जाणीव
आभास होत मजला आवाज येत होता
जो तो खुल्या दिलाने मज दोष देत होता
रेंगाळल्या नभाला पाहून समजले.. तो -
बरसून मजसि त्याचे अस्तित्व देत होता
करण्यास नाव पुढती अनमोल देह झिजला
नावासहीत अंती तोही चितेत होता
कंटाळल्या जिवांनी घरटेच लांब नेता..
ती ही खुशाल होती, तो ही मजेत होता
तालात ख्याल होता, ख्यालास दाद होती,
आनंद एवढा की - जो तो नशेत होता
उंदीर साथ देता गावेच ओस पडली
ढुंढाळिता जगाला.. मृत्यू कवेत होता
जाणीव होत असते विपरीत काय याची;
जे जे म्हणाल माझे - ते ते अचेत होता
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
मंगळ, 18/11/2008 - 17:39
Permalink
खुल्या दिल्याने
मतला, उंदीर व अचेत होता हे उत्तम शेर आहेत. धन्यवाद.
गंभीर समीक्षक
रवि, 23/11/2008 - 01:15
Permalink
गझल!
आभास होत मजला आवाज येत होता
जो तो खुल्या दिलाने मज दोष देत होता
विचित्र शेर! 'जो तो खुल्या दिलाने मज दोष देत होता' हा आवाज 'आभास' झाल्यामुळे येत आहे. म्हणजे वास्तवात कुणीच कवीला दोष देत नाहीये. आभास हा सत्याची अनुपस्थिती प्रदर्शित करतो. याचा अर्थ कवी अशा मानसिकतेमधे आहे जिथे त्याला आभास होत आहेत की सगळे त्याला दोष देत आहेत. आता असे आभास त्याला प्रिय आहेत की अप्रिय आहेत हा एक वेगळा विषय आहे. पण त्याला कुणीही दोष देत नाहीये हे त्याला ज्ञात आहे. पूर्णपणे मनोव्यापारांशी निगडीत असा शेर आहे. म्हणजे मला कुणी दोष देत नाही पण मला असे वाटते की सगळे मला दोष देत आहेत.
रेंगाळल्या नभाला पाहून समजले.. तो -
बरसून मजसि त्याचे अस्तित्व देत होता
मित्रांनो, या शेरातील सगळ्यात मह्त्वाचा शब्द जर कुठला असेल तर तो आहे 'रेंगाळल्या'! एखाद्या माणसाने जर एखाद्यासाठी काही केले तर करणारा माणूस कृतज्ञतेच्या अपेक्षेमधे तिथेच थांबतो. तो निरपेक्ष प्रवृत्तीने निघून जात नाही. खरे तर हा एक अत्यंत श्रेष्ठ शेर म्हणता येईल. इथे कवी युगायुगांपासून शुष्क आहे. भावनेच्या ओलाव्याच्या अभावामुळे, प्रेमाच्या अभावामुळे वगैरे! इथे जेव्हा थोडासा पाऊस पडतो, तेव्हा कवी 'लौकीक अर्थाने' ओला होतो. म्हणजे कवीचे बाह्य रूप ओले होते. ते ओले करणार्या नभाला असे वाटते की त्याने कवीसाठी किती केले. असे वाटल्यामुळे आकाश कवीकडुन प्रशंसेची, कृतज्ञतेची अपेक्षा करत तिथेच थांबते. इथे नभाला जे 'पुल्लिंग' प्रदान करण्यात आले आहे ते मात्र भारतीय राज्यघटनेस अनुसरून वाटत नाही. आपल्या देशात 'ते नभ' असे म्हणत असून कवीने त्याचा उल्लेख 'तो नभ' असा केला आहे. इथे ढग हा शब्द अभिप्रेत असावा. अर्थात इथे 'तो' जर नभ नसेलच अन दुसराच कुणीतरी ( ईश्वर वगैरे ) असेल तर तो वेगळा भाग आहे. पण मग तसे नेमके स्पष्ट होत नाही.
करण्यास नाव पुढती अनमोल देह झिजला
नावासहीत अंती तोही चितेत होता
या शेरातील अर्थ खरे तर प्रत्येक कवीने ( इतिहासातील ) आजपर्यंत मांडलेलाच आहे. खालील शेर पहा.
याद रख सिकंदरके हौसले तो आली थे
जब गया था दुनियासे दोनो हाथ खाली थे ( ही गझल नाहीये )
या सारखे किंवा याच्याशी साधर्म्य साधणारे अनंत शेर उर्दू अन मराठीमधे रचले गेले आहेत. तरीही, एक कवी म्हणुन व एक माणूस म्हणुन, एखाद्या माणसाच्या मनात नैसर्गीकरीत्या येणारे विचार हे बर्याच अंशी सारखे असणारच. परंतू या शेरातील थोडेसे वेगळेपण असे की इथे देहाला 'अनमोल' ही संज्ञा देण्यात आली आहे. हा शेर अनुभुतीपेक्षा 'तत्वज्ञाना'कडे झुकणारा वाटतो. हा शेर 'गझलेचा' नाही.
