का मी आज पुन्हा उगीच बसलो मांडून ही खेळणी?

कोणी आज इथे अचानक अशी ही टोचली टाचणी?
तोंडातून न एक शब्द फुटला, ओलावली पापणी

घे तारांगण सूर्य चंद्र सगळे तू जाग येताक्षणी
राहो तारण माझियाजवळ ही स्वप्नातली चांदणी

बापाने खत होउनी जगवली ती कालची पेरणी
आले पुत्र तशी कशी चटदिशी झाली सुरू कापणी?

ज्यायोगेच किती सुखात जगल्या वर्षानुवर्षे पिढ्या
झाली आजच का अशी मग जुनी ती कालची मांडणी?

आली थेट इथे मनात बसली, बोलून गेली तरी
नाही बेत तिचे मला समजले, ती केवढी धोरणी!

गेलो बोलविले म्हणूनच तिथे, मी सत्य ते बोललो
(त्याच्यानंतर मात्र फार तसली आली न बोलावणी)

आता ह्या इवल्या जगात मजला कोंडून मी घेतले
आल्या तोच कश्या इथे दशदिशा लांबून सार्‍याजणी?

माझे प्रश्न मलाच चार पडले, मी उत्तरेही दिली
होती चूक न ती, बरोबर न ती, ही कोणती चाचणी?

त्यांना ते चरण्यास रान तिकडे, ह्यांना मिळाले इथे
सोयीची म्हणुनीच रोज घडते जेथेतिथे वाटणी

त्यांच्या बाह्यगुणावरी न भुललो, मी आत डोकावलो
त्यांनी सत्वर घेतली मखमली आतूनही ओढणी

आईबाप जरी जगात नसले, जा तू सुखाने घरी
ते वृंदावन आणि ती तुळसही आहेच की अंगणी!

आयुष्यात गमावले क्षण किती, कामास आले किती?
ती म्हटली "तुझियामुळेच जगले", आटोपली मोजणी

झाली भातुकली जुनी, हरवले ते मित्र त्या मैत्रिणी
का मी आज पुन्हा उगीच बसलो मांडून ही खेळणी?

- प्रणव सदाशिव काळे

गझल: 

प्रतिसाद

शेवटचा शेर, तिचे धोरणी बोलणे, तुळस-वृंदावन विशेष आवडले. शार्दूलविक्रीडित चांगले निभावले आहे. विशेष म्हणजे यतीमध्ये तडजोड नाही, त्यामुळे गझल गेय झाली आहे.
पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

मी वाचलेली शार्दूलविक्रीडितातली ही पहिली गझल. ह्या वृत्तात मंगलाष्टके किंवा सुनीतेच लिहिली जातात, असा आपला समज. आपले शार्दूलविक्रीडितावरील हुकमत वाखाखण्याजोगी . आपण जुनाट वळणाने न जाता वृत्त निभावले आहे.
गझल सात्विक आहे आणि हीच तिची खासियतही आहे.
उदा.
आईबाप जरी जगात नसले, जा तू सुखाने घरी
ते वृंदावन आणि ती तुळसही आहेच की अंगणी!
हा शेर.

झाली भातुकली जुनी, हरवले ते मित्र त्या मैत्रिणी
का मी आज पुन्हा उगीच बसलो मांडून ही खेळणी?

हा मक्ता फारच आवडला.  अगदी चित्र उभे राहिले.'सार्‍याजणी', 'धोरणी', 'बोलावणी', 'चांदणी', 'अंगणी'ही आवडले.
गझल आवडली.

वा वा, मक्ता अप्रतिम,
'तुझियामुळेच जगले' हा शेरही  आवडला.

वा..वा..प्रणव....
शार्दूलविक्रीडितात झकास गझल झाली ही....!
मला हे शेर विशेष आवडले -

आली थेट इथे मनात बसली, बोलून गेली तरी
नाही बेत तिचे मला समजले, ती केवढी धोरणी!
आता ह्या इवल्या जगात मजला कोंडून मी घेतले
आल्या तोच कश्या इथे दशदिशा लांबून सार्‍याजणी?
त्यांच्या बाह्यगुणावरी न भुललो, मी आत डोकावलो
त्यांनी सत्वर घेतली मखमली आतूनही ओढणी
( वा वा....)

आईबाप जरी जगात नसले, जा तू सुखाने घरी
ते वृंदावन आणि ती तुळसही आहेच की अंगणी!
(छान...)

आयुष्यात गमावले क्षण किती, कामास आले किती?
ती म्हटली "तुझियामुळेच जगले", आटोपली मोजणी
झाली भातुकली जुनी, हरवले ते मित्र त्या मैत्रिणी
का मी आज पुन्हा उगीच बसलो मांडून ही खेळणी  ?
 (सुंदर...)