भटसाहेब २

हा कवी आपल्यापेक्षा वयाने आणि इतर सगळ्याच गोष्टींनी खूप म्हणजे खूपच छोटा आहे,  त्याला कशाला कळवायचे आपली गझल पूर्ण झाल्याचे, असे त्यांच्या मनात चुकूनही कधी यायचे नाही... ते सरळ पत्र लिहून मोकळे व्हायचे...एकदा तर छोट्या वृत्तातील एक गझल त्यांना सुचली आणि त्यांनी ती लागलीच मला पत्रातून पाठवून दिली. त्या गझलेचे काही शेर असे आहेत -
 दगाही फार झाला !
जिवाच्या पार झाला !
जराशी भेट झाली
उन्हाळा गार झाला !
तुझा भाऊच ना तो ?
मघा जो ठार झाला !
गझलेसोबत पाठविलेल्या त्यांनी असे काहीसे म्हटले होते...छोट्या वृत्तातील गझल पाठवत आहे...अभ्यासण्यासाठी तिचा उपयोग होईल.  आता भटसाहेब कुठे आणि मी कुठे, पण आपण कुणी मोठे आहोत, हे त्यांच्या गावीच नसायचे.

  भटसाहेबांमध्ये असा निरागसपण दडलेला होता. या निरागसपणाचा अनुभव मी अनेकदा घेतला. कमालीचा पारदर्शक, पराकोटीचा प्रामाणिक, स्वतःच्या शब्दाशी कायमच इमान राखणारा, कवितेवर / गझलेवर जिवापाड प्रेम करणारा, स्वतःच्या मोठेपणाची जाणीव नवागताला यत्किंचितही न होऊ देणारा असा हा साध्यासुध्या माणसांचा साधासुधा कवी होता.
माझ्या उपस्थितीतच त्यांना कितीतरी गझला सुचलेल्या मी पाहिल्या....त्यांतील अनेक शेरांविषयी ते बोलायचे. भटसाहेब एकेका शब्दासाठी कसे थांबत, योग्य, समर्पक शब्द सुचल्यावरच संबंधित शेर पूर्ण कसा करत, हेही मी अनेकदा पाहिलेले आहे.
शेर लिहिताना कसा गोटीबंद असला पाहिजे, शब्दांची निवड कशी चपखल असावी, आपल्याला जे सुचले आहे, ते नेमके व्यक्त करणारे शब्द कसे निवडावेत, एखाद्या शब्दाच्या अर्थाबद्दल आपल्याला साशंकता असेल, तर अहंकार बाजूला ठेवून रस्त्यावरील सर्वसामान्य माणसालाही त्या शब्दाचा अर्थ कसा विचारावा, असे अनेक बारकावे गप्पांच्या ओघात ते सहजपणे सांगून जायचे. शब्द वापरताना त्याच्या अर्थच्छटा लक्षात घेतल्याच पाहिजेत, हे त्यांचे सांगणे असे.
गझलेच्या संदर्भातील असे हे प्रशिक्षण कोणत्याही प्रशिक्षणवर्गात अथवा कार्यशाळेत कसे बरे मिळेल ?
भटसाहेबांचा सुमारे १४-१५ वर्षे भरपूर सहवास मला लाभला. त्यात हे सारे शिकायला मिळाले. एखाद्या थोर माणसाच्या सहवासात असताना जे शिकायचे असते, ते हे आणि असे ! ती व्यक्ती आपल्याला सांगत नसते की, हां, आता माझ्याकडून तू हे हे शीक. नकळतपणे ती आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जात असते. आपण सूक्ष्म निरीक्षण करीत पुढे जायचे... मराठी गझलेसंदर्भात ही अशी अप्रत्यक्ष शिकवण मला भटसाहेबांकडून खूप म्हणजे खूपच मिळाली.
एखादा शेर सुचला की, मग भटसाहेबांचा सारा चेहराच कमालीचा बोलका होत असे. प्रथम ते डोळे किलकिले करीत... मंदपणे मान हलवीत आणि मग मान थोडीशी वर करून थोडे इकडे, थोडे तिकडे बघत..जणू काही हवेत तरंगून तो शेरच त्यांच्याशी बोलतोय ! मग ओठांचा किंचित चंबू करून हाताची जुळवलेली पाचही बोटे ओठांजवळ आणीत... मग बोटे जराशी विलग करीत आणि मग तो शेर समोरच्याला ऐकवत. दाद आपसूकच बाहेर पडे. पण तेच स्वतः लगेच म्हणत , `अजून काम करावे लागेल; पण `जमीन` तर निश्चित झाली...आता ही गझल ताब्यात आलीच म्हणायची. शेर कसा बंदुकीच्या गोळीसारखा सटकन सुटायला हवा. ऐकणाऱ्याच्या थेट काळजातच जायला हवे त्याने...`

