नेहमीचेच सारे


बोललो दुःख हे नेहमीचेच सारे
काय होते विनोदी ? हसावेच सारे ?

भेटले सोयरे, काय त्यांना म्हणू मी
गारदी आमचे ओळखीचेच सारे

पुण्य माझे कसे तू खरडशील देवा
कर्म जे तू दिले ते चुकीचेच सारे

काल ही माणसे लांब लांबून गेली
श्राध्द जेवायला आज आलेच सारे

सावल्या त्रास देती करू बंद दारे
आतल्या आत उरले उसासेच सारे



गझल: 

प्रतिसाद


भेटले सोयरे, काय त्यांना म्हणू मी
गारदी आमचे ओळखीचेच सारे

पुण्य माझे कसे तू खरडशील देवा
कर्म जे तू दिले ते चुकीचेच सारे... हे शेर आवडले!

बोललो दुःख हे नेहमीचेच सारे
काय होते विनोदी ? हसावेच सारे ?

पुण्य माझे कसे तू खरडशील देवा
कर्म जे तू दिले ते चुकीचेच सारे

सावल्या त्रास देती करू बंद दारे
आतल्या आत उरले उसासेच सारे

 

हे छान आहेत

त्यात  ("पुण्य माझे.....चुकीचेच सारे")   देवच आपले कर्म घडवतो आणी तोच पापाची शिक्षा देतो ही कल्पना फ़ार आवडली

अजूनही काही रचता आले असते.
नववर्षाच्या शुभेच्छा!
(तसा मी फारसा बोलत नाही.)

बोललो दुःख हे नेहमीचेच सारे
काय होते विनोदी ? हसावेच सारे ?

ठीक शेर! 'नेहमीचेच' या शब्दामागचा हेतू सशक्त हवा होता. जर दु:ख नेहमीचेच असेल, तर लोक हसण्याऐवजी कंटाळतील. जर लोक हसत असतील, जर ते क्रूर आहेत असे म्हणायचे असेल तर 'नेहमीचेच' या शब्दाची आवश्यकता काय असा प्रश्न पडतो. कवीला जर असे म्हणायचे असेल की मी नेहमी तेच दु:ख सांगत असल्यामुळे लोक हसले तर 'ते का हसले?' असा प्रश्न कवीला पडणार नाही, कारण कवीला हे माहीत आहे की तेच तेच ऐकल्यामुळे लोक हसले.

भेटले सोयरे, काय त्यांना म्हणू मी
गारदी आमचे ओळखीचेच सारे

चांगला शेर!

पुण्य माझे कसे तू खरडशील देवा
कर्म जे तू दिले ते चुकीचेच सारे

गालीबच्या एक शेराची आठवण झाली.

नाकर्दा गुनाहोंकोभी हसरत की मिले दाद
यारब अगर इन कर्दा गुनाहोंकी सजा है

जर मी केलेल्या गुन्ह्यांबद्दल मला शिक्षा मिळणार हे निश्चीत आहे तर असे गुन्हे, जे मला करावेसे वाटत होते, पण ते करण्याचा मोह मी टाळला,  त्याबद्दल मला बक्षिसही मिळायला पाहिजे.

'देवा' या शब्दापुढे प्रश्नचिन्ह पाहिजे. अतिशय सुंदर शेर आहे. अंतर्मुख अवस्थेमधे निर्माण झालेला विचार कायम श्रेष्ठच बनतो.

काल ही माणसे लांब लांबून गेली
श्राध्द जेवायला आज आलेच सारे

हाही चांगला शेर आहे.

सावल्या त्रास देती करू बंद दारे
आतल्या आत उरले उसासेच सारे

संदिग्धता! असो. छोटीशी छान रचना, जी आशयाच्या बाजूने निश्चीतच 'गझल' या काव्यप्रकाराच्या जवळ जात आहे.

अभिनंदन!

प्रिय प्रसाद, तुमच्या गझलप्रवासाची सुरवात चांगली आशादायक झाली आहे.  पुढील गझलेसाठी मनापासून शुभेच्छा!


ज्ञानेश, अच्युत, बोलु का, गंभीर समीक्षक, चित्तरंजन भट
सगळ्यांचे मनापासून आभार
गंभीर समीक्षक - धन्यवाद,
"नेहमीचेच" मधे मला असे म्हणायचे होते की माझे दुःख काही वेगळे नाही, इतर चार चौघांसारखेच मग ते सांगताना मलाच का हसतात.
असो...हा अर्थ व्यक्त नाही होऊ शकला त्यातून.
पुढच्या वेळी अधीक चांगले लिहायचा प्रयत्न करेन

सावल्या त्रास देती करू बंद दारे
आतल्या आत उरले उसासेच सारे
कलोअ चूभूद्याघ्या

प्रसादभाऊ?
एकदम फडाड रचना आहे. सुंदर!