का?
अर्थ समजतो आहे. पण, 'फोर्स' कमी पडला आहे असे वाटले.

कलोअ चूभूद्याघ्या

अजयचा प्रतिसाद छान आहे. खरच चांगला प्रतिसाद!
सन्माननीय सुनेत्रा सुभाष,
मी प्रथमच म्हणतो की आपल्या गझलेतील आशय बर्‍याच अंशी गझलेसारखा आहे. मनापासून अभिनंदन!
अजय -
पहा, इथे आपण तंत्राबाबतीत बोललात, पण 'गझलचर्चा' मधे आपण जी चर्चा उपस्थित केली आहे त्याचे एक छोटे उत्तर इथे मिळते. थोडेसे अवघड काफिया वगैरे असतील, पण गझलियत मात्र आहेच.
 

मुक्याने  माळला  चाफा  कसा  हा  गंधही  रुसला
कहाणी  लांबली  इतुकी  मला  ते  साहवेनारे
शेर आवडला !

आ.अजय
आ.भूषण
मनापासून  आभार
निळे  याचा  अर्थ  मोरपिसा सारखी  हळूवार.
आपण  दोघेही  जे  काही  मार्गदर्शन  करीत  आहात  त्याबद्द्ल  धन्यवाद.
लवकरच  मीही  आपल्यासारख्या  गझलेचा  आशय  व्यक्त  करणा-या  गझला  लिहीन 
अशी  आशा  वाटते.

निळे  याचा  अर्थ  मोरपिसा सारखी  हळूवार.
कुणाला  सांगते  कोणी  मनोरा  कोसळे  कैसा
निळ्या  उध्वस्त  स्वप्नांचे  ढिगारे  पाहवेनारे
त्याचप्रमाणे, निळे याचा अर्थ 'आकाशासारखा व्यापक' असाही काही अंशी होऊ शकेल.
काही अंशी यासाठी की आकाश रात्री निळे दिसत नाही. आणखीही अर्थ काढता येतील. अनेक अर्थ एकाच ओळीतून निघत असतील तर माझ्या दृष्टीने ते चांगले आहे.
कोणत्याही काव्यासाठी त्याचे तंत्र आणि त्यातील मंत्र बरोबरीनेच चालतात.
'अवेनारे' साठी - नाहवेनारे, चालवेनारे, मागवेनारे, इ.  असे अनेक काफिया घेता येतील याबद्दल शंका नाही. सुनेत्रा हेही व्यवस्थित हाताळतील असे वाटते.
शुभेच्छा!
कलोअ चूभूद्याघ्या

सुनेत्रा हे मला आवडले आहे.
कशाला  बोलणे  काही  कळावे  अर्थ  श्वासांचे
उन्हाने  केतकी  फुलली  झळा  या  सोसवेनारे
इथे प्रतिसादही चांगले आहेत.
मा.अजय, मा. भूषण  आपली इथली मते वाचून चंगले वाटले.

आ.प्रदीप,आ.अर्चना,आ.अजय,
योग्य  प्रतिसादाबद्द्ल   धन्यवाद.
अजय  ,
आपण  सांगितलेला  निळे  याचा अर्थ  मलाही  आवडला, पण  त्यादृष्टीने  मी  त्याचा  कधी  विचारच  केला  नव्हता.आता  या  अर्थानेही  हा  शब्द  नक्कीच  केव्हातरी  वापरायला  हरकत 
नाही.असो  परत  एकदा  धन्यवाद.