कंटाळल्या जिवांनी घरटेच लांब नेता..
ती ही खुशाल होती, तो ही मजेत होता
'अर्थामधे अस्पष्टता वाटणे' ही वाचकाची अडचण असल्यास ठीक आहे, पण 'संदिग्धता टाळू न शकणे' ही कवीची अडचण असल्यास ती कवीने दूर करावी. तसे यावर खूप भाष्य व कल्पना विलास करता येतील. पण ते सध्या 'आउट ऑफ प्लेस' वाटेल.
तालात ख्याल होता, ख्यालास दाद होती,
आनंद एवढा की - जो तो नशेत होता
हा शेर एका वेगळ्याच मूडचा आहे. या शेराचे अनेक अर्थही आहेत. ढोबळमानाने दिसणारा अर्थ म्हणजे जे काय चाललेले होते ते चांगले समजले जात होते कारण जो तो नशेत होता, व जो तो नशेत होता हे आनंददायी आहे. पण एक छुपा अर्थ हा की खरे तर जे काय चाललेले होते ते चांगले नव्हते, पण तरीही चांगले समजले जात होते कारण तसे समजणारे व त्यांना तसे समजायला लावणारे हे सगळेच एका नशेमधे होते.
उंदीर साथ देता गावेच ओस पडली
ढुंढाळिता जगाला.. मृत्यू कवेत होता
आमच्यामते हा शेर गझलेच्या एकंदर श्रुंगारामधे अनावश्यक ठरतो. इथे कवीचा गैरसमज होऊ नये. प्रत्येक व्यक्तीचे एक व्यक्तीमत्व असते तसे प्रत्येक मानवाच्या निर्मीतीचेही असते. त्या व्यक्तिमत्वाला तडे जातील असे श्रुंगार करणे अयोग्य आहे असे आमचे मत आहे.
जाणीव होत असते विपरीत काय याची;
जे जे म्हणाल माझे - ते ते अचेत होता
सुंदर शेर! परत तत्वज्ञान! पण चांगली शब्दरचना! या शेरामधे फक्त एक छोटासा बदल केला तर हा शेर म्हणजे एक जातीवंत गझल-शेर होऊ शकेल असा विचार चाटुन गेला. तो बदल म्हणजे 'असते' या शब्दाऐवजी 'गेली' हा शब्द वापरणे. अर्थात आम्ही तसे काही सुचवणे योग्य नाही. पण 'गेली' या शब्दामुळे त्या शेराचा जो पूर्ण 'तत्वज्ञानाचा' रंग होता त्याच्यात 'अनुभुती'चा रंग मिळतो व 'शेर भावणे' नावाच्या प्रक्रियेला बराच हातभार लागतो.
अचेत हे विशेषण, ' नेत देत ' हे शब्द क्रिया दर्शवणारे तर 'कवेत, नशेत, मजेत' ही वर्णने विशेषणात्मक असतानाच 'कशाच्यातरी आत' होता असे दर्शवणारी आहेत. काफिया सैल आहे. पण तो मुळीच दुर्गुण ठरू शकत नाही. कारण इतके तंत्राकडे बघायचे म्हंतले तर रसग्रहणच अवघड व्हायचे. फक्त गझल ही 'आरती, अभंग, लावणी, भावगीत, मुक्तछंद, क्रांतिगीत' वगैरेहून वेगळी ( अन काहीजणांच्या दृष्टीकोनातून श्रेष्ठ ) ठरण्याचे मूलभूत कारण हे आहे की त्याच्यात 'अनुभुती' ला अत्यंत मह्त्व असते. उदाहरणे पहा:
माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी - ही भक्ती आहे.
हात नका लावू माझ्या साडीला - हा श्रुंगाररस आहे.
जय देव जय देव जय पांडुरंगा - आरती ( स्तुती महत्वाची, प्रसन्न करुन घेण्यासाठी )
तोच चंद्रमा नभात - काय ते आपण जाणताच!
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार किंवा बलसागर भारत होवो - आपण जाणताच.
शोधिसी मानवा राउळी मंदिरी - तत्वज्ञान!
चाँदके साथ कई दर्द पुराने निकले..कितने गम थे जो तेरे गम के बहाने निकले - गझल!
इथे अनुभुती ही जरुरी नाही की स्वतःची असेल. परकायाप्रवेशाने काही शेर गुंफणे ही पण गझलकाराची जबाबदारी आहे.
एकंदर गझल चांगली ( आशय, वृत्त व 'अहं ब्रह्मास्मि' या रचनेच्या पार्श्वभूमीवर ) !
१०० पैकी ५२.