मुंबई - इलाही जमादार

वरून दिसते आम्रतरूसम मोहरली मुंबई
हाय! परंतू ऋतू जाणतो पोखरली मुंबई

 

पोटासाठी अनाथ अगतिक आला आश्रयाला
निवार्‍यास अंथरली त्याने पांघरली मुंबई

 

लहान होती अल्लड होती एके काळी तीहि
अशी बहकली कुणीच नाही सावरली मुंबई

 

जशी केतकी बनात चाले सत्ता भुजंगांची
तशी अवस्था बघून इथली घाबरली मुंबई

 

तिच्या दुधावर उदंड झाली पहा तिची लेकुरे
बॉम्बस्फोट जाहले तेधवा हादरली मुंबई

 

काय आणखी असे वेगळे मुंग्यांचे वारूळ
अफाट गर्दी मधे बिचारी चेंगरली मुंबई

 

हात धुराचे सरकत सरकत कंठाशी पोचले
प्रदूषणाने फास अवळला गुदमरली मुंबई

 

कधी जिवाची होती आता जिवावरीहि उठली
विषकन्येसम मला 'इलाही' जाणवली मुंबई

 

                                                                       संग्रह - भावनांची वादळे

 

प्रतिसाद

ही गझल कुणाची आहे? दस्तुरखुद्द इलाही जमादार की मीर क्षीरसागर?

लहान होती अल्लड होती एके काळी तीहि
अशी बहकली कुणीच नाही सावरली मुंबई...
सुरेख शेर. अगदी  वास्तवदर्शी.
 
 

अर्थात ही गझल दस्तुरखुद्द इलाही जमादारजींचीच आहे.
मी एक सर्व सामान्य गझल रसिक आहे. गझल वाचायला मला खूप आवडते.
आणि ही विशिष्ट गझल सध्यस्थितिला फारच पूरक असल्याने ती सर्वांनी वाचावी असे वाटले.
 
आभारी आहे,
                   मीर क्षीरसागर.

मीर साहेब आभारी आहे.
वास्तवदर्ही गझल.

सामाजिक रचना लिहितानादेखील , ती कवितिक परिवेशातच उमलेल याचे  भान कवीना असावयास हवे..उपरोक्त गझल म्ह्णजे मुंबईचे सपाट वर्णन वाटते

'मुंबई' हा किंवा असे विषय हे गझलेचे विषय करणे तितकेसे योग्य नाही.
महान उर्दू कवींनी सुद्धा अनेक शेर आपल्या शहरावर रचले आहेत.
जफरने म्हंटले आहे की आवडत्या शहरात मला दफन करण्यात येणार नाही हे कळण्याचे दु:ख भयानक आहे. ( सम्राट बहादूरशाह जफर यांना अंतिम कालावधीत परदेशात अटकेत ठेवले गेले. दिल्लीपासून दूर उरलेला काळ काढायचा अन तिथेच मरायचे ही कल्पना त्यांना सहन होईना. त्यात नालायकपणाने त्यांच्याच राजपुत्रांची मुंडकी कापून त्यांच्या नाश्त्याच्या थाळीत त्यांना सर्व्ह करण्यात आली. इतकी निर्दयता नशिबात आल्यानंतर कवी जी रचना करेल ती काय असेल या विचार करा. अर्थात आम्ही हे सगळे सांगतोय यात काही विशेष नाही, कारण ते विविध पुस्तकात छापले गेले आहे. इथल्या अनेकांना ते माहीतही आहे. पण ज्यांना माहीत नसेल त्यांना हे वाचून कदाचित लक्षात यावे की किती प्रचंड क्रौर्याला सामोरे गेल्यावर अशा रचनांची निर्मीती होते. )
कितना है बदनसीब जफर दफ्न के लिये
दो गझ जमीभि मिल न सकी कुएयार मे
कहदो इन हसरतोंसे कही और जा बसे
इतनी जगह कहॉ है दिल्-ए-दागदारमे
( माझ्या इच्छांना कुणी सांगा की आता दुसरे एखादे मन शोधा, माझ्या मनात आता इतकी जागा राहिली नाही की मी आता एखाद्या इच्छेला बाळगून असावे )
उम्र-ए-दराझ मांगके लाये थे चार दिन
दो आरझू मे कटगये दो इन्तिजारमे
अत्यंत तीव्र भावना मनात निर्माण झाल्याशिवाय गझल करू नये असे फैज यांचे म्हणणे होते.
तेव्हा मुंबई हा विषय गझलेला फारसा योग्य नाही.
 

वरील गझलेला सपाट म्हणण्यापुर्वी  मा. अनंत ढवळे यांनी गझल नीट वाचावी. या गझलेला सपाट म्हणण्यात समीक्षेपेक्षा वैयक्तिक कारणे असल्याचे जाणवते. आणि 'कवितिक परिवेश' ह्यातुन तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे हे स्पष्ट केल्यास बरे होईल. कारण सदर गझलेत, गझलकाराने कुठेही गझलेची नजाकत ढळू दिलेली नाही असे मला वाटते.
आणि मा. गंभीर समीक्षक,
गझलेचे विषय काय फक्त प्रेम आणि अन्यायाचा प्रतिकार यांच्यापुरते मर्यादित असावे असे तुमचे म्हणणे आहे की काय? आणि जर महान उर्दू कवींनी सुद्धा अनेक शेर आपल्या शहरावर रचले आहेत, तर आताच्याच काळात गझलेला अशा संकुचीत बंधनात बांधण्याची गरज का वाटावी?

