वादळ !
.......................
वादळ !
.......................
लागेलही हवा तो मोती तुझ्या गळाला !
जाईल का परंतू गळ हा तुझा तळाला ?
इतक्यात हा असा का तू गोंधळून जाशी ?
सुरुवात होत आहे इतक्यात गोंधळाला !
येशी तहानलेला होऊन रोज येथे...
वर ठेवतोस नावे तू येथल्या जळाला !
जोडायचे कशाला ताटातुटीत नाते....
कुठल्यातरी पळाशी कुठल्यातरी पळाला ?
डोळे मिटूनसुद्धा बघ या तरूकडे तू...
आली तुझी तपस्या आता कुठे फळाला !
ज्याला कळावयाचे त्यालाच हे कळे की -
काहीच अर्थ नाही बुद्धीविना बळाला !
माझेच हात आता होऊन घाण गेले...
आता किती करावे मी स्वच्छ या मळाला ?
मातीपरी मऊ हो तू रोज रोज थोडा....
समजावतोच आहे मी रोज कातळाला !
या सोसण्यात जेव्हा आयुष्य गाडले मी...
उरलो पुरून तेव्हा माझ्याच मी छळाला !
शून्यापलीकडे त्या माझे-तुझे न काही....
तेथे महत्त्व आहे नुसतेच केवळाला !
आता बघू, किती तू आहेस झुंजणारा...
आलो तुझ्याकडे मी घेऊन वादळाला !
- प्रदीप कुलकर्णी
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
बुध, 03/12/2008 - 22:00
Permalink
चांगली... परंतू
थोडी टीकात्मक वाटली. नेहमीची मजा नाही आली.
कलोअ चूभूद्याघ्या
भूषण कटककर
बुध, 03/12/2008 - 22:19
Permalink
कोण?
माफ करा. आपल्याबद्दल मनात खरोखरच आदर आहे. पण मला माझे प्रश्न काही स्वस्थ बसू देत नाहीत. असेच प्रश्न 'करारनामे'च्या बाबतीत मला पडले होते.
१, २, ३, ५, ८, १० व ११ हे शेर बेसिकली कुणाला उद्देशून आहेत ते मला समजले नाही.
म्हणजे तसे समजले :-)
पण एखाद्याने संदर्भरहीत परिस्थितीमधे वाचले तर मी वर विचारलेला प्रश्न तो विचारू शकेल असे आपले मला वाटते. बाकी खरे सांगायचे तर मी आपल्या गझलांकडून अफाट अपेक्षा ठेवतो. वरील गझलेत त्या पूर्ण तर होत आहेतच वर आशय खरोखरच चांगला आहे.
खरे म्हणजे बर्याच दिवसात आपली गझल आली नाही म्हणुन मी तसा नाराजच होतो.
जयन्ता५२
बुध, 03/12/2008 - 23:11
Permalink
सहमत!
अजयशी सहमत!
पण सहजता व शब्दसंपदा मात्र नेहमी सारखीच दर्जेदार!
जयन्ता५२
कौतुक शिरोडकर
गुरु, 04/12/2008 - 10:28
Permalink
तू
मला वाटते जेथे हा 'तू ' नेमका निर्देशित नसतो तेव्हा तो आपल्यातलाच एक असतो. क्षणभरासाठी स्वतःला त्या 'तू ' च्या जागी ठेवले तर कदाचित हे जाणवेल. पण जे मला वाटते ते इतरांना वाटेल असा हट्ट नाही. भुषण यांनीही याच दृष्टीकोनातून शेर अनुभवले असतील. म्हणून भुषण यांची शंका रास्त वाटते. भुषण यांच्या माहीतीसाठी - मनोगतवर 'प्रदिप' यांच्या सुरेख कविता वाचवयास मिळतील. तेव्हा ते जर इथे आले नाही तर आपण तिथे जावे. नाराजी थोडी दुर होईल.
शून्यापलीकडे त्या माझे-तुझे न काही....
तेथे महत्त्व आहे नुसतेच केवळाला !
अजय, जयन्ता यांच्याशी मी सहमत आहेच.
प्रदीप कुलकर्णी
गुरु, 04/12/2008 - 16:06
Permalink
सगळ्यांचे मनापासून आभार
प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार.
ज्ञानेश.
गुरु, 04/12/2008 - 16:59
Permalink
असहमत...
