उगाच जाते
कधी कधी जायलाच येते, कधी कधी यायलाच जाते
कधी कधी ती उगाच येते, कधी कधी ती उगाच जाते
"उगाच आले, चुकून रस्ता, तुला न मी भेटण्यास आले"
असे म्हणोनी झकास लाजे, रुसायची कामनाच जाते
कधी कधी ती खुशाल देते भिजून अंगास पावसाने
'पुसायची अंग ओढणीने' पहावयाची मजाच जाते
"जमायचे ना मला उद्यापासुनी तुला भेटणे" म्हणाली
"रडू उद्यापासुनी" म्हणे" थांबते इथे मी, उद्याच जाते"
अता न येणार ती, कशाला बघायची वाट नेहमीची?
अता इथे सोबतीस माझ्या व्यथाच येते व्यथाच जाते
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
बुध, 17/12/2008 - 21:53
Permalink
शेवटचा शेर
छान.
कलोअ चूभूद्याघ्या
अहंकारी
गुरु, 18/12/2008 - 00:45
Permalink
पुन्हा तपासा!
असे म्हणोनी झकास लाजे, रुसायची कामनाच जाते
कधी कधी ती खुशाल देते भिजून अंगास पावसाने
'पुसायची अंग ओढणीने' पहावयाची मजाच जाते
वरील तीन ओळीत काहीतरी चुकतंय! जरा पुनर्विचार व्हावा!
बाकी छान!
गंभीर समीक्षक
गुरु, 18/12/2008 - 15:06
Permalink
कधी कधी
कधी कधी जायलाच येते, कधी कधी यायलाच जाते
कधी कधी ती उगाच येते, कधी कधी ती उगाच जाते
लयदार रचना व्हावी यासाठी वृत्त असतात. काही वेळा असेही होऊ शकते की लयदारपणाकडे जास्त लक्ष दिल्यामुळे आशय भिडण्याची शक्यता मावळायला लागते. तसे या गझलेत झाले आहे असा संशय यायला वाव आहे. 'जायलाच येते' मधे कवीची प्रेयसी येते तीच अशी की सारखी 'जाते जाते' म्हणत राहते असे म्हंटले आहे. मात्र 'यायलाच जाते' मधे ती पुन्हा येण्यासाठी जाते असे म्हणायचे आहे की काय ते स्पष्ट होत नाही. आणि पुन्हा येण्यासाठी जाते या विधानामधे फारसा भिडणारा अर्थही नाही. 'कधी कधी ती उगाच येते' मधे जादू आहे. 'कधी कधी ती उगाच जाते' मधे परत संदिग्धता! ती उगाच का जाते? उशीर होणे, समाजाचे भय, वगैरे कारणे असतात की जायला! उगाच जाते हे नीटसे पटत नाही.
"उगाच आले, चुकून रस्ता, तुला न मी भेटण्यास आले"
असे म्हणोनी झकास लाजे, रुसायची कामनाच जाते
शेरांमधे पद्यात्मकता आणणे व उघड अर्थापेक्षा सांकेतिक अर्थ वापरणे ही पुढची पायरी असून ती चढण्याचे काम आता या कवीने करायला पाहिजे.
