तुझी आठवण आली

तुझी आठवण आली



श्रावणधारा.. धरणी भिजली तुझी आठवण आली
खट्याळ वारा पाने हसली तुझी आठवण आली


हिरवळ सजली  तुरे लागले  आनंदाने नाचू
अन् भ्रमराला कळी बोलली तुझी आठवण आली

हत्या, दंगे, जाळपोळ  या  नेहमीच्या बातम्या 
अवचित कानी येता मुरली   ... तुझी आठवण आली


निघून गेला  दिवस  कसा  ते कळले नाही मजला
जशी उन्हे ही  सरू लागली तुझी आठवण आली


दारावरती थाप वाजली.. कंदिल थोडा झुलला
भिंतीवरूनी  छाया  हलली  ..तुझी आठवण आली


काळजात धडधडले माझ्या ..नयनी जमले प्राण
गडगडाट अन् वीज चमकली तुझी आठवण आली


पुढे दरी  ,उंच कडा  मागे... काय करावे आता?
निराशेने सीमा गाठली.. तुझी आठवण आली


कापुसकोंड्याच्या गोष्टीसम हे  दु:खाचे  गाणे
मृत्यूला मी साद घातली तुझी आठवण आली


सोनाली

गझल: 

प्रतिसाद

सन्माननीय सोनालीजी,
छान गझल आहे.
 

हत्या, दंगे, जाळपोळ  या  नेहमीच्या बातम्या 
अन्  कानावर  येता मुरली   ... तुझी आठवण आली.. वेगळा शेर

दारावरती थाप वाजली.. कंदिल थोडा झुलला
भिंतीवरूनी  छाया  हलली  ..तुझी आठवण आली..चित्रदर्शी

काळजात धडधडले माझ्या ..नयनी जमले प्राण
गडगडाट अन् वीज चमकली तुझी आठवण आली.. वा

जशी उन्हे ही सरु लागली...असे जास्त ओघवते वाटेल काय?
-मानस६



प्रति,
सोनाली...

गझल छान आहे. शेर आवडले...
हत्या, दंगे, जाळपोळ  या  नेहमीच्या बातम्या 
अन्  कानावर  येता मुरली   ... तुझी आठवण आली

निघून गेला  दिवस  कसा  ते कळले नाही मजला
ही उन्हे जशी  सरू लागली तुझी आठवण आली

दारावरती थाप वाजली.. कंदिल थोडा झुलला
भिंतीवरूनी  छाया  हलली  ..तुझी आठवण आली

काळजात धडधडले माझ्या ..नयनी जमले प्राण
गडगडाट अन् वीज चमकली तुझी आठवण आली

दारावरती थाप वाजली.. कंदिल थोडा झुलला
भिंतीवरूनी  छाया  हलली  ..तुझी आठवण आली
 
वा वा, मस्त

कापुसकोंड्याच्या गोष्टीसम .......
कापुसकोंड्याच्या गोष्टीला गझलेत आणणे खूप आवडले

कंदिल आणि कापुसकोंडा शेर आवडले!!

पुढे दरी  ,उंच कडा  मागे... काय करावे आता?
निराशेने सीमा गाठली.. तुझी आठवण आली
हा शेर कसा म्हणायचा ते समजले नाही.

मुक् र् र
 
अतिशय हल्की फुल्की सहज सुन्दर मनला भिड्णारी रचना प्रत्येक शेर सहजता दर्श् वितो
उर्दु गझलची आठ्वण झाली.