स्वप्न एखादे जणू...

चार चौघांसारखे आयुष्य माझे चालले
चार चौघांसारखे त्यालाच मी ही कोसले

स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले

घेतल्या काढून त्यांनी शृंखला पायातल्या
वाटले मी मुक्त झालो; पाय तोवर तोडले

दोष हा त्यांचा कसा? जर टाळले त्यांनी मला
मीच मूर्खासारखे मुद्दे विरोधी मांडले

मी किती ठोठावले पण दार ते उघडेच ना
का असे माझ्यावरी माझेच मन रागावले?

हाय! छळवादी किती आहे सुखाचे फूल हे
मी पुरा कोमेजलो तेव्हाच का ते उमलले?

पत्थराला धडकुनी फुटल्या किती लाटा जरी
भंगले नाही तरी नाते कधी त्यांच्यातले

ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा
पंच, खेळाडू, नियम! सारे तुझ्या गोटातले

गझल: 

प्रतिसाद

स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले
सुंदर...

दोष हा त्यांचा कसा? जर टाळले त्यांनी मला
मीच मूर्खासारखे मुद्दे विरोधी मांडले
वा...वा...वा...

मी किती ठोठावले पण दार ते उघडेच ना
का असे माझ्यावरी माझेच मन रागावले?
छा  न...
हाय! छळवादी किती आहे सुखाचे फूल हे
मी पुरा कोमेजलो तेव्हाच का ते उमलले?
फारच छान...
ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा
पंच, खेळाडू, नियम! सारे तुझ्या गोटातले
जो  र  दा  र... 

नवनव्या कल्पनांनी बहरलेली हिरवीगार गझल...!
शुभेच्छा.

श्री मिल्या,
आपण या साईटवरील एक नंबर गझलकार आहात. आपली गझल मधुनच येते, पण जी येते ती अशी येते की ब्बास्स!
एक एक शेर अप्रतिम!
मला नेहमीप्रमाणे पाय कोणी तोडले अन कोणी टाळले वगैरे असे प्रश्न पडलेच! पण ते खरोखरच गौण आहेत.
अफाट गझल!
अजून लिहा!

आपली ही गझल म्हणजे 'सपाट' गझल कशी नसावी याचे उदाहरण आहे काय? म्हणजे तसे असेल तर मीही प्रयत्न करीन बिचारा!
काही म्हणा, पण ही गझल अक्षरशः सॉलीडच आहे.

कोसले, चालले, मांडले, उमलले असे सगळे चालते का हो?
सिरियसली विचारतोय? मी तसे घाबरून कधी करत नाही.
मी मागे एक फझल केली होती. ( फझल म्हणजे फसलेली गझल..तो माझा एक्सक्लुझिव्ह राईट आहे)
'मतितार्थ सारी शायरी'
ती सध्या 'विचाराधीन' या विभागात 'विराजमान' आहे.
मजा म्हणजे, माझ्या फझलांवरून भलत्यांमधेच भांडणे होतात, मी निवांत विचाराधीन होतो.
त्यात मी 'अ' चा 'आ' केल्यामुळे एक ६४ बिट्स म्हणुन होते ते ऐतिहासिकरीत्या भडकले.
इथे 'आ' चा 'ओ', 'अ' वगैरे झाल्यासारखे वाटले म्हणुन आठवण आली.
आपल्या गझलेचा आशय उत्तमच आहे.

झकास!
नारळ ठेवा खुष व्हा!
 

प्रदीप, भूषण : प्रतिसादाबद्दल खूप आभार
भूषण - अहो मी पण कोणी जाणकार नाही.. तुमच्यासारखाच शिकत आअहे फक्त थोडे आधी शिकायला सुरुवात केली एवढेच...
ह्या गझल मध्ये चालले, कोसले, डोहातले, गोठले असे कवाफी आहेत... ह्या गझल मध्ये रदीफ नाही (गैरमुरद्दफ गझल), "ले" हा न बदलणारा अक्षरसमूह आहे आणि त्याच्या आधीच्या व्यंजनातील स्वर म्हणजे  "अ" ही अलामत  ( कोसले मधला  स, चालले मधला ल आणि गोठले मधला ठ) आहे त्यामुळे अलामत बदलत नाही कुठेच..
मतल्यामध्ये कवाफ़ी सोसले आणि कोसले असे असते  तर ओ ही अलामत झालि असती आणि मग पुढे ती भंगली असती... मग त्या अनुषंगाने पुढे ढोसले, पोसले यायला पाहिजे... भासले चालणार नाही...
जाणकारांनी अजून सांगितले तर नक्की आवडेल...
तुमची विचाराधीन गझल वाचली नाहीये त्यामुळे त्यावर भाष्य करत नाही
 

