गुणगुणावे मी तुला ......


गुणगुणावे मी तुला अन तू मला
ओठ द्यावे मी तुला अन तू मला

शोध सौख्याचा निघालो घ्यावया
सापडावे मी तुला अन तू मला

चेहरे बदलून हे गेले जरी
ओळखावे मी तुला अन तू मला

खेळ हा दोघासही जिंकायचा
हारवावे मी तुला अन तू मला

कोणते नाते असावे आपुले
का जपावे मी तुला अन तू मला ?

वादळे येतीलही जातीलही
सावरावे मी तुला अन तू मला........

                -वैभव देशमुख

 

        

 

  

 

गझल: 

प्रतिसाद

गुणगुणावे मी तुला अन तू मला
ओठ द्यावे मी तुला अन तू मला

अंत्ययमकाची लांबी काही वेळा मर्यादा आखून देते व त्या मर्यादांप्रमाणे शेर रचावा लागतो. आता या गझलेत मतल्यामधील पहिल्या ओळीत सहा शब्दांपैकी एकच शब्द असा आहे की त्यात शेराचा अर्धा अर्थ व त्याचबरोबर काफिया हे सर्व बसवावे लागत आहे. अत्यंत सशक्त शब्दसंपदा अशा गझला करताना आवश्यक ठरते.  म्हणजे 'गुणगुणावे' या एकाच शब्दामधे कवीला जे म्हणायचे आहे त्यातील अर्धे किंवा अर्ध्याहून अधिक म्हंटले गेले पाहिजे. हे अवघड आहे. कुठलीही कविता करताना सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे काही म्हणायचे आहे ते पूर्णपणे म्हणता आलेच पाहिजे अन अनावश्यक काहीही म्हंटले गेले नाही पाहिजे. तसे पहायला गेले तर ''गुणगुणावे मी तुला अन तू मला' हे एक संपूर्ण वाक्य आहेच. त्याच्यात कुठेही अर्थ अर्धवट राहिल्याची भावना जागृत होत नाही. पण तो अर्थ काही इतका अपवादात्मक उच्च नव्हे की मनावर आदळावा. असे होण्याचे कारण म्हणजे अंत्ययमकाची व वृत्ताची लांबी! उदाहरणार्थः

वाटते की गुणगुणावे मी तुला अन तू मला...असे वृत्त घेतल्यास अर्थ तोच राहून 'वाटते की गुणगुणावे' या १४ मात्रा कवीला पुढच्या ओळीत अर्थ ऍकोमोडेट करण्यास मिळतात. अर्थात, कमी लांबीचे वृत्त घेणे हे श्रेष्ठत्वाचे काही प्रमाणात निदर्शक आहेच.  तसेच काहीकाही वेळामुळी विचार सुचतात तेच एखाद्या विशिष्ट वृत्तात! तसे असेल तर अंत्ययमकाची लांबी किती असावी हे कवी ठरवू शकतो.

दुसर्‍या ओळीत सरळ सरळ प्रणयाराधन आहे. प्रणयाची किंवा मीलनाची कामना प्रदर्शित केली आहे.

शोध सौख्याचा निघालो घ्यावया
सापडावे मी तुला अन तू मला

साधे सरळ विधान! ज्यात चढउतार, वळणे ( अर्थाची ) नाहीत.

चेहरे बदलून हे गेले जरी
ओळखावे मी तुला अन तू मला

कवी एक अपेक्षा व्यक्त करत आहे. आपले वय झाले, काळाच्या ओघात आपण खूप जुनाट, निबर दिसायला लागलो तरीही आपले प्रेम तसेच रहावे. सुंदर विचार!

खेळ हा दोघासही जिंकायचा
हारवावे मी तुला अन तू मला

व्वा! इथे 'हारणे' ही 'जीत' आहे किती सोपे करून सांगीतले आहे! मी तुला आणि तू मला हरवणे हेच आपले दोघांचे जिंकणे आहे. दुसरा अर्थः कधी तुझी सरशी तर कधी माझी! तिसरा अर्थ - नशिबाला उद्देशूनः, चवथा अर्थ - मरणाला उद्देशून!

