खेळ


शुद्ध रक्ताचा सडा हा, काल हा ताजाच होता
कापला जो काल मी, तोही गळा माझाच होता

बंदुकांपासून सार्‍या, वाचलो प्राणांसवे मी
शेवटी ज्याने दिला मज फास, तो आजाच होता

मी कशाला पाहुनी भुललो, मला कळलेच नाही
हेमगर्भा देवेतेचा, चेहरा साधाच होता

देश गेला वेष गेला, सोलली गेली त्वचाही
मी जिथे गेलो, तिथेही नागडा राजाच होता

मी कुणाला दोष देऊ, सांडल्या सार्‍या क्षणांचा
शाप देता हात, तो तर भाग्य देणाराच होता

श्वास झाले शांत, विझले नेत्र - आता दीर्घ निद्रा
हे दिले हे घेतले, हा खेळही त्याचाच होता



गझल: 

प्रतिसाद

खेळही त्याचाच होता ही कल्पना फारच आवडली.
माफ करा, पण दुसर्‍या शेरात काहीतरी गडबड वाटतीय. अर्थात, ती निश्चीतच नजरचुकीने झालेली असणार.
धन्यवाद!

श्वास झाले शांत, विझले नेत्र - आता दीर्घ निद्रा
हे दिले हे घेतले, हा खेळही त्याचाच होता

मस्तच !!!


 

भूषण कटककर,
दुसर्‍या शेरात शेवटचा झ उगीचच  आलाय. तिथे फक्त 'ंमी' इतकच पाहिजे. प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद!

शेवटचा शेर विशेष.
कलोअ चूभूद्याघ्या

शुद्ध रक्ताचा सडा हा, काल हा ताजाच होता
कापला जो काल मी, तोही गळा माझाच होता

सुरेश भटांनी मराठी कवितेसाठी जे योगदान दिले आहे त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. परकीय भाषेतील असा काव्यप्रकार, जो इतर भाषांमधेसुद्धा अफाट लोकप्रियता मिळवून गेला, तो म्हणजे 'गझल' हा त्यांनी मराठीमधे 'खर्‍या अर्थाने' आणला. त्याआधीही तसे प्रयत्न झाले होते, आकर्षणामुळे म्हणा किंवा अजाणतेपणाने, पण मराठी गझल ही मराठी भाषेला पूर्णपणे भटांची देणगी आहे.

मात्रः मराठी गझल ही उर्दू गझलइतकी लोकप्रियता अगदी महाराष्ट्रातही मिळवू शकली नाही.

याचे महत्वाचे कारणे:

१.'उर्दू गझल' या काव्यप्रकाराची काही सरळ सरळ दिसणारी वैशिष्ट्ये असतात. त्यातील नाजूकपणा, व्यक्तिगत व्यथांचे प्रकटीकरण, तरलता,  सहजता, साधे साधे शब्द घेऊन भिडणारा आशय मांडला जाणे, रसिकाला स्वतःच त्या गझलेत व्यक्त झाल्यासारखे वाटणे वगैरे! ( अरे? हे अगदी असेच मलाही वाटायचे किंवा हे जे सांगीतले गेले ते ऐकून मलाही व्यक्त झाल्यासारखे वाटले - असे काहीतरी )

२. गझलकार हे एकाचवेळी विविध पार्श्वभूमीमधून व खूप संख्येने आलेले असणे - जसे जफर, जौक, गालीब, मोमीन हे एकाचवेळी एकाच मुशायर्‍यात असायचे व त्यांची वैयक्तिक पार्श्वभूमी अर्थातच भिन्न असणारच. मोमीन हकीमपण होता व खाउनपिउन सुखी पण, जौक राजाचाच उस्ताद, जफर स्वतःच राजा! गालीबचे वैयक्तिक आयुष्य अत्यंत दु:खदायी!

