परिपूर्ण







किती रुंजी अशी तिथल्या तिथे घालत रहावे
नवी क्षितिजे नवे आकाश धुंडाळत रहावे

कुणासाठी भविष्याची खुली आहेत दारे
किती भूतकाळाशीच रेंगाळत रहावे

कधी हे मौन पडते आपलया पथ्यावरी पण
शहाण्याने मनाशी वाद हा घालत रहावे

तुझ्या डोळयातले गाणे तुझ्या मौनातली धुन
तुला ऐकत रहावे की तुला पाहत रहावे

तुझ्या गाण्यात विरघळती व्यथा अवघ्याच माझ्या
तुला ऐकत रहावे बस्स तुला ऐकत रहावे

कधी देशील एखादीच पण परिपूर्ण रचना
किती सौंदर्य तुकड्यांतून उपभोगत रहावे

-- समीर चव्हाण


प्रतिसाद

हा शेर फार छान आहे.

शेवटचे ४ शेर अतिशय आवडले!
तुला ऐकत रहावे की तुला पाहत रहावे  -- वा वा!!

तुझ्या डोळयातले गाणे तुझ्या मौनातली धुन
तुला ऐकत रहावे की तुला पाहत रहावे
व्वा!



तुझ्या गाण्यात विरघळती व्यथा अवघ्याच माझ्या
तुला ऐकत रहावे बस्स तुला ऐकत रहावे
सुंदर...

कधी देशील एखादीच पण परिपूर्ण रचना
किती सौंदर्य तुकड्यांतून उपभोगत रहावे

छान...