कैफियत -४
गझलेच्या शेवटच्या, कवीचे टोपणनाव असलेल्या शेवटच्या शेराला "मकता" असे म्हणतात. हा मक्ता गझल कुणाची हे रसिकांना सांगत असे. पण आता मकत्याची गरज राहिलेली नाही.
पूर्वीच्या काळी छापखाने, नियतकालिके आणि वर्तमानपत्रे अस्तित्वात नव्हती त्या काळात गझल कुणाची हे कळण्यासाठी शेवटच्या शेरात म्हणजेच मकत्यात "तखल्लुस" म्हणजेच कवीचे टोपणनाव नमूद केले जाई. सर्वच काम हाताने करावे लागे. पण आज हजारो आणि लाखोंच्या संख्येत पुस्तके आणि वर्तमानपत्रे छापली जात असताना तखल्लुसरूपी विमा उतरवण्याची गरज राहिलेली नाही. मी स्वतः तखल्लुस वापरत नाही. आणि शेवटच्या शेरात तखल्लुस घालून एका अन्य उपयुक्त शब्दासाठी लागणारी जागा वाया घालवू नये, असे माझे मत आहे.
गझलेच्या शेरात, फक्त दोन ओळीत, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त सांगण्यासाठी प्रतीकात्मक शब्दांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, आजच्या परिस्थितीचे वर्णन करताना एक मुसलमान म्हणून कवी आपल्या शेरात चमन (उद्यान), बहार (वसंत), जा (स्थान) आणि आशियॊं (घरटे) अशा प्रतीकात्मक शब्दांचा कसा उपयोग करतो ते पाहा-
हमारे फूल, हमारा चमन, हमारी बहार
हमीं को जा नही मिलती है आशियॊ के लिए!
-फुले आमची आहेत. उद्यान आमचे आहे. वसंत (स्वातंत्र्य) आमचा आहे. (पण) आम्हालाच ह्या उद्यानात (म्हणजे देशात) घरट्यासाठी जागा मिळत नाही.
जे गाऱ्हाणे मांडण्यासाठी इतरांना पानेच्या पाने खरडावी लागली असती, ते गाऱ्हाणे फक्त चार प्रतीकात्मक शब्दांचा उपयोग करून कवीने केवळ दोन ओळींच्या एका शेरात प्रभावी रीतीने मांडले आहे. पण व्यापक दृष्टीने विचार केला तर हे गाऱ्हाणे भारताच्या साऱ्या सामान्य नागरिकांचेही असू शकते. म्हटले तर मुसलमान समाजाचे गाऱ्हाणे आणि म्हटले तर साऱ्या भारतीय जनतेचे गाऱ्हाणे!
गझलच्या बाबतीत भारतीय उर्दू कवींचे शिरोमणी कै. रघुपती सहाय "फिराक" गोरखपुरी आपल्या "उर्दू भाषा और साहित्य" या ग्रंथात पृष्ठ क्रमांक ३५१ वर म्हणतात, "गज़ल के शेरों के विषय सीमित नही है, फिर भी उस मे मुख्यतः करुणा, प्रेम व समर्पण के ही भाव प्रदर्शित किए जाते है. गज़लों में चूंकी एकही शेर में पूरी बात कह देनी होती है, इसलिए उन में प्रतीकात्मता का बहुत सहारा लिया जाता है और चूंकी एक-एक शब्द विभिन्न परिस्थितियों में असंख्य वस्तुओं का प्रतीक हो सकता है, इसलिए धीरे-धीरे गज़ल में व्यापकता की कला इतनी विकसित हो गयी है कि एकही शेर प्रतीक रूप में आध्यात्मिक, सामाजिक, राजनीतिक और व्यावहारिक जीवन को एक-सा लागू हो सकता है. इसी आधार पर दार्शनिक (
Philosophical) तथ्यों को कविता के साथ सामने लाने मे गज़ल का प्रयोग बहुत किया जाता है. इसलिए गज़ल की परंपरा गंभीरता और तत्त्वद्न्यान की परंपरा बन गयी है, यद्यपि उपरी दृष्टी से देखने पर उस मे आशिक - माशुक के चोंचलों के अलावा कुछ नही दिखाई देता. यही गज़ल की तारीफ़ है."
गझलेमध्ये मुख्य भाव, करुणा, प्रेम व समर्पण हे आहेत, असे फिराक साहेब म्हणतात. पण त्यांनी "भाव" शब्द वापरलेला आहे, "विषय" नव्हे. पण आता काळाप्रमाणे गझलही विकसित झालेली असल्यामुळे ती वरील "भाव" सोडून इतरही विषय हाताळू लागलेली आहे.
पुढे कै. रघुपती सहाय "फिराक" गोरखपुरी म्हणतात, "पुराने ज़मानेमें गज़लका एक और रूप प्रचलित था, जिसे 'गज़ले-मुसलसल' कहते हैं. इस में शेर अलग-अलग स्वतंत्र विषयों पर नही होते. बल्कि एकही विषय पर कहे हुए होते हैं. बल्कि उन में परस्पर सम्बंध भी होता है. "वर्तमान समय में नज़्मों (कविता) के कारण इस प्रकार की गज़ल की जरूरत ही नही रही."
ह्याचा अर्थ असा की, सध्या उर्दूत नेहमीची कविता एकाच विषयाला हात घालते आणि उर्दू गझलेमध्ये विविध विषय हाताळले जातात. गझलेच्या फॊर्ममध्ये एकाच विषयावर लिहिलेल्या रचना आज उर्दूत "नज़्म" (कविता) म्हणूनच ओळखल्या जातात. कारण त्यात फॊर्म कवितेचा असला तरी एकच विषय प्रत्येक शेरापाठोपाठ उलगडत जातो.
फिराक साहेबांनी प्रतीकात्मक शब्दांविषयी जे म्हटलेले आहे, तेही मराठी रसिकांनी आणि गझल लिहू पाहणाऱ्या तरुण पिढीने लक्षात घेतले पाहिजे. फक्त दोनच ओळींच्या एकाच शेरात एक संपूर्ण विश्व सामावून ह्यायचे असल्यामुळे शब्दांच्या खोगीरभरतीला शेरात कुठे वावच नसतो.
There is no room for the wastage of words in a couplet.
-
म्हणूनच प्रतीकात्मक शब्द वापरले जातात. आणि ह्या प्रतीकात्मक शब्दांचा परिणाम म्हणून एकाच शेराचे अनेक अर्थ लागतात आणि हीच शेराची खरी गंमत आहे!