राहू दे
तिने पाहिले?पाहू दे!
नको म्हणाली?राहू दे!
विनाकारणे फुलारली?
गाते म्हटली?गाऊ दे!
कशास धावत जातो रे?
विरह तिलाही साहू दे!
उधाण आले दोहिकडे?
अटपत नाही?वाहू दे!
जात-पात ये सब झूठ है!
येते म्हणते,बाहू दे!
गझल:
एक मी निःशब्द किंकाळीच होतो...
ऐकण्यासाठी सुना बाजार होता
प्रतिसाद
भूषण कटककर
बुध, 03/12/2008 - 14:12
Permalink
सुंदर हाताळणी!
सन्माननीय मनीषा साधू,
आपण रचनेची हाताळणी फार सुंदर पद्धतीने केली आहेत.
तसेच आशयाच्या दृष्टीने आपली ही गझल मला अतिशय आवडली. अशी गझल प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद!
मात्र मतल्यात दोन्ही मिसर्यात घेतलेला 'हू' पुढे प्रत्येक ओळीत असावा अशी विनंती!
फुलारली अन विरह तिलाही साहू दे या खरोखरच उत्तम व नव्या वाटणार्या ओळी आहेत. फुलारली हा शब्दप्रयोग मी तरी पहिल्यांदाच वाचला. त्यातही 'विनाकारणे' फुलारली तर अप्रतिमच!
वृत्ताकडे पहावेत अशी नम्र विनंती!
शेवटच्या दोन शेरांपैकी 'आटपत' हा शब्द 'अटपत' असा लिहिणे आवश्यक आहे असे निदान मला तरी वाटते. तसेच 'झूठ' हा शब्द 'झुठ' असा लिहिणे आवश्यक आहे असेही मला वाटते.
जातपात ये सब झुठ है, येते म्हणते बाहू दे - ही ओळ अत्यंत सुंदर आहे. माझ्यामते 'बाहू दे' मधे आपल्याला 'हात दे ( साथ दे ) ' असे म्हणायचे असावे. तो अर्थ 'नेमकेपणाने' बाहू दे मधे जाणवत नाही. 'विसावयाला' बाहू दे असे म्हंटले तर जात पात या मुद्द्याशी संबंध राहीलच असे वाटत नाही. कदाचित 'आधाराला' बाहू दे चालावे.
अजय अनंत जोशी
बुध, 03/12/2008 - 17:08
Permalink
छान.
विषय छान.
एक गम्मत ...
नकोच मिस्किल हास्य तुझे
कराटेतले 'हा-हू' दे ..
कलोअ चूभूद्याघ्या
ज्ञानेश.
बुध, 03/12/2008 - 17:27
Permalink
छान.
कशास धावत जातो रे?
विरह तिलाही साहू दे!.. वा. चांगला शेर.
कौतुक शिरोडकर
गुरु, 04/12/2008 - 10:40
Permalink
सुरेख
सुरेख मांडणी.
विनाकारणे फुलारली?
गाते म्हटली?गाऊ दे!
गंभीर समीक्षक
गुरु, 11/12/2008 - 11:27
Permalink
मुक्त दाद!
तिने पाहिले?पाहू दे!
नको म्हणाली?राहू दे!
स्त्रीने गझल करू नये असे कुठेच म्हंटलेले नाही. संख्येने स्त्रीयांच्या गझला पुरुषांच्या गझलांपेक्षा बर्याच कमी असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे गझलेची निर्मीती जिथे झाली तिथे त्या काळात अत्यंत जुनाट पारंपारिक व घुसमट होणारे वातावरण होते. आज दिल्ली शहरातील विद्यार्थिनी इतर शहरात ( पुण्यासारख्या ) शिकायला येताना तेथील प्रगत ( ? ) संस्कृतीपण घेउन येताना दिसतात. म्हणजे इंग्रजी भाषेचा मुक्त वापर, अत्याधुनिक वेशभुषा, सौंदर्यसाधनांचा सहजतेने वापर ( जो पुण्यात नव्हताच असे नाही पण जरा तरी मागासलेला होता हे आम्ही स्वतः पाहिलेले आहे ), मधुन मधुन धुम्रकांडीचा आधार घेणे ( हेही काही फक्त दिल्लीच्याच विद्यार्थिनी करतात असेही नाही पण आमच्या लहानपणी व आत्ताही आम्हाला अजून आमच्या परिचयातली पुण्यातलीच एखादी मुलगी रस्त्यावर स्मोकिंग करताना आढळलेली नाही - पण म्हणुन तसे नसणारच असे नाही ), मध्यरात्रीपर्यंत नृत्यमजा लुटणे वगैरे. पण जेव्हा त्याच शहरात गझल निर्माण झाली तेव्हा तिथे बुरखा वापरणे, इतरात फारसे न मिसळणे वगैरे प्रकार होते. त्यामुळे अर्थातच सार्वजनिक जागी असलेला वावर व अनेक गोष्टींमधले अस्तित्व हे पुरूषवर्गाचेच अधिक असायचे. त्यामुळे गझलही बर्याच प्रमाणात पुरुषांकडुनच केली गेली. आता काळ पुष्कळ बदलला असल्यामुळे खरे तर 'गझल' मधे स्त्रीचा सहभाग झाल्यास त्याचे उत्स्फुर्त स्वागत झाले पाहिजे. एक अत्यंत सुंदर मतला रचला आहे कवीने. 'तिने पाहिले..पाहू दे...नको म्हणाली ...राहू दे! या ओळी खरोखरच गझलेच्या ओळी आहेत. गझलेत साध्या साध्या शब्दातून संवादरुपी ओळी रचून मन व्यक्त केले जाते. मतल्यात निश्चीतच संवाद होत आहे. ती पहात आहे यातून तिला कवीमधे ( किंवा कवी ज्याला सल्ला देत आहे त्याच्यामधे ) दिलचस्पी आहे हे उघड होत आहे पण ती नको म्हणणे यात तिला अजून पुरेशी शाश्वती नसावी ( की हे प्रेम व्यक्त व्हावे की नाही याची ) अथवा प्रेमातील प्रगती करणे सद्यपरिस्थितीमध्ये मान्य नसावे. आणि या गोष्टी मान्य व्हाव्यात असे कवीचे म्हणणे आहे कारण स्त्रीमनाचा थांगपत्ता लावत बसण्यापेक्षा स्त्रीच्या वागण्याचे अर्थ काढून मनोरंजन करून घेणे जास्त सुखकारक असते असे कवीचे म्हणणे आहे. सुंदर!
