निर्जीव वादळ

माझ्या गळा कधीही जाऊ नको तळाशी
येई नको नको ते चिकटून या गळाशी

'उडवून देत जावा, घ्यावी मजा तयाची'
बस एवढाच देवा संबंध गोंधळाशी !

ज्याच्यामुळे तळ्याची होते नदी प्रवाही
त्यालाच लोक टाकी वाळीत त्या जळाशी

संबंध जोडताना आयुष्य घालवावे
अंतास जाणवावे..मी एकटा पळाशी

माझी जमीन आहे, उगवून घे, बहर तू
रसिकाशिवाय पूजा येईल का फळाशी?

वाईट वाटते की दोन्ही तुझेच असती
पण आपसात लढते बुद्धी तुझ्या बळाशी

इतिहास याद आहे, 'धुतले किती तयांना'
जे आज सांगती की "कर्तव्य ना मळाशी"

लाटेसहीत येते, लाटेसहीत जाते
रेती गरीब होते धडकून कातळाशी

सांगीतले कुणी रे कविता रचायला या?
संबंध काय आता माझा तुझ्या छळाशी?

अध्यात्म सांगणारे आले बरेच, गेले
उपभोग ऐहिकाचे सांधून  केवळाशी

हे जीवना तुला मी कंटाळलोय आता
झुंजायचे किती मी 'निर्जीव वादळाशी'?


 






 

 

गझल: 

प्रतिसाद

मतला   आवडला.

आवडले.
कलोअ चूभूद्याघ्या

त्यालाच लोक टाकी वाळीत त्या जळाशी
या ओळीमधे 'त्या जळाशी'चा काहीही संबंध नाही.
बाकी गझल लाजवाब!
सणसणीत गझल!

धन्यवाद सुनेत्रा व अजय!

