पापणी


बोलताना तू अशी झुकविते का पापणी ?
भाव डोळ्यातील ते, लपविते का पापणी ?

चांदण्यांची सावली, भेट तेथे आपली
आठवण माझीच ती, झुलविते का पापणी ?

कोणता हा सल सखे, जाळतो तव अंतरा
शब्द ही ओठी नसे, हरविते का पापणी ?

आजही पाऊस तो, थांबता दारी तुझ्या
लावताना दार तू, भिजविते का पापणी ?

सोबतीस पुन्हा उभी, याद माझी बोलकी
पाहताना एकटक, हलविते का पापणी ?

जाहलो बरबाद मी, गाव सारे जाणते
बिंब ते नयनी नको, विनविते का पापणी ?

दर्द गझले तू दिला, हा तुझा मोठा गुन्हा
लाज त्याची ती मनी, अडविते का पापणी ?


गझल: 

प्रतिसाद

माफ करा. मला ही रचना फारशी आवडली नाही. तसेच माझ्यामते तयत खालील दोन गोष्टी स्वीकारायला जड जात आहे.
बोलताना तू अशी झुकविते का पापणी ?( झुकविते)

सोबतीपुन्हा उभी, याद माझी बोलकी ( वृत्त )
धन्यवाद!

 

 

काय छान वाटले! ही गझल वाचुन! अजुन लिहा हो!

आजही पाऊस तो, थांबता दारी तुझ्या
लावताना दार तू, भिजविते का पापणी ?

सो ब ती स पु न्हा उ भी, या द मा झी बो ल की
२   १  २   १  १   २  १   २   २  १  २   २  २  १   २  = २४
पा ह ता ना ए क ट क, ह ल वि ते का पा प णी ?
२  १   २  २  २  १  १  १   १  १  १   २  २  २   १  २  = २४
वृत्तात काय गडबड आहे भूषण? अधोरेखित केलेल्या अक्षरांसाठी म्हणता आहात का?
कलोअ चूभूद्याघ्या

वृत्तात गडबड नाही. पण मराठीत गडबड आहे.
हा प्रयत्न आवडला नाही. हरकत नाही. प्रयत्न चालु ठेवतोय. लोभ असावा.

चित्तरंजन भट यांनी आनंदी आनंद या गझलेवर दिलेला हा प्रतिसाद, जो मला व्यक्तिशः पटतो तो येथे देत आहे. कदाचित वरील गझलेबाबत मला तसे म्हणायचे आहे.
 
गुरु, 08/30/2007 - 04:31 — चित्तरंजन भट

माझे मत

प्रत्येक ओळीत मात्रा सारख्या, समान असल्या की झाले असा विचार केल्यास किती गोंधळ होईल. मात्रा मोजून गझला पडायला सुरवात होईल. लयीबाबतही विचार करायला हवा असे माझे प्रामाणिक मत आहे. गझल किंवा कुठलेही वृत्तबद्ध काव्य म्हटले की  ओळी म्हणताना, गुणगुणताना एक लय सहजपणे साधते, असे मला वाटते. तसे 'आनंदी आनंदी' बाबत म्हणता येत नाही.

बाकी गझलेत प्रयोग करू नयेत, असे माझे बिलकुल म्हणणे नाही.  पण वरील प्रयोगात वृत्तातली सहजता मला तरी अनुभवता आली नाही आणि  प्रयोग एखाद्या गणिताच्या मास्तराने केलेल्या गझलेसारखा वाटतो आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.

मुद्दा मान्य. पण ज्या चालीत मी ही गझल गुणगुणलो त्यात बाधा जाणवली नाही. आपलं मुलं सर्वात देखणं. हा तसा प्रकार असेल माझ्या बाबतीत.  बाराखडीत राहण्याचा प्रयत्न करतोय.
भुषणराव आपले आभार.