घडामोडी

बेफाम या वर्षातही घडल्या घडामोडी
लोकांसवे, देशासही नडल्या घडामोडी

लाटा सुनामीच्या,..कुठे भूकंप वा काही
थैमान मृत्यूचे तशा घडल्या घडामोडी

झाली पुन्हा दंगल .. नवा आयोग अन अहवाल...
सरकारदरबारी पुन्हा सडल्या घडामोडी...

लिहिला कुणी सोयींतला इतिहास देशाचा...!
सत्यातल्या कित्येकही दडल्या घडामोडी

झाला असा मृत्यू कुण्या साध्या मनुष्याचा..
बेवारशी वाटे जणू पडल्या घडामोडी

गाथा इथे होते सुरू कारुण्यपर्वाची
डोळ्यांतल्या अश्रूंसवे रडल्या घडामोडी

खोटे-खरे संगोनिया जातात ज्योतिष्यी..
पोटात काळाच्या किती दडल्या घडामोडी

होते मनी आनंद ह्या जगण्यातला घ्यावा
हातात ह्या कुठल्या अशा पडल्या घडामोडी

उघडून काळाची नव्या बसला वही कोणी
...का लेखणीपाशी जुन्या अडल्या घडामोडी...?

-- संतोष कुलकर्णीप्रतिसाद

झाली पुन्हा दंगल .. नवा आयोग अन अहवाल...
सरकारदरबारी पुन्हा सडल्या घडामोडी...

होते मनी आनंद ह्या जगण्यातला घ्यावा
हातात ह्या कुठल्या अशा पडल्या घडामोडी

हे शेर फार आवडले!

झाली पुन्हा दंगल .. नवा आयोग अन अहवाल...
सरकारदरबारी पुन्हा सडल्या घडामोडी...
होते मनी आनंद ह्या जगण्यातला घ्यावा
हातात ह्या कुठल्या अशा पडल्या घडामोडी
उघडून काळाची नव्या बसला वही कोणी
...का लेखणीपाशी जुन्या अडल्या घडामोडी...?

वा...वा...

हे तीन शेर विशेष आवडले.

शुभेच्छा.