माझ्या गळा कधीही जाऊ नको तळाशी
येई नको नको ते चिकटून या गळाशी
'गळ' या वस्तूला जर संबोधण्यात येत असेल तर दुसर्‍या ओळीतील 'गळाशी' हा शब्द खटकतो व त्याऐवजी 'तुझ्याशी' असायला पाहिजे असे वाटते. एक चांगला मतला! माझ्या मना आता जास्त आठवणी काढत बसू नकोस, आठवता आठवता जर तो दु:खद भूतकाळ आठवला तर तुझी अन माझी काही खैर नाही. व्वा!
'उडवून देत जावा, घ्यावी मजा तयाची'
बस एवढाच देवा संबंध गोंधळाशी !
द्वयर्थी शेर झाला. हे देवा, तू ही भूमी निर्माण करून इथे होत असलेल्या गोंधळाची नुसती मजा बघत बसतोस हे काही बरोबर नाही. आणि दुसरा अर्थः  देवा, मला का उगाच पापी समजून शिक्षा देतोस? मी तर फक्त गोंधळ उडवून दिला होता अन त्याची मजा बघत होतो. मी काही त्या गोंधळात सक्रिय सहभागी झालो नाही काही? गझलेमधे मूड चेंज करताना जरा टप्प्याट्प्प्याने केला तर बरे वाटते. मतला एकदम धीरगंभीर अन दुसरा शेर एकदम 'हझल'ला शोभणारा. हरकत नाही, पण हा शेर जरा मागाहून आला असता तर पचायला बरा गेला असता.
ज्याच्यामुळे तळ्याची होते नदी प्रवाही
त्यालाच लोक टाकी वाळीत त्या जळाशी
वर आम्ही जे 'मूड'बद्दल लिहिले आहे ते इथेही लागू पडते. हा शेर सामाजिक स्वरुपाचा आहे. स्वतंत्रपणे वाचला तर आवडू शकेल पण पहिल्या दोन शेरांनंतर वाचला तर सामोरे जायला जरा वेळ लागू शकेल. तसेच, हा शेर संदर्भहीनही वाटतो. कुणी कुणाला का वाळीत टाकले असावे? ज्याला वाळीत टाकले त्याच्यामुळे कुठल्या तळ्याचे रुपांतर वाहत्या नदीमध्ये झाले? कसे झाले? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.  
संबंध जोडताना आयुष्य घालवावे
अंतास जाणवावे..मी एकटा पळाशी
सुंदर! सुंदर शेर आहे.
माझी जमीन आहे, उगवून घे, बहर तू
रसिकाशिवाय पूजा येईल का फळाशी?
परत संदर्भहीन शेर! इथे एक रसिक एका कवीला हे सांगत आहे असे वरकरणी वाटेल. पण त्याचा संदर्भ काय? एखाद्या रसिकाला ही गोष्ट कवीला सांगण्याची जरूर का भासावी? की कुठल्यातरी वेगळ्याच संदर्भात या उपमा वापरल्या गेल्या आहेत?
वाईट वाटते की दोन्ही तुझेच असती
पण आपसात लढते बुद्धी तुझ्या बळाशी
चुकलेली शब्दरचना! 'आपसात' या शब्दानंतर 'लढते' हा शब्द चुकतो. 'लढती' असा शब्द घ्यायला पाहिजे ( लढतात या अर्थी ). 'आपसात' म्हणजे कर्ते दोघे झाले. परत त्यानंतर बुद्धी तुझ्या बळाशी म्हणणे चुकीचे आहे. 'आपसात' नंतर वास्तविकपणे 'बुद्धी व बळ' असा शब्दप्रयोग यायला पाहिजे. हा शेर बदलला तर बरे होईल.
इतिहास याद आहे, 'धुतले किती तयांना'
जे आज सांगती की "कर्तव्य ना मळाशी"
याच कवीने कवी ओंकारच्या 'करारनामे'वर जे प्रश्न विचारले होते ते याच कवीच्या याच रचनेवर उपस्थित केले जाऊ शकतात. 'तयांना' म्हणजे कुणाला? ते आज असे का म्हणतात की 'मला आता मळाशी कर्तव्य नाही'?  सुचणारे सर्व काफिये घेऊन गझल रचणे हे आकर्षण नीटपणे निभावण्यासाठी प्रत्येक शेरावर शांतपणे वेळ देऊन विचार करायला लागतो. नाहीतर त्याचा मोह टाळलेला बरा! 
लाटेसहीत येते, लाटेसहीत जाते
रेती गरीब होते धडकून कातळाशी
