मोजके

आल्या क्षणात काही सवाल मोजके
गेल्या क्षणास केले बहाल मोजके


रडवून कोण गेले, हिशोब ना कधी
जपले मनात ओले रुमाल मोजके


अलवार आठवांची अबोल पावले
पिंगा भरात घाली टपाल मोजके


मी टाळतो कितीदा तरी पुन्हा पुन्हा
ये बोलण्यात माझ्या जहाल मोजके


देती मनूकथांचे सदैव दाखले
आहे अजून त्याचे हमाल मोजके


बखरीत नोंदलेले खरे असेल का ?
बोले न शब्द साक्षी महाल मोजके

गझल: 

प्रतिसाद

कौतूक,
मजा आली. मतल्यातल्या सानी मिसर्‍यात रदीफाचे प्रयोजन जरा डळमळीत वाटते आहे.
आल्या क्षणात काही सवाल मोजके
गेल्या क्षणास केले बहाल मोजके
रुमाल शेर मस्तच आहे. अतिशय छान शेर आहे. तसाच टपाल हा शेरही मस्त आहे.
हमाल अन महाल हे शेर मात्र समजले नाहीत. जाउदे. एखादी गोष्ट न समजणे हा खूपच जुना प्रॉब्लेम आहे माझा.
मस्त वाटली गझल!

रुमाल, टपाल उत्तम.
आल्या क्षणात काही सवाल मोजके
गेल्या क्षणास केले बहाल मोजके

या ठिकाणी
आल्या क्षणात... काही सवाल मोजके
गेल्या क्षणास... केले बहाल मोजके
असे आहे का? म्हणजे 'काही,केले आणि बहाल यांचे प्रयोजन 'सवाल' बरोबर आहे का? की..
गेल्या क्षणास केले .. बहाल मोजके   -  असे आहे?
मनूकथा आणि बखर यातून आपल्याला काय म्हणायचे आहे हे साधारण लक्षात येते. पण पूर्णपणे स्पष्ट होत नाही असे वाटते.
(खरे तर मला पूर्ण समजले आहे तुम्हाला काय म्हणावयाचे आहे ते. कारण मला संदर्भ माहित आहेत. तरीही जरा जपून लिहा.)
मा. भूषण,
खरे तर हमाल आणि महाल हे समजण्यासारखे आहेत. येथे मनूकथा आणि बखर यांवर लक्ष केंद्रित करावयांस हवे. समजते. (सध्या असे विचार सातत्याने ऐकायला मिळतात.)
कलोअ चूभूद्याघ्या

वरील  दोन्ही  मतांशी  मी  सहमत  आहे.
'मोजके' हा रदीफ सर्व  शेरांमधे  चपखल  बसत  नाही. मतला आणि हमाल हे शेर सोडले, तर इतर सर्व शेरात 'मोजके'  ऐवजी  'नेमके' हा  शब्द म्हणावासा  वाटतो.
चूभूद्याघ्या.

मा. अजय व मा. ज्ञानेश,
एक मिनिट!
आपल्याला काय म्हणायचे आहे?
माझी वाद घालण्याची प्रवृत्ती नसली तरी येथे परिस्थितीच तशी उद्भवली आहे.
मनुकथा व बखर मला माहिती असलेच पाहिजेत किंवा मी ते समजून घेतलेच पाहिजेत असा कवीचा किंवा त्याच्या रसिकांचा आग्रह असणे योग्य आहे का? ही मते एका गझलकाराला मान्य असणे हे रसिकानी त्या गझलेबाबत काय मत करावे यावर प्रभाव पाडते किंवा पाडू पाहते  हे योग्य आहे का? 
इथे बहुधा असा आग्रह धरताना गेलेला दिसतो की रसिकाला अन्य बरेच ज्ञान असायला हवे. माझ्या मते 'गझल' या काव्यप्रकारात ते आवश्यक नसायला पाहिजे.
मा. अजय - आपलीच ओळ - मी दु:खाला असे उचलुन घेतो जणु दु:ख हे एक बालक आहे
मा. ज्ञानेश -आपल्या तर बर्‍याच ओळी अशा आहेत ज्या अक्षरशः ग्रामीण माणसाला सुद्धा समजतील व भावतील.
आपल्याला दोघांना नेमके काय म्हणायचे आहे? की रसिकाने मनुकथा व बखर अशा गोष्टींचा किंवा तत्सम गोष्टींचा अभ्यास झाल्यावर मग गझलेचे रसिक व्हावे?
 हे मला मान्य होणे शक्य नाही. माफ करा.

