कैफियत-५

फारसीकडून गझल घेत असताना उर्दू कवींनी फारसी काव्यातील प्रतीकात्मक शब्द जसेच्या तसे उचलले पण अलीकडच्या काळात उर्दू गझलेत फारसी काव्यातील प्रतीके कमी कमी उपयोगात आणली जात आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे.

मराठी गझलेने उर्दू काव्यातील प्रतीकात्मक शब्द जसेच्या तसे स्वीकारण्याची मुळीच गरज नाही. महाराष्ट्र आणि मराठे भाषा व मराठी संस्कृतीची प्रदीर्घ समृद्ध परंपरा आपल्याला मराठी गझलेसाठी हवे तेवढे प्रभावी प्रतीकात्मक शब्द देऊ शकते. आपल्या महाराष्ट्रात आपल्या भोवतीच्या जीवनातून मराठी गझलेसाठी भरपूर प्रतीकात्मक शब्द मिळू शकतात. उदाहरणार्थ -

ताठ कॊलरींचा ताठा वाकणार आहे!
वंचनाच ज्याची त्याला गाडणार आहे!
गटारात खुपसून माना सूर्य शोधती जे
गगन का तयांचे मिंधे राहणार आहे?
मठोमठी मंबाजींना कीर्तन करू द्या
विठू काय बेमानांना पावणार आहे?

आता - "ताठ कॊलरी, गटार, सूर्य, गगन, मठ, मंबाजी आणि विठू" हे शब्द प्रतीकात्मकच नाहीत काय? जे सांगण्यासाठी एरवी ५०-६० ओळी खर्ची पडल्या असत्या, ते सारे फक्त दोन ओळींत कोणत्याही पाल्हाळाशिवाय सांगण्यासाठी हा मंबाजी आणि विठू मदत करतो, हे आजच्या बेमानांनी कळूनसुद्धा मान्य केलेले नसले तरी महाराष्ट्रातील सामान्य मराठी माणसांना ह्या शेरांचा अर्थ क्षणार्धात कळतो आणि पटतो. पण "कळ्णे आणि पटणे हे हलक्या कुळाचे लक्षण आहे," असा एक सोयीस्कर गैरसमज आपल्या वर्गीय अहंकाराच्या वाळूत मान खुपसून बसलेल्या काही अभिजात शहामॄगांनी करून घेतलेला आहे. वादळ आले की शहामृग असेच करतात!

प्रतीकात्मक शब्द वापरले म्हणून गझलवर तोचतोचपणाचा किंवा उथळपणाचा आरोप करणारे स्वतः गझल लिहीत नसतात. फार तर ते जे काही लिहितात, त्यालाच ते "गझल" असे शीर्षक देतात. आणि आपण जर बारकाईने काळजीपूर्वक आजचे "मुक्त"काव्य तपासले, तर ह्या काव्यात हजारो प्रतीकात्मक शब्द विखुरलेले आढळून येतील. हे प्रतीकात्मक शब्द पुष्कळदा इंग्रजी भाषेतीलही असतात. उदाहरणार्थ - १९८३ च्या "मौज" वार्षिकात कविवर्य प्रा. वसंत सावंत ह्यांच्या "पक्षी" ह्या कवितेतील काही ओळी अशा -

"एक सैबेरियन पक्षी गात गात येतो एखाद्या सायंकाळी... मी पाहतो एक आफ्रिकन पक्ष्यांचा थवाही... त्यांच्या पंखांत असावी वीज आणि डोक्यात इलेक्ट्रॊन्स, बसवलेले.... गळ्यात ट्रान्झिस्टर असतात अनोख्या गाण्यांचे."

प्रतीके म्हणून येथे सैबेरियन, आफ्रिकन, इलेक्ट्रॊन्स आणि ट्रान्झिस्टर" हे शब्द आलेले नाहीत काय?

ह्या अंकात कविवर्य ग्रेस ह्यांच्या "कृष्णएकांत" ह्या कवितेत आलेले प्रतीकात्मक शब्द पाहा.

तिच्या अंगणातील प्राजक्तबंदी तरी सत्यभामे ढळे तोल का?
झाडाप्रमाणे असे झाड हेही असे सांगते ती, तरी हुंदका?
इथे बासरीच्या गडे आतड्याला हवा चंदनी लाकडाची नवी;
तुला रुक्मिणी का फुले वेचताना सुगंधातही भेटते वाळवी?
संहार आता करा यादवांचा जुनी राजधानी निनावी करा;
रथाला कुणी अश्व देऊ नका अन शिरच्छेद माझे कसेही धरा.
वैराण आयुष्य झाले तरीही फुलांना कधी बोल देऊ नये;
मी बांधिलेल्या उन्हाळी घरांच्या गवाक्षातला चंद्र झाकू नये.
नको धाक घालू नको हाक तोलू इलाख्यातली गुप्त झाली नदी;
निजेच्या भयाने जसा शुभ्र होतो खुनाच्या कटातूनही गारदी...

ह्या कवितेत "प्राजक्त, सत्यभामा, बासरी, रुक्मिणी, वाळवी, यादव, राजधानी, फुले, चंद्र, गारदी" इत्यादी शब्द प्रतीके म्हणूनच कविवर्य ग्रेस ह्यांनी योजिली नाहीत काय?

फरक एवढाच आहे की, एक विषय (
theme) उलगडण्यासाठी कविवर्य ग्रेस ह्यांनी सहा कडवी (एक कडवे मी गाळले आहे) लिहिली आणि त्या कडव्यात वरील प्रतीकात्मक शब्दांचा उपयोग केला तर गझलेत मात्र फक्त दोन ओळींचा एक शेर एक theme हाताळतो आणि ती थीम अगदी सहज रसिकांच्या हृदयात पोहोचविण्यासाठी कवितेप्रमाणेच प्रतीकात्मक शब्दांचा उपयोग करतो. म्हणून दो ओळींचा एक ताकदीचा शेर वृत्त, यमक, अन्त्ययमक आणि सहजता साधून लिहिणे हे अधिक अवघड आहे.

मराठी गझल मराठी मानसिकतेला सुपरिचित असलेली प्रतीके सोबतीला घेऊनच पुढे जाणार आहे. मात्र त्याच वेळी आम्हाला ओळखीची असलेली इतर भाषांतील प्रतीके उपयोगात आणण्यास मुळीच हरकत नाही.

जर सैबेरिया, आफ्रिका, इलेक्ट्रॊन्स आणि ट्रान्झिस्टरचा स्वीकार होऊ शकतो तर मग आम्ही आमच्या जुन्या ओळखीच्या मद्यशाळेचा, साकीचा, पेल्याचा व मद्याचा विटाळ का मानावा? मराठी माणसांना सहज अ-मराठी प्रतीके मराठी गझलेने पचवली पाहिजेत, असे माझे स्वतःचे मत आहे.

येथे कुणाचाही पाणउतारा करण्याची माझी इच्छा नाही. आपापल्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या वडीलधाऱ्यांची किंवा समकालीनांची टर उडवून मला गझलचा झेंडा उभारायचा नाही. पण गझलेविषयी कोणतीही माहिती नसताना, किंवा मतला, मकता, काफ़िया, रदीफ़, शेर, मिसरा, उला, सानी इत्यादी काही ठराविक पारिभाषि शब्दांविषयी जुजबी माहिती असूनही गझलविषयी अनुदार भाष्ये करणारे काही कवी आणि तथाकथित समीक्षक महाराष्ट्रात आहेत.