मनात चांदणे तुझ्या

मला जसे दिसेल, मानतो तसे असेलही
प्रिये मनात चांदणे तुझ्या तसे नसेलही


कबूल, पाहतेस तू मला सदा जिथे तिथे
अवश्य जीव बोलण्यास या तुझ्या फसेलही


तिच्याच भावना तिच्या नियंत्रणात राहिना (त)
हसेल आज गोडशी, उद्यास आकसेलही


तुझाच चाहता असूनही न जाणलेस तू
तुला कळेल तोवरी हयात आळसेल ही


तुझ्या खुणा बघून चालतात त्यातला न मी
जरा अजून चाल, खूण आमची दिसेलही


तुला कळायचेच राहिले, मला पसंत तू
तुला कळायचेच राहिले कुणी रुसेलही


तुझ्या मुहब्बतीत लाज सोडली जगात मी
तुलाच लाज ही तुझी मनामधे हसेलही


नसेल अर्थ फारसा, तरी तुझेच वाक्य ते
तुझे असेल नाव, वाहवा तिथे असेलही


किती उशीर जाहला कळायला खरेपणा?
असो, चला, म्हणू तिच्या मनात ते ठसेलही



 


 



 



 

गझल: 

प्रतिसाद

हयात आळसेलही...एक ठीक शेर.
आपल्या मनात येतात त्या सगळ्या विचारांवर रचना केल्याच पाहिजेत अस नसते.

नेहमीइतके प्राविण्य नाही.
हे जमते का पहा...
नसे रडून फायदा, उगाच वाटले मला..
'जमीन त्यां जशी दिली तशीच तो कसेलही'
कलोअ चूभूद्याघ्या

तिच्याच भावना तिच्या नियंत्रणात राहिना (त)
हसेल आज गोडशी, उद्यास आकसेलही


तुझाच चाहता असूनही न जाणलेस तू
तुला कळेल तोवरी हयात आळसेल ही


तुझ्या खुणा बघून चालतात त्यातला न मी
जरा अजून चाल, खूण आमची दिसेलही
आपण  घेतलेले  वृत्त  ही  लालित्य  पूर्ण  आहे  व  आपल्या  ओळीही  लालित्यपूर्ण  आहेत.

भूषणजी, सुरेख गझल. सुनेत्राजींनी म्हटल्याप्रमाणे- लालित्यपूर्ण.
हे शेर जास्त गर्जले-
तुझाच चाहता असूनही न जाणलेस तू
तुला कळेल तोवरी हयात आळसेल ही


तुझ्या खुणा बघून चालतात त्यातला न मी
जरा अजून चाल, खूण आमची दिसेलही..

अभिनंदन!!