विनाकारणे फुलारली?
गाते म्हटली?गाऊ दे!
पहा! स्त्री विनाकारणे फुलारते म्हणजे काय? तर जेव्हा आपल्याला हे माहीत आहे की जगात कुठलीच गोष्ट विनाकारण होऊ शकत नाही त्यावेळी तिने फुलारण्याचे कारण फक्त 'त्याला' माहीत नाहीये एवढेच. ते कारण म्हणजे 'तिला तो आवडला असणे' हे असण्याचीच बरीचशी शक्यता आहे. यातून पण हेच दाखवले आहे की तुला आही कळत नाही पण तिने फुलारणे, गाणे या गोष्टींचे अर्थच हे आहेत की ती तुला भेटुन झालेला आनंद व्यक्त करू इच्छीत आहे. स्त्रीला आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे असाही एक अर्थ या शेरातून निघतो.
कशास धावत जातो रे?
विरह तिलाही साहू दे!
इथे अध्यारुत धरले गेले आहे की हा जो कोण 'तो' आहे त्याला असे वाटते की फक्त त्यालाच प्रेम वाटत असून 'तिला' प्रेम वाटत नाही पण खरे तर तिचेही प्रेम आहे तेव्हा तू कशाला उगाचच धावतोयस? अर्थातच या गझलेत 'ती' म्हणजे 'कवी' स्वतःच आहे. तेव्हा ते कवीला माहीत असणारच की तिचे त्याच्यावर प्रेम आहे. एक अत्यंत महत्वाचा मुद्दा ज्याला या शेरात हात घातला गेलेला आहे तो म्हणजे 'स्त्रीला विरहाचे दु:ख होणे'. शतकानुशतके गझलकारांनी पुरुषाच्या विरहातील दु:खावर हजारो गझल रचल्या. ( स्त्रीच्या विरहावर पण गझला आहेत पण फार कमी ). आणखीन एक मुद्दा इथे असा मांडण्यात आलेला आहे की 'विरह' हा प्रेमामध्ये अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्याने प्रेमाची तीव्रता प्रचंड वाढते. तेव्हा तिलाही ते दु:ख जरा समजुदेत असा सल्ला देण्यात येत आहे.
उधाण आले दोहिकडे?
अटपत नाही?वाहू दे!
इथे मुक्त प्रेमाचे समर्थन करण्यात आले आहे. दोन्हीकडे उधाण येणे किंवा येऊ शकणे याच्यासाठी मुक्त प्रेम असावेच लागते ( मुक्त म्हणजे मुक्तपणे व्यक्त करता येईल असे ) असे काही नाही. नीट पहा: जर हे प्रेम पतिपत्नीचे असले तर दोन्हीकडे उधाण आल्यास व ते वाहू दिल्यास जगाला किंवा समाजाला हरकत असण्याचे काही कारणच नाही. हे ते प्रेम आहे जे अजून समाजमान्य नाही. इथे स्त्री किती गुपित सांभाळणारी व व्यक्तिकरणापासून दूर राहणारी असते व पुरुषाने कसे पुढचे पाऊल घेतले पाहिजे हे सांगीतले आहे.
जात-पात ये सब झूठ है!
येते म्हणते,बाहू दे!
या शेरात सामाजिक भाव आला आहे. तो जरा इतर शेरांच्या स्वादापुढे खटकणारा वाटतो. मात्र यातही स्त्रीने पुरुषाकडुन प्रेमात काय काय अपेक्षा ठेवलेल्या असू शकतात त्याचे वर्णन आहे. 'मला तू माझ्या जातीमुळे नाकारणे तुला शोभत नाही व तो पुरुषार्थही नाही. जगाचा विरोध सहन करू पण मला तुझा आधार मिळायला पाहिजे' असा हा शेर आहे.
या गझलेतील हासिले गझल शेर आहे 'विरह तिलाही साहू दे'.
आम्ही आत्तापर्यंत या साईटवर बघितलेल्या सर्व स्त्री-गझलकारांच्या गझलांपेक्षा आम्हाला ही गजल अत्यंत पॉझिटीव्ह, आत्मविश्वासयुक्त व त्याचवेळेस कानाला गोडही वाटणारी अशी वाटली. कवीचे अभिनंदन! आमची अशी विनंति आहे की ज्यांना शक्य असेल व वेळ असेल त्या सर्वांनी प्रतिसाद देऊन या गझलेला मुक्त दाद द्यावी.