सांग ना

रोज रोज मज हवेत भास का तुझे
सांग ना तरंगतात श्वास का तुझे?

बोललो कुठे? अनंत काळ लोटला
अजूनही कणाकणात भास का तुझे

सांग काय माखलेस पाकळीत तू
जाळती मरंदही फुलास का तुझे

येउनी समोर आज मौन तू जरी
बोलतात शब्द-शब्द श्वास का तुझे

लावता सुगंध तूच घेरतो मला
गंधही दिलेस अत्तरास का तुझे

ओढतो मिठीत लाज-लाज वाटते
कल्पनेतही खट्याळ भास का तुझे

गझल: 

प्रतिसाद

चांगली गझल आहे. मतल्यामधे 'हवेत' या शब्दाचा अर्थ 'पाहिजेत' असा नसून 'हवेमधे' असा आहे हे कळायला जरा वेळ लागला. भास हा काफिया तीनवेळा आला आहे, पण प्रत्येकवेळी पटण्यासारखा आला आहे. अत्तर हा शेर आवडला.
धन्यवाद!

रोज रोज मज हवेत भास का तुझे
सांग ना तरंगतात श्वास का तुझे?
'कवयित्री' या शब्दासाठी आम्ही 'कवी' हाच शब्द वापरत आहोत. या शेराची खासियत म्हणजे, एकदा फक्त हा शेर गुणगुणुन पहा. 'श्वास' हा एक शब्द सोडला तर बाकीचे शब्द उच्चारताना जीभेला काहीही विशेष प्रयास पडत नाहीत. गझल रचताना ती अर्थ, खयाल याबरोबरच किती सहजतेने मनात ( आधी कानात अन मग मनात ) पोचणारी आहे ह्याला महत्व दिले पाहिजे अन इथे ते दिले गेले आहे असे नक्कीच वाटते. हा खयालही चांगला आहे, पण एक, तो गीत अन गझल या दोघांच्या सीमारेषेवर उभा राहुन कवीकडे आशेने बघत आहे की कधी मला कवी पूर्णपणे 'गझल' या मळ्यात आणतोय.

बोललो कुठे? अनंत काळ लोटला
गालगा लगा  लगाल गाल गालगा

अजूनही कणाकणात भास का तुझे
लगालगा लगालगाल गाल गा लगा
घसरण झाली आहे अन वर परत खयाल पण खूप वेळा वापरलेला आहे.


सांग काय माखलेस पाकळीत तू
जाळती मरंदही फुलास का तुझे
व्वाह! फार सुंदर शेर आहे.

येउनी समोर आज मौन तू जरी
बोलतात शब्द-शब्द श्वास का तुझे
श्वास तरंगतात अन श्वास बोलतात यात दुर्दैवाने फारसे वैविध्य ( अर्थाच्या अंगाने ) भासत नाही. मात्र दोन्ही शेर सहज अन चांगले. त्यातल्यात्यात 'तरंगणारा' शेर जास्त चांगला आहे.

लावता सुगंध तूच घेरतो मला
गंधही दिलेस अत्तरास का तुझे
'दिलेस' मधे जो 'स' आहे तो 'घेरतो' मधे घ्यायला कवीला 'वृत्तीय' अडचण होती हे मान्य. पण 'घेरशी' हा एक पर्याय होता की.  तसे 'भासशी' , ' आठवी' वगैरे इतर अनेक पर्याय विचारात घेतले जाऊ शकतात. पण मुख्य प्रश्न तो नाहीये. मुख्य प्रश्न हा आहे की आत्तापर्यंतच्या शेरांमधून साधारण एका विशिष्ट रंगाचेच मुद्दे येतायत असा भास का बरे व्हावा?  कवीच्या ( कवयित्रीच्या ) प्रियकराची अनुपस्थिती, ती सतत जाणवणे, त्याची कुठल्या ना कुठल्या गोष्टीमधुन आठवण होत राहणे यापुढे ही गझल जाताना दिसत नाही असे वाटते खरे जरासे.

ओढतो मिठीत लाज-लाज वाटते
कल्पनेतही खट्याळ भास का तुझे
हा शेर सवंगतेकडे जात आहे. लावणीमधे अशा स्वरुपाच्या कल्पनांचे अस्तित्व पटते. गझलेत प्रियकर नुसता अचानक समोर दिसला तरी प्रेयसीला 'लाज' वाटणे हे शक्य असू शकत असताना इतकी ऑब्व्हियस ओळ का घेतली ते समजत नाही.
मतला आणि मरंद या शेरांचा विचार करता गझल ठीक व चांगली च्या सीमारेषेवरील वाटते.
१०० पैकी ५०

लावता सुगंध तूच घेरतो मला
गंधही दिलेस अत्तरास का तुझे....

वा वा...

बोललो कुठे? अनंत काळ लोटला
अजूनही कणाकणात भास का तुझे

येउनी समोर आज मौन तू जरी
बोलतात शब्द-शब्द श्वास का तुझे

हे शेर ़ खास आवडले.....:)

गझल आवडली
बोललो कुठे? अनंत काळ लोटला
अजूनही कणाकणात भास का तुझे

सांग काय माखलेस पाकळीत तू
जाळती मरंदही फुलास का तुझे

येउनी समोर आज मौन तू जरी
बोलतात शब्द-शब्द श्वास का तुझे

रोज रोज मज हवेत भास का तुझे
सांग ना तरंगतात श्वास का तुझे?

वा!
लावता सुगंध तूच घेरतो मला
गंधही दिलेस अत्तरास का तुझे
सुरेख!!
मला
एवढा नसावा माज तुझ्या चाफ्याला
गात्रांत तुझ्या कविता दरवळली माझी

ही माझ्या एका अप्रकाशित गझलेतली द्विपदी आठवली.