थोडासा

तसा लगेच संपलो जगून थोडासा
तरी जिवंत राहिलो मरून थोडासा


तिला कळेल प्रेम काय चीज आहे ते
तिचा सराव होउदे अजून थोडासा


प्रवेशतो, सुहागरातची वधू जैशी
हळूच श्वास देह चाचपून थोडासा


कुणास मुफ्त मीठ लागल्यास मी आहे
निघे बरेच, गाल वाळवून थोडासा


तुझा सुगंध लाभला तरी पुरे झाले
तुझा रुमाल फेक वापरून थोडासा


न जन्म नोंदला, न मृत्यु नोंदला माझा
मनात ठेव यार आठवून थोडासा


 



 


 

गझल: 

प्रतिसाद

सगळे शेर छान आहेत
 
फक्त "चाचपून थोडासा" वाल्या शेराचा अर्थ कळाला नाही

ठेवणीतला नको करूस दागिना मला
वापरातला तुझा रुमाल होत जाउदे
हा ज्ञानेशचा शेर माझा अतिशय आवडता आहे. तो सारखा घोळत असतोच मनात! पण प्रामाणिकपणे सांगतो की वरील गझलेत माझा जो शेर आहे ( तुझा रुमाल फेक वापरून थोडासा ), तो रचताना चौर्याची भावना मात्र मनात नव्हती.
प्रसाद लिमये:
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
स्पष्टीकरण - मला असे म्हणायचे आहे की माझी परिस्थितीच अशी असते की श्वासालाही खात्री नसते की मी जिवंत असेन की नसेन. त्यामुळे तोही जरा चाचपूनच माझ्या छातीत येतो. मधुचंद्राला वधू जशी बिचकून, चाचपून खोलीत प्रवेश करते ( करायच्या, हल्लीच्या संस्कृतीमध्ये 'चाचपून यायची' मुलभूत कारणे उरलेली दिसत नाहीत ), तसा माझा श्वास घाबरत घाबरत येतो. यात, वधूच्या लाजण्याची उपमा नसून तिच्या हालचालीतील घाबरेपणाची उपमा आहे. 
अर्थातच, मला स्पष्टीकरण द्यावे लागणे हे माझेच अपयश आहे, आपला काहीही दोष नाही.
पुन्हा धन्यवाद!

साधारण तोच अर्थ मनात आला होता. स्पष्टीकरणाकरता धन्यवाद
 
सहज बोलतोय, राग मानू नये पण त्याच शेरातील दुसरी ओळ झकास नाजुक जमली आहे तेव्हा "प्रवेशतो" हा शब्द जरा जड वाटतोय ( जोडीला सुहागरात व वधू असूनही )
अर्थात मला जे वाटले ते सांगीतले, चुभुदेघे