या दोन कारणांमुळे तेथे गझल समृद्ध होण्यास खूप मदत झाली. एक काळ असा आला की जो उठतो तो गझल करायला लागला. पण मराठीमधे तसे झाले नाही. भटांनी मराठीत गझल आणताना तिला आशयाच्या बाजूने जे रंग दिले ते कदाचित त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामधून आलेले असतीलही. पण दुर्दैवाने अनुयायांनी आशयाच्या बाबतीतही त्यांचीच री ओढली. याची कित्येक उदाहरणे देता येतील. असे होण्याचे कारण म्हणजे मुळातच हा काव्यप्रकार फारसा प्रचलित नाही, आपण काहीतरी वेगळेच सांगायला जायचो अन फसायचो.. असे वाटत असावे. भटांनी स्वतः कित्येक नाजूक भावनांचा समावेश असलेल्या गझला रचल्या आहेत. पण जे प्रसिद्ध झाले ते त्यांचे आक्रमक लिखाण जास्त!

बराच काळ गेल्यावर ही साईट निर्माण झाली. ही साईट मराठी गझलसाठी जे करत आहे ते एक ऐतिहासिक काम आहे. इथे अनेक गझलकार एकत्र येत असल्यामुळे गझलेला विविध रंगही प्राप्त होत आहे. अनेक मते मांडली जात आहेत. 'प्रेम' हा विषय काही गझलकारांच्या गझलांमध्ये प्रामुख्याने दिसून येत आहे. चर्चा होत आहेत. कित्येक उत्कृष्ट गझला होत आहेत. ह्यामुळे पुढे अनेक गझलकार निर्माण होणार! आज भट असते तर त्यांनीही या गोष्टीचे कौतूक केले असते.

पण या साईटमुळे महत्वाची जी गोष्ट घडत आहे ती म्हणजे मराठी गझलेला जो आधी थोडासा कमी होता तो नाजुकतेचा, तरलतेचा असा रंग मिळायला हातभार लागत आहे.

आक्रमक शब्दांनी गझलेची थोडी हानि होते असे आमचे स्पष्ट मत आहे.

कवी गणेशप्रसाद यांनी ही जी गझल केली आहे ती निश्चीतच स्तुत्य आहे, पण त्यात परत रंजित विचार येत आहेत.

बंदुका, फास, नागडा, त्वचा सोलली जाणे, रक्त, गळा कापला जाणे अश्या शब्दरचना गझलेमधे शक्यतो नसाव्यात असे आमचे मत आहे. महान उर्दू शायरांनी सुद्धा 'खूने जिगर', 'वो खूं जो चश्मेतरसे', 'कातिल' वगैरे अनेक शब्द वापरले आहेत, पण ते सर्वसाधारणपणे प्रेमाची तीव्रता सांगण्यासाठी आहेत, अन्यायावर आसूड ओढण्यासाठी नाहीत.

मराठीतील गझल कशी असावी यावर कुणाचेही नियंत्रण असू शकत नाही, पण मग तिला गझल म्हंटलेच पाहिजे असा आग्रह धरणे ही गैर वाटते.

गंभीर समीक्षक.

 

खेळ त्याचाच होता. झकास.

प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद आणि बर्‍याच काळाने लिहीत असल्याबद्दल क्षमायाचना! पण मी बर्‍याचदा बाहेर असतो आणि त्यामुळे माझे या सन्केतस्थळावर येणे थोडे अनियमित आहे.
मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत.
एक म्हणजे 'कापला जो काल मी तोही गळा माझाच होता' हा माझा प्रेमासंबंधीचाच अनुभव आहे. मी जे काही वागलो किंवा जसे काही वागलो त्यातल्या मूर्खपणाने डोळे उघडण्याचा हा अनुभव का नसेल?
दुसरे म्हणजे मी गंभीर समीक्षकांप्रमाणे आक्रमकतेला गझलमध्ये प्रवेश देण्याच्या विरुद्ध नाही. त्यानी स्वतःच उल्लेख केलाच आहे की कवीश्वर सुरेश भटांचीही आक्रमक लेखणीच जास्त प्रसिद्ध झाली. मला तर ही आक्रमकता भावतेच!
शेवटी पुलंनी दिलेले 'जो जे वांछील तो ते लीहो' हे लायसेंस तर आहेच!

श्वास झाले शांत, विझले नेत्र - आता दीर्घ निद्रा
हे दिले हे घेतले, हा खेळही त्याचाच होता