कोणते नाते असावे आपुले
का जपावे मी तुला अन तू मला ?

हा शेर जर स्वगत या दृष्टीकोनातून पाहिला तर अतिशय सुंदर शेर होईल. आम्हाला काही काही वेळ काही काही कवी 'आपले' चे आपुले वगैरे का करतात ते समजत नाही. त्याने ओळी पद्यरुपी वाटतात असा विचार असल्यास ते थोडे गैर आहे अस आमचे म्हणणे आहे. विचारांचे पद्य होण्यासाठी फक्त वृत्तावर हुकुमत अन प्रचंड शब्दसंपदा कामाचे नसतात. ( कृपया गैरसमज होऊ नये की हे ताशेरे या कवीवर आहेत. हे एक सर्वसाधारण मत आहे. ) विचारांचे पद्य होण्यासाठी आशय पद्य असावा लागतो. म्हणजेच, आपले  असे काय नाते आहे की मी तुला अन तू मला जपत बसावेस?' हे झाले गद्य विधान. 'मनापासून एकमेकाला जपण्याचे दिवस येतील त्याला मी सुख मानीन' हे त्याचे थोडेसेच पद्यरूप झाले. कारण त्याच्यात 'आत्ता तसे जपत नाही' असे इनडायरेक्ट विधानपण आहे. 'एक चूक काय केली आम्ही की आयुष्यभर हे नाते जपत बसावे लागले, इच्छा नसतानाही' हे जरा आणखीन वरचे विधान! कारण त्याच्यात परत कधीच तसे जपावे लागणार नाहीये ( मनापासून ) हे विधान आहे. 'काहीही झाले तरी आमचे आमच्यावरचे प्रेम काही घटले नाही, आम्हाला आमचाच इतका तिरस्कार असूनही आम्ही कायम स्वतःला जपतच बसलो, खरे तर स्वत:ला जपायची कधी मनात इच्छाच नव्हती' हे आणखीन श्रेष्ठ विधान! कारण ते ऐकणार्‍याला, वाचनार्‍याला प्रत्येकालाच जरासे 'आयडेंटिफाय' होणारे वाटू शकेल.  

वादळे येतीलही जातीलही
सावरावे मी युला अन तू मला........

एकंदर ही गझल म्हणजे एखाद्या कार्यक्रमात गाऊन सादर करण्याची आहे. त्यात आशयाला दाद मिळावी याहून चालीला, समेवर येण्याला अथवा आवाजाला दाद मिळावी अशी काहीतरी मूळ इच्छा असावी असे वाटते.

 

मतला सोडून सगळे शेर आवडले..

शोध सौख्याचा निघालो घ्यावया
सापडावे मी तुला अन तू मला

कोणते नाते असावे आपुले
का जपावे मी तुला अन तू मला ?

हे शेर तर ..वा क्या बात है..

जगजित सिंगांच्या क्यासेटीत  ' आ तुझे मै गुनगुनाना चाहता हूं " अशी  रचना आहे.  या गाण्यासारखी आणखी एक मराठी गझल  श्री . सानेकर या सुप्रसिध्द कवींची देखील आहे.

या मराठी  कवितेवरूनच श्री . जगजीत सिंगांच्या  क्यासेटीत सदर गाणे आलेले दिसते..काय मज्जाए नै !!!!

वादळे येतीलही जातीलही
सावरावे मी युला अन तू मला........ छान.
काफिया-रदीफ कॉपी-पेस्ट करा म्हणजे चुका कमी होतील. सर्व टाईप करावे लागणार नाही.
कलोअ चूभूद्याघ्या

जगजीत सिंग नॉट व्हेरिफाईड,
या दोन रचनांची काहीच तुलना नाहीये.
वैभवजी,
आपली रचना सहज छान आहे.

प्रतिसादाबद्दल सर्वा॑चे मनापासून धन्यवाद..........

वाटते यावे तुझ्या इतक्या जवळ
ना दिसावे मी तुला अन तू मला