नवरे
द्यूतात लावणारे धर्मात याच नवरे
एकाच बायकोच्या भोगात पाच नवरे
भरली मनात कोणी लावण्यखाण परकी
पत्नीस टाळण्याची देतात लाच नवरे
संसार जोडताना मरतात बायका अन
पाहून बारबाला करतात नाच नवरे
विश्वास बायकोचा रामासही न होता
शंकेत देत जाती ज्वालात आच नवरे
हुंडा लगाम यांचा, चाबूक पौरुषाचा
मारी विवाह-घोड्या पोटात टाच नवरे
होताच रात यांची मर्दानगी उफाळे
दु:खात षंढ, वरती, बनतात जाच नवरे
गझल:
प्रतिसाद
ज्ञानेश.
शुक्र, 14/11/2008 - 09:32
Permalink
विश्वास बायकोचा रामासही न होता...
वाह व्वा..
चांगला विषय, उत्तम सादरीकरण.
मतला सर्वाधिक आवडला.
भूषण कटककर
शुक्र, 14/11/2008 - 09:47
Permalink
धन्यवाद व ईंग्लीश!
ज्ञानेश,
धन्यवाद!
मी स्वतः ईंग्लीश शब्द वापरण्याच्या ( गझलेत ) पूर्ण विरुद्ध आहे. मात्र 'बारबाला' या शब्दासाठी मला पर्यायी मराठी शब्द सुचला नाही ( त्यातील 'बार' हा ईंग्लीश शब्द आहे ).
पाहून साकियेला - असे म्हणणे गैर ठरले असते कारण साकी हा शब्द उर्दू असून त्याचा अर्थ बारबाला असा नेमका होत नाही.
मद्यबाला - हे ही अनुचित झाले असते कारण मद्य व बाला यांची जोड वाचल्यावर याला 'बारबाला' म्हणायचे आहे हे लक्षात आलेच असते असे नाही.
पाहून नर्तिकेला - हेही माझ्यामते जमत नाही कारण नर्तिका ही व्यवस्थित शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेऊन अरंगेत्रम वगैरे करणारीही असू शकते. तेव्हा ती नर्तिका व्यसनाधीनतेच्या क्षेत्रामधील नर्तिका आहे हे स्पष्ट झालेच असते असे नाही.
स्पष्टीकरण देण्याचे कारण एवढेच की दारूशाळेतील नर्तकीवर नवरे पैसे उधळतात हे शुद्ध मराठीमधे आनंदकंदात कसे बसवायचे यावर आपले विचार मांडावेत ही विनंती!
धन्यवाद!
अजय अनंत जोशी
शुक्र, 14/11/2008 - 09:52
Permalink
दृष्टीकोन?
विश्वास बायकोचा रामासही न होता
शंकेत देत जाती ज्वालात आच नवरे
वरील विधान कोणत्या दृष्टीकोनातून आहे?
माझे विधान ...
'विश्वास बायकोचा रामासही न होता' ...
खोट्याच दाखल्यांना देतात आंच नवरे
कलोअ चूभूद्याघ्या
भूषण कटककर
शुक्र, 14/11/2008 - 10:04
Permalink
दृष्टीकोन
श्री अजय,
धन्यवाद!
माझ्यामते, रजकाने उपस्थित केलेल्या शंकेवर, इतके प्रचंड युद्ध करून, रावणाला यमसदनी धाडून, रामाने ज्या आपल्या पत्नीला परत आणले होते ( ज्यासाठी प्रचंड जीवितहानि झाली ) त्या पत्नीला रामानेच अग्नीपरिक्षा द्यायला भाग पाडणे हे अयोग्य आहे. ते दोघेही समाजाच्या दूष्ट मनोवृत्तीला विटुन परत राज्यत्याग करून वनवासाला गेले असते तर समजण्यासारखे होते. पण सीतेवर संशय घेणे योग्य होते असे वाटत नाही. अर्थात त्या परीक्षेने टीकाकारांची तोंडे पाहण्यालायक झाली हे मी जाणतो, पण रामाची भूमिका समजली नाही. उलट स्त्रीचा आदर व्हावा यासाठी अशा परीक्षा न घेण्याचा पायंडा पाडण्याची भूमिका घेणे जास्त योग्य ठरले असते असे मला वाटते.
म्हणुन मी त्या कृत्याला वरील शब्दात शब्दबद्ध केले आहे.
अजय अनंत जोशी
शुक्र, 14/11/2008 - 10:38
Permalink
अरेरे!
......
म्हणुन मी त्या कृत्याला वरील शब्दात शब्दबद्ध केले आहे.