सुन्दर........
शेर आवडले
मी किती ठोठावले पण दार ते उघडेच ना
का असे माझ्यावरी माझेच मन रागावले?

हाय! छळवादी किती आहे सुखाचे फूल हे
मी पुरा कोमेजलो तेव्हाच का ते उमलले?

पत्थराला धडकुनी फुटल्या किती लाटा जरी
भंगले नाही तरी नाते कधी त्यांच्यातले

ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा
पंच, खेळाडू, नियम! सारे तुझ्या गोटातले

मिल्या,

स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले

मस्तच! हा सानी मतला खूपच मस्त उतरला आहे. त्यामुळे मुळ मतला नसता तरी चालले असते असे वाटले.

एकंदर गझल छान हे वेगळे सांगायलाच नको.

अभिनंदन,
नचिकेत

भूषणजी,

लहान तोंडी मोठा घास घेतो आहे त्याबद्दल आधीच क्षमस्व! पण तुम्ही हा मुद्दा ठिकठिकाणी मांडला आहे व त्यावर चर्चा झालेली दिसली नाही म्हणून माझे मत मांडायचा प्रयत्न करतो. इथल्या जाणकारांचे मत एकायला मिळाले तर उत्तमच!

मला नेहमीप्रमाणे पाय कोणी तोडले अन कोणी टाळले वगैरे असे प्रश्न पडलेच! >>

मला वाटते कवीचा अनुभव/विचार गझलच्या वृत्तादि बंधने असलेल्या form मधे व्यक्त करताना कधी कधी त्या अनुभवामागचे संदर्भ वेगळे करून व्यक्त होणे गरजेचे असावे. म्हणूनच मग 'ते', 'त्यांनी' असे शब्द एखाद्या विशिष्ठ प्रकारच्या व्यक्तिंसाठी किंवा प्रवृत्तिंसाठी शेरांमधे येतात असे मला वाटते.

ह्या संकेत स्थळावर 'सुरेश भटांची गझलः एक संवाद' (http://www.sureshbhat.in/node/40) मधे खालील संवाद आहे.


: तुमच्या गझलांमध्ये 'मी' हा शब्द अनेकदा पुनरावृत्त होतो तो का?
: हा 'मी' पुष्कळदा विश्वव्यापी 'मी' म्हणून येतो. मी स्वतःला वापरतो 'मी' म्हणून. उदाहरणार्थ--
मी कधीचा उभाच फिर्यादी
वाकुल्या दाखवी निकाल मला

: त्यात अशी काही भूमिका असते का, की आपण एका बाजूला व जग विरुद्ध बाजूला?
: जगाला मी माझ्या विरुद्ध समजत नाही.

: मग विरोधी कोण? 'तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे|' यातील 'तुम्ही' नेमके कोण?
: ज्या लोकांचा आयुष्यात कटू अनुभव आला ते. संपूर्ण समाज नाही. एक विशिष्ट वर्ग. त्याच्यासाठी हा शब्द येतो.

: मध्यमवर्गासाठी का?
:
नाही, तसेही नाही. माझे भांडण प्रवृत्तींशी आहे. ज्या वर्गाची
सुखे-समृद्धी इतरांच्या दुःखावर अवलंबून असतात, ज्या वर्गाचा मोठेपणा
इतरांच्या तथाकथित लहानपणावर अवलंबून असतो, ज्या वर्गाची सांस्कृतिक
श्रेष्ठता इतरांच्या वंचितपणावर अवलंबून असते, त्या वर्गाविषयी माझ्या
मनात घृणा आणि द्वेष आहे. निश्चितपणे तिरस्कार आहे.