वरील गझलही आपल्या इतर गझलांसारखी दर्जेदार आहे.
हे शेर आवडले-
लागेलही हवा तो मोती तुझ्या गळाला !
जाईल का परंतू गळ हा तुझा तळाला ?
इतक्यात हा असा का तू गोंधळून जाशी ?
सुरुवात होत आहे इतक्यात गोंधळाला !
येशी तहानलेला होऊन रोज येथे...
वर ठेवतोस नावे तू येथल्या जळाला !
जोडायचे कशाला ताटातुटीत नाते....
कुठल्यातरी पळाशी कुठल्यातरी पळाला ?
मातीपरी मऊ हो तू रोज रोज थोडा....
समजावतोच आहे मी रोज कातळाला !
आता बघू, किती तू आहेस झुंजणारा...
आलो तुझ्याकडे मी घेऊन वादळाला !
धन्यवाद.
चित्तरंजन भट
शुक्र, 05/12/2008 - 18:26
Permalink
प्रदीपराव,
प्रदीपराव, अगदी घणाघाती आणि दर्जेदार गझल आहे. फार फार आवडली.माझेच हात आता होऊन घाण गेले...
आता किती करावे मी स्वच्छ या मळाला ?
वाव्वा!
मातीपरी मऊ हो तू रोज रोज थोडा....
समजावतोच आहे मी रोज कातळाला !
वाव्वा!
जोडायचे कशाला ताटातुटीत नाते....
कुठल्यातरी पळाशी कुठल्यातरी पळाला ?
वाव्वा!
डोळे मिटूनसुद्धा बघ या तरूकडे तू...
आली तुझी तपस्या आता कुठे फळाला ! वावा! क्या बात है!
आजानुकर्ण
शनि, 06/12/2008 - 01:30
Permalink
सुरेख
अत्त्युत्तम गझल.
खालील शेर फारच आवडले...
लागेलही हवा तो मोती तुझ्या गळाला !
जाईल का परंतू गळ हा तुझा तळाला ?
इतक्यात हा असा का तू गोंधळून जाशी ?
सुरुवात होत आहे इतक्यात गोंधळाला !
माझेच हात आता होऊन घाण गेले...
आता किती करावे मी स्वच्छ या मळाला ?
आता बघू, किती तू आहेस झुंजणारा...
आलो तुझ्याकडे मी घेऊन वादळाला !
पुलस्ति
बुध, 10/12/2008 - 02:07
Permalink
वा!
पळ, फळ, कातळ, जळ, गोंधळ हे शेर फार आवडले!!
येशी तहानलेला होऊन रोज येथे...
वर ठेवतोस नावे तू येथल्या जळाला !
काय शेर आहे!!
समीर चव्हाण (not verified)
बुध, 10/12/2008 - 14:39
Permalink
व्वा
गझल फार फार आवडली, विशेषतः
जोडायचे कशाला ताटातुटीत नाते....
कुठल्यातरी पळाशी कुठल्यातरी पळाला ? डोळे मिटूनसुद्धा बघ या तरूकडे तू...
आली तुझी तपस्या आता कुठे फळाला !
माझेच हात आता होऊन घाण गेले...
आता किती करावे मी स्वच्छ या मळाला ?मातीपरी मऊ हो तू रोज रोज थोडा....
समजावतोच आहे मी रोज कातळाला !मात्र एक तक्रार आहे, बहुतेक शेरांमधे पहिल्या ओळीवरून काफिया लगेच स्पष्ट होतो, त्याने कधी-कधीमजा कमी होते, अर्थात्च हे माझे वैयक्तिक मत आहे.
संतोष कुलकर्णी
शनि, 13/12/2008 - 10:20
Permalink
गझल नव्हे ही....
प्रदीपजी,
(शीर्षक वाचून कुणी दचकू नये. मला माझ्या एका अपूर्ण गझलेचा शेर आठवला. तोच प्रतिसादही समजावा. आशय लक्षात घ्यावा. त्यावर प्रतिसादाची अपेक्षा नाही.)
गझल नव्हे ही... गाथा वाटे ़झंझावाताची..
सोसाट्याचा आशय वाही..वादळ शेरांचे...
बहोत खूब... प्रत्येक शेर वेगळे 'वादळ' आहे. गैरमुरद्दफ आहे. अस्सल आहे.
फारच आवडली...
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०