या तुमच्या म्हणण्याला मी एकच सांगेन की, मूळ वाल्मीकी रामायण पुन्हा वाचा. ते मराठीतही जसेच्या तसे मिळते. रामाने सीतेवर संशय घेतलेला नाही. केवळ सीतेसाठी जीवितहानी झालेली नाही. 'इलियड' आणि 'रामायण' या पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. पण, तथाकथित अभ्यासकांनी तसे मांडलेले आहे. तुम्ही त्यातले बनू नका. दांभिक अभ्यासकांवर विश्वास ठेवू नका. बेजबाबदार विधाने करू नका. आम्ही सर्व तुमचा गजलकार म्हणून आदर करतो.
कलोअ चूभूद्याघ्या
अजय अनंत जोशी
शुक्र, 14/11/2008 - 10:52
Permalink
तरी हे सुंदर...
संसार जोडताना मरतात बायका अन
पाहून बारबाला करतात नाच नवरे
मस्त ओळी.
कलोअ चूभूद्याघ्या
भूषण कटककर
शुक्र, 14/11/2008 - 10:53
Permalink
ओके
श्री अजय,
ओके. प्रतिसादापद्दल धन्यवाद!
फक्त एकच! समाजाने उपस्थित केलेल्या शंकेवर आपल्या पत्नीला परीक्षा द्यायला लावणे ( ते सुद्धा समाजाची तोंडे बंद पडावीत म्हणुन ) हे मला व्यक्तिशः रुचणारे नव्हते. पण ठीक आहे. लोकशाही असली तरी हा विषय वादग्रस्त आहे, तेव्हा मी जास्त काही बोलू इच्छीत नाही. आपले म्हणणे मान्य आहे.
गंभीर समीक्षक
शुक्र, 14/11/2008 - 19:01
Permalink
द्यूतात
द्यूतात लावणारे धर्मात याच नवरे
एकाच बायकोच्या भोगात पाच नवरे
युधिष्ठिराने आयुष्यात एकच चूक केली. ती सुद्धा त्याला स्वतःला चूक वाटतच नव्हती. त्यावर हा अत्यंत जहरी शेर आहे. अर्जून जेव्हा द्रौपदीला जिंकुन ( त्याकाळी पत्नी जिंकुन घ्यावी लागायची - आता लग्न केले की मिळतात ) आपल्या भावांसह घरी परतला तेव्हा सवयीने आईला म्हणाला, " आई बघ मी काय आणलय". ( तो अजोड धनुर्धर असल्यामुळे नेहमीच काहीतरी आणत असावा ). कुंतीपण सवयीने म्हणाली, " जे काय असेल ते वाटुन घ्या सारेजण". तिला बहुधा अर्जुनाच्या भीमाबरोबर होणार्या अध्यात्मिक मतभेदांचे पूर्ण ज्ञान असल्यामुळे तसे म्हणाली असावी. त्यामुळे मतल्याची दुसरी ओळ निर्माण होण्यास कवीला मदत मिळाली.
भरली मनात कोणी लावण्यखाण परकी
पत्नीस टाळण्याची देतात लाच नवरे
काही काही वेळा काही काही शेर हे निरिक्षणातून येतात तर काही काही स्वानुभवातुन! इथे कवी एक सांगायला विसरला असावा. परकी लावण्यखाण मनात भरायला काही विशेष लागत नाही, पण तिच्या मनात कवी भरायला काहीतरी पुरेसे कारण तर पाहिजे ना? तिच्या मनात जर कवी भरला नाही तर लाच देण्याची वेळ येऊ नये असा आमचा कयास आहे.
संसार जोडताना मरतात बायका अन
पाहून बारबाला करतात नाच नवरे
आम्हाला आधी वाटले की बारबालेशी विवाह करणार्या माणसांबद्दलच कवी लिहित आहे. पण नाही. तो असे लिहितो आहे की एकीकडे बायका ( लग्नाच्या ) बिचार्या संसाराच्या गाड्यात मरतायत अन नवरा मात्र मद्यशाळेत जाऊन तेथील नर्तकीचे नृत्य पाहुन स्वतःही नृत्य करतोय. पण आमच्या माहितीप्रमाणे अशा जागा दोन तीन वर्षांपुर्वीच बंद पाडल्या गेल्या. म्हणजे संसार करण्याच्या नव्हे, बारबालांना पाहुन नाच करण्याच्या. कवीने हा शेर बहुधा अजुनही कुठुन कुठुन त्यासंदर्भातल्या पकडापकडीच्या बातम्या येतात त्या अनुषंगाने रचला असावा.
