खूप वाकडा गेला


नवे नकोस करू आता तू वादळ जाता जाता
पूस तुझ्या गालावरचा तो ओघळ जाता जाता

तुज भेटुन हृदयावरती सुख धरते बिनसवयीचे
घेउन जा जी दिलीस तू ती अडगळ जाता जाता

उशीर झाला कळायला आयुष्याची समिकरणे
घे हिरवळ येताना तू, ने मरगळ जाता जाता

आश्वासन जीवन माझे घेउन आले अन गेले
हळहळ केली व्यक्त जरा, अन कळकळ जाता जाता

तपासायचो जशी इतर वाटेमध्ये आलेली
तपासले या जन्माचे मी मृगजळ जाता जाता

प्रेम पाहिले करून मी, मित्र पाहिले करून मी
तात्पर्ये कळली मजला केस विरळ जाता जाता

मनात माझ्या येताना शिरस्त्राण घाला यारो
छान वाट येताना पण, हो कोसळ जाता जाता

देहाच्या मर्यादांना जाणुन ना माणुस वागे
वाटे जी चळवळ त्याला, बस वळवळ जाता जाता

दोष कुणाचाही नाही, ध्येय बदलली काळाने
खूप वाकडा गेला हा, 'बाण' सरळ जाता जाता


 

 

गझल: 

प्रतिसाद

नवे नकोस करू आता तू वादळ जाता जाता
पूस तुझ्या गालावरचा तो ओघळ जाता जाता

'बाण' हे तखल्लूस या गझलेत अत्यंत सशक्तपणे वापरले आहे. कवी बाण याचे अभिनंदन! तू मला भेटायला आली होतीस हे सार्‍या जगाला माहीत आहे. अशात तू जर अश्रूंचा ओघळ गालावर घेऊन गेलीस तर एक आणखीन नवे वादळ निर्माण होईल. तुझीही बदनामी, मलाही संकटे! त्यापेक्षा, तू आपला तो गालावरचा ओघळ पुसून जा बरे? आधीच असलेली वादळे काय कमी आहेत की काय? उत्तम! उत्तम सुरुवात! अगदी गझलेसारखी सुरुवात!

तुज भेटुन हृदयावरती सुख धरते बिनसवयीचे
घेउन जा जी दिलीस तू ती अडगळ जाता जाता

'बिनसवयीचे' सुख व ते सुख 'अडगळ' वाटणे ही दोन नावीन्य आहेत. चांगली नावीन्यता! पण तसा शेर ठीकच!

उशीर झाला कळायला आयुष्याची समिकरणे
घे हिरवळ येताना तू, ने मरगळ जाता जाता

या शेरातही 'ने मरगळ जाता जाता' इतकाच शब्दप्रयोग लक्ष वेधतो.  पण कवी बाणने 'जाता जाता' ही रदीफ चांगली निभावली आहे.

आश्वासन जीवन माझे घेउन आले अन गेले
हळहळ केली व्यक्त जरा, अन कळकळ जाता जाता

ठीक शेर! पण यात ते जीवन आश्वासन घेऊन आले अन ते आश्वासन 'न' पाळता गेले असे स्पष्ट होत नाहीये. अर्थात ते दुसर्‍या ओळीत स्पष्ट होते आहे पण तरीही मनातली अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. कमकुवत शेर!

तपासायचो जशी इतर वाटेमध्ये आलेली
तपासले या जन्माचे मी मृगजळ जाता जाता

हा कवी कुठे रहात असावा याबद्दल संदेह निर्माण व्हावा असा हा शेर आहे. 'हा जन्मच मुळी मी रस्त्यावर आलेले एक मृगजळ, पाणी आहे की काय या दृष्टीने तपासतात, तसा तपासला? म्हणजे हा कवी अंतराळात स्वच्छंद विहार करताना निर्णय घेतो की काय? की चला आता या ग्रहावर जन्म घ्यावा वगैरे? आमची या कवीकल्पनेला काहीही हरकत असू शकत नाही. पण मुद्दा असा आहे की एकतर इतर शेर जरा या शेराच्या उंचीच्या जवळ तरी असावेत किंवा हा शेर तरी त्या शेरांइतका 'बुटका' असावा. वास्तविकपणे अत्यंत उत्कृष्ट शेर!

प्रेम पाहिले करून मी, मित्र पाहिले करून मी
तात्पर्ये कळली मजला केस विरळ जाता जाता

ठपाक! साधा शेर! अनावश्यक शेर!

मनात माझ्या येताना शिरस्त्राण घाला यारो
छान वाट येताना पण, हो कोसळ जाता जाता

इथे 'तुम्ही जात असल्यामुळे त्या वाटेवर दरडी कोसळतात' असे म्हणायचे असावे. पण तसे म्हणायचे असल्यास ते सशक्तपणे म्हंटले गेली नाही. नुसतेच जाताना 'कोसळ' होऊ शकते असे विधान आहे. हे म्हणजे 'ताम्हिणी' घाटात लावलेल्या पाट्यांसारखे वाटते.

देहाच्या मर्यादांना जाणुन ना माणुस वागे
वाटे जी चळवळ त्याला, बस वळवळ जाता जाता

खरय कवी बाण! खरय! आपल्या गझलेचा मतला अन हा शेर वाचून आम्हालाही तसेच वाटत आहे.

दोष कुणाचाही नाही, ध्येय बदलली काळाने
खूप वाकडा गेला हा, 'बाण' सरळ जाता जाता

हासिले गझल! अप्रतिम शेर! 'खूप वाकडा गेला हा, बाण सरळ जाता जाता'! व्वा! तखल्लूस इतक्या सुंदर पद्धतीने वापरलेले निदान या साईटवरतरी आम्ही पाहिलेले नाही.

 

माननीय बाण,
आपणही गझल करता हे माहीत नव्हते. चांगली गझल वाटली ही! पण कृपया हे वृत्त कुठले ते कळवावेत. तसेच 'बाण' म्हणजे काय व आपण 'जालकवींच्या कविता' या विषयावर इतके संतापले का होतात ते कळवलेत तर बरे होईल.
आपल्या या गझलेतील मृगजळ हा शेर अप्रतिम आहे. अजून काही गझला सादर कराव्यात अशी इच्छा!
धन्यवाद!