माझ्या मते, तुम्ही म्हणता त्या प्रमाणेच, 'ते' कोण हा मुद्दा गौण ठरतो व त्या शेरातला विचार महत्वाचा होतो.

~ नचिकेत

अहो नचिकेत साहेब,
क्षमा वगैरे म्हणु नका हो. प्लीज! आपला मुद्दा मला पूर्णपणे मान्य आहे. मी विचारलेल्या प्रश्नामुळे आपल्याला तसदी घ्यावी लागली याबद्दल मीच दिलगीर आहे. ( मनापासून म्हणतोय. )
आपण जे म्हंटले आहेत वा संदर्भ दिले आहेत ते मी वाचले व मला पूर्णपणे पटलेही. खरोखरच आपण उत्तम वेळी अन उचित ठिकाणी ते दिलेत.
उलट आपण ते इथे दिलेत त्यामुळे माझा फायदाच झाला.
मनापासून धन्यवाद!
आणि लहान तोंडी कसले, इथे मीच लिंबू टिंबू कवी आहे. आपण श्री मिल्यांना दिलेला प्रतिसादच आपला अधिकार सिद्ध करतो.
फक्त मला हे आठवत नाहीये की मला त्यावरून नेमकी कसली आठवण झाली ..असो.
आपल्या मैत्रीचा अभिलाषी..
भूषण कटककर!

नचिकेत, दशरथ
अनेक आभार.
नचिकेत : तू भूषण ह्यांना फारच समर्पक उत्तर दिलेस.. आवडले...
 

स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले       
दोष हा त्यांचा कसा? जर टाळले त्यांनी मला
मीच मूर्खासारखे मुद्दे विरोधी मांडले
पत्थराला धडकुनी फुटल्या किती लाटा जरी
भंगले नाही तरी नाते कधी त्यांच्यातले
ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा
पंच, खेळाडू, नियम! सारे तुझ्या गोटातले
वाह!! मस्त गझल, फारच आवडली...नव्या कल्पना, नवे शेर..

स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले
पूर्ण गझल छान आहे.

श्री मिल्या,
आदरासहित मत मांडत आहे.
ही गझल लाजवाब आहेच.
आपण 'अलामतीच्या व्याख्येप्रमाणे' अलामत सांभाळली आहेत हे ही मी वाचले.
पण का कुणास ठाउक, कुठेतरी अडखळल्यासारखे वाटत आहे. आणखीन थोडे मार्गदर्शन किंवा चर्चा व्हावी अशी इच्छा आहे.
'चालले' नंतर 'कोसले' घेताना काहीतरी वेगळेच वाटत आहे. माझ्यामते या गैरमुरद्दफ रचनेमधे अलामत ही 'ले' या अक्षराच्या दोन अक्षरे आधीपासून चालू व्हायला हवी. म्हणजे 'चालले' नंतर 'वाटले', 'काढले', 'सारले' असे यायला हवे असे माझे मत आहे.
आपण स्वतः किंवा कुणी काही सांगीतले तर माझा फायदा होईल.
धन्यवाद!

पत्थराला धडकुनी फुटल्या किती लाटा जरी
भंगले नाही तरी नाते कधी त्यांच्यातले

धडकुनी च्या ऐवजी मला थडकुनी असे सुचवावेसे वाटते...पहा.

घेतल्या काढून त्यांनी शृंखला पायातल्या
वाटले मी मुक्त झालो; पाय तोवर तोडले

भूषण : तुम्हाला अडखळल्यासारखे वाटत आहे कारण इथे कवाफी बर्याच सैल आहेत..
जसे चालले, कोसले, डोहातले फक्त शेवटचे अक्षर 'ल' हे न बदलणारे आहे
जर त्या अजून घट्ट असत्या जसे फाटलेला, छाटलेला, बाटलेला तर तुम्हाला असे वाटले नसते असे वाटते..
बाकी अलामत दोन अक्षरे आधी चालू व्हायला हवी असा काही नियम आहे असे वाटत नाही :)
समीर : थडकुनी बदल चांगला पण धडकुनी चे थडकुनी करून इथे फार काही हासिल होईल असे वाटत नाही.  चु.भु.दे.घे.