मा. भूषण,
आपण दिलेला प्रतिसाद समजला नाही. मनुकथा किंवा बखर सर्वांना माहित असावेत असा कुणाचाच आग्रह नाही. 'कौतुक' यांनी उधृत केलेली गोष्ट 'पूर्णपणे स्पष्ट होत नाही असे वाटते' असेच मी म्हटले आहे. मला ती समजली. पण सर्वांना ती समजण्यास आणखी स्पष्ट व्हायला पाहिजे असेच मी म्हटले आहे.

रसिकाने मनुकथा व बखर अशा गोष्टींचा किंवा तत्सम गोष्टींचा अभ्यास झाल्यावर मग गझलेचे रसिक व्हावे?
या आपल्या म्हणण्याला आपलाच एक शेर ..
या युगाचा व्हायला गालीब लाखों झुंजले
रसिक ना त्या ताकदीचा व्यर्थ सारी शायरी


वादाचा कोणताही मुद्दा नाही. गझल चांगली आहे. स्पष्टपणा आणखी हवा इतकेच.
कलोअ चूभूद्याघ्या

मा. अजय,
कृपया आपल्या खालील विधानाचा अर्थ सांगावात. अर्थात हा वाद नाहीच आहे. पण स्पष्टीकरण व्हावे अशी माझी इच्छा! एखाद्याला मनुकथा वा बखरीत काय आहे हेच माहीत नसेल तर त्याला गझलरसिक म्हणुन पात्र समजणे योग्य होणार नाही असा थोडासा 'स्मेल' आपल्या या विधानातुन येतो असे मला तरी वाटते. माफ करा. पण हा वाद नसून चर्चा आहे. माझ्यामते 'गझल' ही सर्वांना कळणारी असलीच पाहिजे. म्हणुन तर मी 'करारनामे' या गझलेवर एवढ्या तीव्रतेने लिहीत होतो.
मा. भूषण,
खरे तर हमाल आणि महाल हे समजण्यासारखे आहेत. येथे मनूकथा आणि बखर यांवर लक्ष केंद्रित करावयांस हवे. समजते. (सध्या असे विचार सातत्याने ऐकायला मिळतात.)

(सध्या असे विचार सातत्याने ऐकायला मिळतात.) - निरनिराळ्या कविता आणि लेखांमधून. आपल्या वाचनात आले नसतील तर राहू देत. बाकी कौतूकच सांगेल.
गझल सर्वांना कळणारी असलीच पाहिजे - या मताशी मी पूर्णपणे सहमत नाही. काही अंशी आहे. सर्वांना सर्व विषयात रस नसतो. तसे वाचनही नसते. सर्वांना समजले पाहिजे असा आग्रह धरला तर त्यामुळे ठराविकच विषय येत राहतील.