कधी कधी ती खुशाल देते भिजून अंगास पावसाने
'पुसायची अंग ओढणीने' पहावयाची मजाच जाते
वरवर सवंग वाटू शकणारा हा शेर एका वेगळ्या भावनेला छेडून जातो. स्त्रीच्या ओलेत्या सौंदर्याच्या वर्णनाने आत्तापर्यंत हजारो गीते, चित्रपट, लेख गाजले असतील. पण तशात त्या स्त्रीने पदराने लगबगीने अंग पुसून घेणे ही क्रिया तिच्या प्रियकरासाठी निरखण्याजोगी असते असा विचार या शेरात मांडला गेला आहे. जो जरासा नवीन तर आहेच पण जरा जास्त डिटेल्ड आहे. सवंगतेमधे किंचित नावीन्य आणल्यामुळे सवंगतेवर आम्ही काही बोलणार नाही कारण ते नावीन्य वाचून त्यावर इतर काही कवितांमधे, लेखांमधे त्याचा विविध पद्धतीने अंतर्भाव केला जाऊ शकेल ज्याने एक संकेत निर्माण होण्यास मदत होऊ शकेल. म्हणजे असे की कदाचित पुढे कुणी असे म्हणु शकेल की प्रियकराने तिला पावसातून मुद्दाम सुरक्षित ठिकाणी नेले ज्यायोगे त्याला तिच्या त्या मोहक हालचाली निरखायची संधी मिळेल. त्यापुढे कुणी असेही म्हणु शकेल की अशा हालचाली निरखता याव्यात म्हणुन कवी पावसाची आराधना करत आहे वगैरे.
"जमायचे ना मला उद्यापासुनी तुला भेटणे" म्हणाली
"रडू उद्यापासुनी" म्हणे" थांबते इथे मी, उद्याच जाते"
मूड चेंज्ड! गझल या काव्यप्रकाराचा फायदा घेतला आहे. विविध द्विपदी विविध विषयावर असू शकतात याचा फायदा घेतला आहे. आता तिला उद्यापासून कवीला भेटायला येणे का जमणार नाही याचा अंदाज येऊ शकतोच. पण या शेरात जादू नाही. सरळ सरळ विधाने असलेले शेर जरा वळणावळणाचे करणे अत्यावश्यक!
अता न येणार ती, कशाला बघायची वाट नेहमीची?
अता इथे सोबतीस माझ्या व्यथाच येते व्यथाच जाते
परत तेच! सपाट विधान!
आपल्याला अभिप्रेत असलेला आशय किती शब्दात मावतो हे बघणे कवीसाठी जरूरीचे आहे. म्हणजे असे की २० मात्रांमधे आशय स्पष्ट होऊ शकत असेल तर २८ मात्रांचे वृत्त घेणे टाळले पाहिजे. त्याने रचना सशक्त व 'न बदलता येणारी' होण्यास मदत होते. अशा विचाराने रचना केल्यास आणखीन एक फायदा होतो. तो म्हणजे कवीची स्वतःचीच कवी म्हणुन ताकद वाढते. कमीतकमी शब्दात तो जास्त आशय माववायला पाहतो. त्यामुळे मोठ्या वृत्तातील त्याच्या रचना तर अतिशय आकर्षक होतात. हे विचार मान्य होण्यासाठी कवीने आपल्या काव्यप्रवासाबाबत गंभीर असणे आवश्यक आहे. अन्यथा अशा मुद्यांवर वादही घातले जाऊ शकतात.
ज्ञानेश.
गुरु, 18/12/2008 - 19:19
Permalink
क्या बात है..
भूषणजी,
भट्टी जमून आलीये मस्त..!
हे दोन शेर जास्तच आवडले-
उगाच आले, चुकून रस्ता, तुला न मी भेटण्यास आले"
असे म्हणोनी झकास लाजे, रुसायची कामनाच जाते
अता न येणार ती, कशाला बघायची वाट नेहमीची?
अता इथे सोबतीस माझ्या व्यथाच येते व्यथाच जाते...
वेगळे वृत्त पाहून मोह आवरत नाहीये..
"कधी अशी ती भरात येते, जणू सुखाची वरात येते..
कधी अशी ती उदास होते, जगावयाची रयाच जाते.."
धन्यवाद.
भूषण कटककर
गुरु, 18/12/2008 - 19:59
Permalink
व्वा!
ज्ञानेश,
तुमचा शेर जास्तच आवडला. 'रया' वर शेर रचायचा मी खूप विचार करत होतो. पण तुमच्या शेरातली सहजता मला सापडतच नव्हती.
अजय व ज्ञानेश - दोघांचेही धन्यवाद!