...पाहिले


मीच मजला वाहताना पाहिले
जीवनाला संपताना पाहिले

 अश्रु होते माझिया डोळ्यांत अन
मी तुलाही स्फुंदताना पाहिले

मी असा बेरंग झालो, ज्या क्षणी
दोस्त माझे रंगताना पाहिले

प्रश्न आला जीवनाचा, अन मला
मीच मजशी तंडताना पाहिले

फाटला संसार माझा हा कधी?
(लक्तरांना लोंबताना पाहिले!)

हाव होती ही भयंकर, त्यांस मी
रक्त माझे शोषताना पाहिले

फाटल्या माझ्या मनाला मी तुला
आज टाके घालताना पाहिले

सर्व दारे बंद झाली ज्या क्षणी..
मांजराला झुंजताना पाहिले

कोण आहे धूर्त इतुका ह्या जगी?
(विश्व सारे गंडताना पाहिले!)

धावलो होतो पुढे, पण मी तुला
पाय माझे खेचताना पाहिले

दु:ख सारे साठलेले हे असे..
बांध फोडुन वाहताना पाहिले


गझल: 

प्रतिसाद

मीच मजला वाहताना पाहिले
जीवनाला संपताना पाहिले

सुंदर! मी वाहणे हे जीवन संपणे आहे ही उपमा फार सुंदर आहे. मतल्यासाठी असा शेर निवडणे हे एका चांगल्या गझलकाराचे निदर्शक आहे. पण! मी मला वाहताना पाहिले अन जीवनाला संपताना पाहिले या दोन ओळींमध्ये 'कुछ खास नही' असा एक विचार मनात येतो. अर्थात, हे आम्ही या गझलकाराची तुलना या साईटवरील इतर गझलकारांशी करून म्हणत नसून, त्याची तुलना काही दिग्गज गझलकारांशी करून म्हणत आहोत.

 अश्रु होते माझिया डोळ्यांत अन
मी तुलाही स्फुंदताना पाहिले

अशी परिस्थिती कधी निर्माण होते? तर जेव्हा ताटातुट दोघांनाही नकोशी असते अन ती अपरिहार्य असते तेव्हा! पण हा शेर म्हणजे एक साधे विधान आहे. आम्हाला समजतच नाहीये की इतके श्रेष्ठ विषय इतक्या किरकोळ पद्धतीने का हाताळले आहेत?

मी असा बेरंग झालो, ज्या क्षणी
दोस्त माझे रंगताना पाहिले

किरकोळ शेर! या कवीने अत्यंत चांगल्या विषयांना हात घालून त्यांचा 'बेरंग' केलेला आहे असे खेदपुर्वक म्हणावेसे वाटते.

प्रश्न आला जीवनाचा, अन मला
मीच मजशी तंडताना पाहिले

सुंदर ओळी!

फाटला संसार माझा हा कधी?
(लक्तरांना लोंबताना पाहिले!)

'हा कधी' चे प्रयोजन कवीने स्वतःच सांगीतल्यास बरे! तसेच त्या प्रश्नचिन्हाचे प्रयोजन सांगीतलेले बरे! परत कंसाचेही प्रयोजन सांगीतलेले बरे! निरर्थक शेर!

हाव होती ही भयंकर, त्यांस मी
रक्त माझे शोषताना पाहिले

'ही' चे प्रयोजन किंवा संदर्भ कवीने सांगावा अशी विनंती! 'ते' म्हणजे कोण हा प्रश्न आमचे इतर काही कवी मित्र विचारतीलच. त्यांचे नांव प्रतिसादात देणे त्यांना आवडत नाही.

फाटल्या माझ्या मनाला मी तुला
आज टाके घालताना पाहिले

सुंदर शब्दरचना! फक्त या शेरात 'रदीफ'चे प्रयोजन कळले नाही.

सर्व दारे बंद झाली ज्या क्षणी..
मांजराला झुंजताना पाहिले

अत्युत्तम! हासिले गझल! माणसाची अवस्था याहून काय वेगळी असते? फार सुंदर शेर! 'ज्या क्षणी'च्या ऐवजी काहीतरी वेगळे घ्यावे अशी विनंती! या कवीला शब्दांचे प्रयोजन असते हे एकतर माहीत नसावे किंवा त्या शब्दांचे काय प्रयोजन आहे हे आम्हाला समजण्याच्या पलीकडचे असावे.

कोण आहे धूर्त इतुका ह्या जगी?
(विश्व सारे गंडताना पाहिले!)

असंबद्ध शेर!

धावलो होतो पुढे, पण मी तुला
पाय माझे खेचताना पाहिले

'तुला' म्हणजे कोण हे कुणीतरी विचारेलच!

दु:ख सारे साठलेले हे असे..
बांध फोडुन वाहताना पाहिले

यात रदीफाचे प्रयोजन समजले नाही. तसेच 'हे असे'चे प्रयोजन समजले नाही.

बहुधा इथे आमचेच प्रयोजन नसावे. खुदा हाफिझ! पुढची गझल बघतो.

दोस्त माझे रंगताना पाहिले...फार सुंदर ओळ आहे मधुघट साहेब!
धन्यवाद!

व्वा...छान

फाटला संसार माझा हा कधी?
(लक्तरांना लोंबताना पाहिले!)

हाव होती ही भयंकर, त्यांस मी
रक्त माझे शोषताना पाहिले

फाटल्या माझ्या मनाला मी तुला
आज टाके घालताना पाहिले

सर्व दारे बंद झाली ज्या क्षणी..
मांजराला झुंजताना पाहिले

कोण आहे धूर्त इतुका ह्या जगी?
(विश्व सारे गंडताना पाहिले!)