मनात काही


आहे मनात काही
नाही खिशात काही!


नुसतेच भेटणे की
आहे मनात काही?


आषाढ हा कसा रे?
नाही नभात काही


नेईल काय कोणी?
नाही घरात काही


दे दुःख, आसवांची
नाही ददात काही


माझे असेच आहे
नाही कशात काही(जयन्ता५२)

 

गझल: 

प्रतिसाद

व्वा व्वा व्वा व्वा !
मान गये बॉस! काय गझल का काय? अप्रतिम! एक एक शेर सॉलीड आहे.
अक्षरशः सगळे शेर आवडले.
भन्नाट!

नुसतेच भेटणे की...आहे मनात काही? व्वा व्वा!

संपूर्ण गझल फार फार आवडली. एखाद्या शेराचा उल्लेख केल्यास दुसर्‍या शेराचा अपमान होईल.
कमीत कमी शब्दात 'जास्तीत जास्त' कसे लिहावे, याचा हा वस्तुपाठच आहे.
अभिनंदन.

खूपच छान गझल. मतल्यासह सर्वच सुरेख शेर .परत परत वाचावी ,मनात ठेवावी अशी गझल.

नुसतेच भेटणे की
आहे मनात काही?

तसेच
माझे असेच आहे
नाही कशात काहीआवडले...

भेटणे, माझे .... सुंदर
कलोअ
चूभूद्याघ्या

नुसतेच भेटणे की
आहे मनात काही?
वाव्वाव्वा!

माझे असेच आहे
आहे मनात काही?
वाव्वा!
ह्या दोन द्विपदी तर अगदी सुरेख झाल्या आहेत. जयंतराव, एकंदर चांगली झाली आहे गझल. अभिनंदन!

नाही नाही म्हणता बरेच काही साधलेत जयंतराव.

नुसतेच भेटणे की
आहे मनात काही?
- सुंदर...सुंदर !

दे दुःख, आसवांची -
- नाही ददात काही
- छान...


माझे असेच आहे
नाही कशात काही
वा...वा...अप्रतिम.
 
जयंतराव, आवडली गझल.  वरील शेर तर फारच आवडले.  छोट्या वृत्तात तुम्ही वारंवार लिहीत असता...ठीक आहे; पण मी आता तुमच्या पल्लेदार गझलेची वाट पाहत आहे...तुम्ही नक्कीच लिहाल अशी जोरदार गझल.....