जसे, मला उर्दू येत नाही. त्यामुळे काही शेर अनाकलनीय वाटतात. काही वेळा त्या त्या परिस्थितीचा संदर्भ देऊन लिहिलेले शेर असतात. ते सर्वांना समजणे शक्यच नाही. पण, शेरातील भावना थोडीफार समजू शकते. शिवाजीवर लिहिलेला शेर ज्याला शिवाजी माहित नसेल त्याला कसा कळणार? याचा अर्थ गझलकार किंवा रसिक दोघांचाही दोष नसताना सुद्धा अशा गोष्टी घडणारच.
आपल्याला समजले नाही असे आपण म्हणालात त्यावर माझा आक्षेप नाही. पण आपल्याही कानावरून या गोष्टी गेल्या असतील असे वाटले म्हणून लिहिले. बाकी हा मुद्दा तसा गौणच आहे.
कलोअ चूभूद्याघ्या

कोणताही वाद न होता निखळ चर्चा व्हावी हा सर्वांचा हेतू आहे यात आनंदच आहे. आधी मी मला अभिप्रेत असलेला थोडक्यात अर्थ मांडतो.
आल्या क्षणात काही सवाल मोजके
गेल्या क्षणास केले बहाल मोजके
येणारा प्रत्येक क्षण एखादा प्रश्न घेऊन येतोय व जाणारा प्रत्येक क्षण माझ्याकडून काहीना ना काही घेऊन जातो.
देती मनूकथांचे सदैव दाखले
आहे अजून त्याचे हमाल मोजके
'मनूकथा' हा मनूनी मांडलेल्या चातुर्वण्याच्या रूढीबद्द्ल  वापरलेला शब्द. मनूचा उल्लेख सातत्याने त्या संबधात माझ्या वाचनात आला आहे म्हणून. आजही त्या रूढीचा वा जातीव्यवस्थेचा पुरस्कार भोवती आढळतात. जे माझ्या मते मनूचेच हमाल आहेत.
बखरीत नोंदलेले खरे असेल का ?
बोले न शब्द साक्षी महाल मोजके
दादाजी कोंडदेव गुरू होते की नव्हते ? शिवरायांची जन्मतारीख कोणती ? वगैरे प्रश्न / वाद निश्चितच क्लेशदायक आहेत. बखरीतल्या मुद्याच्या खरेपणाबद्द्ल अनेक इतिहासाचार्य साशंक आहेत. दुर्दैवाने त्या इतिहासाची साक्ष असलेले महाल काही बोलू शकत नाही. अन्यथा हे वाद केव्हाच निकालात निघाले असते.
मुळात चर्चेला कारण हे नाही की कुणाला काही माहीत आहे की नाही. तर हे आहे की मी एक गझलकार म्हणून जेव्हा माझा मुद्दा एखाद्या शेरात गुंफतो तेव्हा त्यात नक्कीच कमी पडतोय. त्यामूळे या सार्‍या चर्चेला जबाबदार माझी अपरिपक्वता आहे जी मांडणी चुकवते. पण तरीही माझ्या सर्व गझलकार जेष्ठांना नम्र विनंती की मला अभिप्रेत असलेला अर्थ सहज समजेल अशा पद्धतीने या शेरात आपण बदल सुचवावेत.
आपण सार्‍यांनी माझ्या या रचनेला वेळ दिलात त्याबद्द्ल आभार.
 

भूषणजी,
तुमचा  भलताच गैरसमज झालेला दिसतोय.
मी  "वरील  दोन्ही  मतांशी" सहमत आहे म्हटलो तेव्हा  भूषण  आणि  अजय जोशी  या दोघांची मते मला अभिप्रेत होती.
भूषण  यांचे  'रदीफाचे  प्रयोजन डळमळीत' आणि महाल/हमाल  शेर समजत नाहीत हे मत, तसेच
जोशींचे- मनूकथा आणि बखर यातून आपल्याला काय म्हणायचे आहे हे साधारण लक्षात येते. पण पूर्णपणे स्पष्ट होत नाही... हे मत.
या दोन्ही  मतांशी  मी  थोडा थोडा सहमत. बस्स. एवढेच.
बाकी  'गझलचर्चा' या  प्रकाराची  मला जाम भिती  वाटते. (खास करून चर्चेत माझे नाव आल्यास..)
त्यामुळे  (मला वगळून) गझलेच्या  हितासाठी  चर्चा  सुरू  राहिल्यास हरकत नाही..!