उत्तम शेर! इथे रेती म्हणजे मानवी जीवन असे जर गृहीत धरले तर माणसाच्या हातात काहीच नसते, तो बिचारा आयुष्य नेईल तिकडे जातो अन येईल त्या संकटांचा सामना करत बसतो.
सांगीतले कुणी रे कविता रचायला या?
संबंध काय आता माझा तुझ्या छळाशी?
स्वगत! हा शेरही चांगला आहे. पण त्यातला खडबडीतपणा मात्र घालवायला पाहिजे. 'संबंध काय आता?' वगैरे शब्दप्रयोग जरा जास्तच आक्रमक वाटतात. 'करणार काय आता?' वगैरे पर्याय विचारात घेतले असते तर चांगले झाले असते. तसेच 'सांगीतले कुणी रे?' बाबत! कवी जेव्हा कविता गंभीरपणे घेतो तेव्हा 'कविता न सुचणे', कविता फार उत्तम होणे', 'कवितेतून व्यक्त झाल्यासारखे न वाटणे' वगैरे अनेक गोष्टींमुळे मनस्ताप होऊ शकतो. ( होय, चांगली कविता झाल्यामुळेही त्रास होऊ शकतो - कारण त्या कवितेवर कवीचे प्रेम बसते अन मग तितक्या ताकदीच्या रचना भविष्यात होतील की नाही किंवा होत नाहीत याचा त्रास होऊ शकतो. ) आता कवी स्वतःलाच विचारतो आहे की तुला कुणी सांगीतले होते कविता करायला? आता जळी स्थळी काष्ठी पाषाणी एक तर सारखी कविताच येऊन मनाला भिडते अन तीही मनाचे समाधान पूर्णपणे करत नाही. आता बस त्रास भोगत, मी काय करणार? छान..छान भावना!
अध्यात्म सांगणारे आले बरेच, गेले
उपभोग ऐहिकाचे सांधून  केवळाशी
संदर्भरहीत शेर आहे. किंवा नुसतेच तत्वज्ञान आहे. असे का म्हणावेसे वाटले हे समजत नाहीये. या शेराचा अर्थ अतिशय 'जनरल' स्वरुपाचा आहे. म्हणजे हे विधान कुणीही केव्हाही करू शकते. ( नुसते बोलतात, स्वतः तसेच वागतात किंवा तुम्हाला नुसते बोलायला काय होते? वगैरे स्वरुपाचे विधान! ) या शेरातील 'सांधून' हा शब्द मात्र अतिशय मार्मिक आहे. सांधणे म्हणजे जोडणे हे सगळ्यांनाच ज्ञात आहे. पण आम्हाला वाटते तशा अर्थाने हा शब्द वापरला आहे की नाही हे कवीच सांगू शकेल. ऐहिक उपभोग अध्यात्माशी सांधण्याचे काम आयुष्यभर देह करत असतो. म्हणजे इंद्रिये उपभोग घेण्यास भाग पाडत असतात अन मनात मात्र अध्यात्माची ओढ किंवा भीती किंवा पश्चात्तापामुळे निर्माण झालेली जवळीक असते. इंद्रियेही देहात अन मनही देहातच! म्हणजे देह उपभोग घेतानाच अध्यात्माकडेही झेपावत असतो किंवा त्याच्या संपर्कात येतो. अशा पद्धतीने देह सांधण्याचे काम करतो.
हे जीवना तुला मी कंटाळलोय आता
झुंजायचे किती मी 'निर्जीव वादळाशी'?
चुकलेला शेर! आशयाच्या दृष्टीने! निर्जीव वादळाशी मुळात झुंजण्याची जरूरच भासणार नाही. पण जीवनाला निर्जीव वादळ म्हणण्यात एक आत्मविश्वास दिसून येतो. म्हणजे मला आता झुंजायला सुद्धा काहितरी चैतन्यमय, सळसळणारे हवे आहे असे काहीतरी!
शेरांचा क्रम, विविध शेरांमधून प्रदर्शित होणार्‍या मनाच्या स्थिती या गोष्टींचे भान ठेवणे आवष्यक आहे. त्यामुळे गझल आकर्षक होण्यास मदत होते.
गझलचे , ( कवितेचे नाही - कवितेमधून कुठलाही भाव व्यक्त करावा व करतात अन करायला हरकतही नाही.  ) एक स्वतंत्र विश्व असते. गझल ही स्वतःच एक परिपूर्ण रचना असते. गझलेने आत्मिक समाधान व स्वतःला व रसिकाला धुंदी येणे आवश्यक आहे. या गोष्टींचा विचार भविष्यातील रचनांमधे केला जावा असे म्हणावेसे वाटते.
 