ज्या झंझावात या काव्यसंग्रहाची प्रेस कॉपी लिहिण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपविली होती, त्याच काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभाला १९९४ साली त्यांनी मला नागपूरला आग्रहपूर्वक बोलावून घेतले. दोन दिवस खासा पाहुणचार केला. या संग्रहाची प्रत मला भेट देताना जरा गंमतच झाली होती. काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले, त्या दिवशी त्यांनी मला `झंझावात`ची एक प्रत भेट दिली.. त्या प्रतीवर त्यांनी लिहिले होते - `प्रिय प्रदीप, `झंझावात`मधील माझ्या सर्व काव्यरचना सुवाच्य अक्षरात लिहून काढून ह्या पुस्तकाची पहिली संहिता तूच तयार केलीस. आज तुझ्या या नेकीचे प्रेमपूर्वक स्मरण करून मी तुला `झंझावात`ची प्रत साशीर्वाद भेट म्हणून देतो...`
मी दुसऱ्या दिवशी पुण्याला यायला निघालो असता त्यांनी आणखी एक प्रत पुढ्यात घेतली आणि तीवरही `प्रिय प्रदीप...` असे लिहिले. मी त्यांना त्यावेळी थांबवले आणि म्हटले, `कालच एक प्रत दिलीत मला तुम्ही. `त्यावर चेहरा प्रश्नचिन्हांकित करून ते म्हणाले, `काल मी तुला एक प्रत दिली ? बरं....`असं म्हणून ते थांबले आणि पुन्हा लिहू लागले...`तुझ्यामुळे `झंझावात`ची निर्मिती झाली. म्हणून पुन्हा अजून ही एक प्रत.` आणि दुसरीही प्रत मला त्यांनी भेट म्हणून दिली. मी नको नको म्हटले, पण त्यांनी काही ऐकले नाही...माझ्या बॅगेत स्वतःच्या हातांनी ती दुसरी प्रत त्यांनी ठेवली....अशा तऱहेने भटसाहेबांची स्वाक्षरी असलेल्या `झंझावात`च्या दोन प्रती माझ्या संग्रही दाखल झाल्या. या संग्रहाच्या मी केलेल्या प्रेस कॉपीचे असे `दुहेरी` बक्षीस मला मिळाले !

भटसाहेब पुण्यात आले की साधारणतः महिना-पंधरा दिवस तरी राहतच असत. त्या काळात माझे कामधाम सांभाळून मी त्यांच्याकडे वारंवार जात असे. एखाददुसरा दिवस जायला नाहीच जमले तर कार्यालयात फोन करून बोलावून घेत. गप्पांच्या मैफलींना तर अंतच नसायचा. त्यांच्या आधीच्या पिढीतील कवी, समकालीन कवी, त्यांच्या पुढच्या पिढीतील कवी, मराठी गझलेची सध्याची प्रगती असे विविधांगी विषय त्यांच्या गप्पांमध्ये असत. ज्याची थांबण्याची तयारी नाही, तो प्रगती करू शकत नाही, असे ते नेहमी म्हणत असत. त्यांचे सांगणे असे की- गझल लिहिणाऱ्.याने एक सूत्र नेहमीच लक्षात ठेवायला हवे. आधी साधना, मग सिद्धी आणि त्यानंतरच प्रसिद्धी. हे सूत्र आजच्या नव्या दमाच्या गझलकारांनीही लक्षात ठेवायला हरकत नाही.

होतकरू गझलकार आढळला की, मला लॉटरी लागल्यासारखा आनंद होतो, या त्यांच्या वाक्याचा अर्थ मला त्या वेळी उमगला नव्हता.  लिहिणारा वेगळाच आणि आनंद यांना कसा काय होईल, असा प्रश्न मला पडायचा..पण त्याच वाक्याने मला भटसाहेबांच्या जवळ नेले होते...आणि या जवळिकीतूनच नंतर मला या वाक्याचा अर्थ चांगलाच उमगला. लॉटरी लागणे हा सर्वस्वी खासगी लाभ असतो. खासगी आनंद असतो. वैयक्तिक पातळीवरील आनंद असतो...पण एखादा होतकरू गझलकार आढळणे म्हणजे जणू काही आपल्यालाच लाभ होणार आहे, अशी त्यांची त्या वाक्यामागील भावना होती...गझलेसाठीच आयुष्य़ झोकून देणाऱ्या भटसाहेबांसारख्या माणसाच्या तोंडातूनच असे निःस्वार्थ विधान उमटू शकते.
गझल ही भटसाहेबांच्या भटसाहेबांसारखा मोठा कवी ज्या वेळी एखाद्या काव्यप्रकाराचे पुनरुज्जीवन करतो आणि मराठी भाषेत त्या काव्यप्रकाराची पाळेमुळे अक्षरशः रुजवतो, तेव्हा त्या भाषेत लिहिणाऱ्या नव्या, तरुण कवींची पिढी त्यांच्याकडे आकर्षिली जाणे अगदी साहजिकच असते. कळत-नकळत का होईना युगप्रवर्तक कवीचा प्रभाव या तरुण कवींवर पडत असतो. या प्रभावाचे प्रतिबिंब नव्या कवीच्या लेखनात उमटणेही तसे नैसर्गिकच म्हणता येईल...पण भटसाहेबांचा मोठेपणा असा की, ते अशा संबंधित कवीला निग्रहाने सांगत असत की, माझ्या लेखनाचा प्रभाव असणारे शेर टाळावेत. अनेक उत्साही, होतकरू गझलकार त्या वेळी त्यांच्याकडे अभिप्रायासाठी गझला पाठवत असत. काही काही शेरांवर भटसाहेबांचा प्रभाव जाणवत असे. त्या वेळी ते त्याला पत्रोत्तराद्वारे सांगत असत की, अमूक अमूक शेरावर माझा प्रभाव दिसतोय. असे करणे टाळावे. स्वतःची गझल लिहिण्याचा प्रयत्न करावा. स्वतःच्या भाषेत लिहावे. अशी पत्रे त्यांनी संबंधित कवींना लिहिलेली मी स्वतः पाहिलेली आहेत, तसेच प्रत्यक्ष भेटीतही संबंधितांना अशा सूचना दिलेल्या मी ऐकलेल्या आहेत...आणि तरीही `गझलेच्या नादी लावून सुरेश भट यांनी एक पिढीच्या पिढी बरबाद केली, ` असे निरर्गल आरोपही त्यांच्यावर त्या वेळी झाले.
Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

हाही अत्यंत छान लेख आहे. बरीच माहिती मिळाली. लॉटरी हा भाग खूप आवडला.