या गझलेला सपाट म्हणण्यात समीक्षेपेक्षा वैयक्तिक कारणे असल्याचे जाणवते.

बिनबुडाची विधाने करू नयेत,
वैयक्तिक कारणे असल्याचे जाणवते हे फार ढोबळ विधान आहे, ते वैयक्तिक आहे का हे सांगावे.
गझलेविश्यी बोलल्यास बरे होईल. तसे ही अनंत ढवळे कुठे ही म्हणत नाही की वरील रचना सपाट आहे.
सपाट आहे असे त्यांना वाटते. 

प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा पूर्ण हक्क आहे. मला ही वरील रचना सपा़़ट वाटत आहे. 

सन्माननीय 'मीर क्षीरसागर',
१. एखाद्या कवीची रसिकाने इतकी बाजू घेतल्याचे पाहून मला गहिवरून आले.
२. 'कवितिक परिवेशात उमलेल' या शब्दप्रयोगाचा अर्थ त्याच्या निर्मात्याने सांगीतलेला बरा!
३. पुण्यात काय चाललेय ते मला दिसतेय. मराठवाड्यात काय काय झालेय ते माहीत नाही.
४. मी अनंत ढवळ्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की ही रचना सपाट आहे. आपल्याला माझा राग येईल याची मला कल्पना आहे. पण माझा नाईलाज आहे.
५. 'वैयक्तिक कारणे' वगैरे गोष्टींचा उल्लेख इथे व्हावा का नाही ते 'विश्वस्त' ठरवतीलच!

गझल, सर्व प्रतिसाद व त्यावरचे प्रतिसाद वाचून आश्चर्य वाटले...खेद वाटतो. वास्तविक पाहता, ही भावनांची वादळे मधली म्हणजे जुनीच गझल आहे. नुकत्याच झालेल्या हल्ल्यांनंतर तिला उजाळा मिळावा या उद्देश्याने ती इथे पुन : प्रत्ययाखातर दिली असावी. त्यामागचा उद्देश्यही ध्यानात घेतला जावा. प्रतिसादामागचीही भूमिका लक्षात घेतली जावी. प्रतिसाद वा त्यावरचाही प्रतिसाद गझलेलाच वाहिलेला असावा. मला जाणवले ते असे.
गझल या विषयावर नसावी, हे मला पटले नाही. सर्वच गझलकारांनी सर्व भिडणार्‍या विषयांवर गझल होणे आक्षेपार्ह मानू नये, कचरू नये. प्रस्तुत गझल एक चांगली (सर्वोत्कृष्ट नव्हे) आहे.  तरीही काही शेरात सपाटपणा जाणवतो हे खरे आहे. आता इलाहींना किंवा कुणाला माझ्यासारख्याने त्यांच्या गझलेवर काही मत प्रदर्शित करावे हे आवडणार नाही. 'तुला काय कळतं ? तू किती खोलात आहेस..?' वगैरे  (माझ्यापुरते रास्त ) मुद्दे उपस्थित होतात.  पण मनापासून 'बिट्विन दि लाईन्स' वाचायची व समग्र समजून घेण्याची तयारी असली पाहिजे.  काही शेर या गझलेतले खरोखरच चांगले आहेत. मुंबई हे एक निमित्त / प्रतिमाही मानता येते.  मात्र,
पोटासाठी अनाथ अगतिक आला आश्रयाला
निवार्‍यास अंथरली त्याने पांघरली मुंबई
जशी केतकी बनात चाले सत्ता भुजंगांची
तशी अवस्था बघून इथली घाबरली मुंबई
.. या शेरांत लय गेल्याचे जाणवत नाही का ? विशेषत : पहिल्या ओळीत...!
तिच्या दुधावर उदंड झाली पहा तिची लेकुरे
बॉम्बस्फोट जाहले तेधवा हादरली मुंबई
..या शेरातील दोन ओळींतील परस्परसंबंध मला नाही कळला. कुणी समजावून सांगावा. मला ते आवडेल. मी माझे कमरसिकत्व मान्य करीन.

कधी जिवाची होती आता जिवावरीहि उठली
विषकन्येसम मला 'इलाही' जाणवली मुंबई
..हा शेर 'तखल्लुस्'साठी बेतल्यासारखा वाटतो..कारण तोवरच्या शेरांतील अलामत टाळली गेली आहे.
तरीही शेवटचे सांगतो (दडपण न बाळगता) गझल अगदीच टाकाऊ नाही. विषय तर नाहीच.
मान्यवरांनी मार्गदर्शन करावे.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

कवी तिलकधारी आज आपल्यात हवे होते. या गझलेवर फार सुंदर विवेचन केले असते त्यांनी.
( हा प्रतिसाद गझलेशी संबंधितच आहे, तेव्हा कृपया प्रकाशित करावा.)