पाण्यास रांग येथे, खोळंबलेत सारे
झिंज्या घरात ओढा, का भांडता नळाशी?

श्री अहंकारी - ज्या माणसामुळे तळ्याची नदी होते त्याला त्याच नदीशी म्हणजे जळाशी वाळीत टाकतात असे माझे म्हणणे आहे. जळाशी या शब्दाचा असा संबंध आहे. पण आपल्याला तो तसा जाणवला नाही हे नक्कीच माझे अपयश असणार! माफ करा. एकदा कधीतरी प्रतिसाद देताना आपल्या जन्मजात नावानेही देऊन टाका अशी विनंती! मला खात्री आहे की कुणीही आपल्या वंशाच्या दिव्याचे नांव 'अहंकारी' असे ठेवणार नाही.
श्री गंभीर समीक्षक - आपल्या हेवीवेट प्रतिसादाबद्दल धन्यवाद!  
१. मतल्याची दुसरी ओळ हे स्वगत आहे.
२.दुसरा शेर! इथे 'देव' म्हणजे दुसराच कुणीतरी आहे. देवाला उद्देशून असता तर मी प्रश्नचिन्ह दिले असते.
३. ३ रा शेर- आता आपलेच बघा! आपण इतके दीर्घ प्रतिसाद देता. पण कुणीही आपल्या प्रतिसादाला डोळ्यासमोर ठेवून गझल रचत नाही. याला म्हणतात 'त्याच जळाशी वाळीत टाकणे'.
४. रसिकाशिवाय पूजा येईल का फळाशी? - मी इथे कविता किंवा माझ्या भाषेत तथाकथित गझला करतो त्या कशासाठी करतो? तर चारचौघांनी वाचाव्यात अन वा वा म्हणावे. कुणी वा वा म्हणणारच नाहीये किंवा काहीच प्रतिसाद देणार नाहीये हे जर मला माहीत असते तर मी माझ्या तथाकथित गझला इथे प्रकाशित केल्याच नसत्या. पण मी कधी कुणाला वा वा म्हणतो? एक जयन्ता ५२, एक मिल्या, एक प्रदीपसाहेब, एक वैभवसाहेब, एक डॉ. ज्ञानेश, एक डॉ.समीर, एक ज्युनियर भटसाहेब, एक केदार व एक अजय! इथे अनेक गझलकार आहेत. त्यांना मी बरेचवेळा वा वा म्हणत नाही. अर्थात त्यांना मी वा वा न म्हंटल्यामुळे काहीच फरक पडणार नाही. ते श्रेष्ठ आहेतच व राहतीलही. पण ज्यांना मी वा वा म्हंटले त्यांना तर बरे वाटेल की नाही? म्हणुन हा शेर घातला.
५. पंण आपसात लढती - या शेरात मी आपला आदर राखून बदल करत आहे. 'तरिही उगाच लढते' असा! 'तरिही' मधल्या 'रि'साठी माफ करा.
६. कर्तव्य ना मळाशी - आपले अवांतर वाचन बरेच आहे व त्याबद्दल हॅट्स ऑफ! या साईटवरचे आपले वाचनही तसेच व्हावे अशी नम्र आकांक्षा!
७. संबंध काय आता माझा तुझ्या छळाशी? - आक्रमकपणा वाटत असेल तर माफ करा.
कविता तुझ्याच सार्‍या    प्रतिभा तुझीच सारी
नाते उरेल आता              केवळ तुझे छळाशी
असा बदल करतो आहे.
८. उपभोग ऐहिकाचे सांधून केवळाशी - असे 'जनरल' स्वरुपाचे अनेक शेर इथे आहेत. म्हणुन मी पण एक रचला.
९. निर्जीव वादळाशी - आपले म्हणणे खरे आहे. शेर चुकला आहे. झुंजण्याची गरज नसायलाच पाहिजे. झुंजण्यात काहीही अर्थ नाही. आपले आपले जीवन जगावे अन मजा करावी. दुसर्‍याशी झुंजून काय होणार? या साईटवर जाहीर सांगताना मला कसलीही भीती अथवा लाज वाटत नाही. 'चहा घेऊ बसू बोलत' हा केदारचा शेर वाचल्यानंतर मी केदारला ओळखत नसतानाही जाहीर साईटवर विचारले की चहा केव्हा पाजताय? केदारनेही दिलदारपणे जाहीरच विचारले की केव्हा पाजू? याला म्हणतात कवी! कवी कवीला भेटतो तेव्हाचा आनंद अवर्णनीय असायला पाहिजे. 
आपण दिलेल्या वेळाबद्दल व प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
रसिक - पाण्यासाठी लोक थांबलेत हे मला समजले नव्हते कारण ते लोक 'नॉट व्हेरिफाईड' होते. आपण एकदा 'व्हेरिफाय' होऊन या व गझलांचा आनंद घ्या. सोपे आहे ते.
 आपल्यासाठी एक शेर!
दुनिया बघायची तर बाहेर ये जरासा
आयुष्य जात आहे मित्रा तुझे बिळाशी

 
 

'उडवून देत जावा, घ्यावी मजा तयाची'
बस एवढाच देवा संबंध गोंधळाशी !  (वा!! हा तर रोजचाच अनुभव शब्दब्ध...)
संबंध जोडताना आयुष्य घालवावे
अंतास जाणवावे..मी एकटा पळाशी 
हे जीवना तुला मी कंटाळलोय आता
झुंजायचे किती मी 'निर्जीव वादळाशी'?
हे शेर आवडले....