विश्वास बायकोचा रामासही न होता
शंकेत देत जाती ज्वालात आच नवरे
कवी एकदा त्रेता, एकदा द्वापर, एकदा कलि तर एकदा सत्ययुगात भ्रमण करत आहे. बहुधा सोबत नारद असावेत. कवीचा वावर असाच अफाट असावा. कधीही, कुठेही! हा शेर सत्ययुगात प्रकाशित झाला असता तर कवीवर काय गुदरले असते याचा अंदाज येऊ शकत नाही.
हुंडा लगाम यांचा, चाबूक पौरुषाचा
मारी विवाह-घोड्या पोटात टाच नवरे
लाच, नाच, आच या शब्दांसारखा आणखीन एखादा शब्द काय बरे या प्रश्नाचे इन्स्टंट मिळणारे उत्तर म्हणजे 'टाच'. बर टाचेचे काय काय होते, ती फाटते ( चपलेची असली तर ), ती मारतात ( घोड्याचे पोट असले तर ) ! यातून अशा मधाळ शेरांची निर्मीती होते.
होताच रात यांची मर्दानगी उफाळे
दु:खात षंढ, वरती, बनतात जाच नवरे
हा मात्र एक खरच चांगला शेर आहे.
एकंदर काही विशिष्ट परिस्थितीतील व मनस्थितीतील महिला वर्गाकडुन प्रचंड प्रशंसा होईल अशी गझल.
१०० पैकी ३८
भूषण कटककर
शुक्र, 14/11/2008 - 23:16
Permalink
श्री गंभीर
श्री गंभीर समीक्षक,
आपले उतारे वाचून दोन वेगवेगळे आनंद झाले.
एक म्हणजे आपण माझी दखल घेतलीत, अन,
दुसरे म्हणजे बर्यापैकी विनोद करता आपण!
मधुन अधुन खरी समीक्षाही केलीत तर जरा बरे होईल.
अजय अनंत जोशी
शनि, 15/11/2008 - 17:17
Permalink
गंभीर?
द्यूतात लावणारे धर्मात याच नवरे
एकाच बायकोच्या भोगात पाच नवरे
"युधिष्ठिराने आयुष्यात एकच चूक केली. ती सुद्धा त्याला स्वतःला चूक वाटतच नव्हती. त्यावर हा अत्यंत जहरी शेर आहे. अर्जून जेव्हा द्रौपदीला जिंकुन ( त्याकाळी पत्नी जिंकुन घ्यावी लागायची - आता लग्न केले की मिळतात ) आपल्या भावांसह घरी परतला तेव्हा सवयीने आईला म्हणाला, " आई बघ मी काय आणलय". ( तो अजोड धनुर्धर असल्यामुळे नेहमीच काहीतरी आणत असावा ). कुंतीपण सवयीने म्हणाली, " जे काय असेल ते वाटुन घ्या सारेजण". तिला बहुधा अर्जुनाच्या भीमाबरोबर होणार्या अध्यात्मिक मतभेदांचे पूर्ण ज्ञान असल्यामुळे तसे म्हणाली असावी. त्यामुळे मतल्याची दुसरी ओळ निर्माण होण्यास कवीला मदत मिळाली." - गंभीर समीक्षक
प्रिय गंभीर समीक्षक,
आपण लिहिलेली समीक्षा मुळीच गंभीर नाही, तर ऐकीव महितीवर आधारीत आहे. खरे तर, भूषण यांनी लिहिलेल्या या दोन ओळी तुमच्या समीक्षेपेक्षा चांगल्या आहेत. एक घटना म्हणून याकडे पाहिले तर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते.
( त्याकाळी पत्नी जिंकुन घ्यावी लागायची - आता लग्न केले की मिळतात ) - हे तर अतिशय हास्यास्पद लिखाण आहे.
युधिष्ठिराने आयुष्यात एकच चूक केली. ती सुद्धा त्याला स्वतःला चूक वाटतच नव्हती.
- हे सुद्धा अनभ्यासाचेच लक्षण आहे.
असो. तुमची लिहिण्याची पद्धत चांगली आहे. महाभारताचा अभ्यास चालूच ठेवा.
तत्कालीन परिस्थितीचे अत्यंत सुंदर लेखन भूषण यांनी मोजक्या शब्दांत केले आहे - याबद्दल त्यांचे अभिनंदन. (या शेराला पूर्वी प्रतिसाद न दिल्याबद्दल क्षमस्व.)
कलोअ चूभूद्याघ्या
नारायणदास
मंगळ, 18/11/2008 - 21:16
Permalink
विनन्ति
सर्वाना नम्र विनन्ति की आता हा विषय येथेच थाम्बवावा आणि काव्याचा रसास्वाद घ्यावा !
धन्यवाद !