तेंव्हाही




मनात माझ्या काहिच नव्हते पण तेंव्हाही
उगाच होते केले मी भांडण तेंव्हाही!

तुझा शोध घेण्यासाठी मी फिरून थकलो
निवांत मिटले डोळे... वणवण तेंव्हाही...

मिठीत येता सर्व गुन्ह्यांना माफी असते
मिळे कसे तुज रुसण्याचे कारण तेंव्हाही!

उगाच वाटे काळ थांबला कालच्यापरी
उडून गेले होते सारे क्षण तेंव्हाही...

तुझ्या नि माझ्या मधली सारी प्रकाशवर्षे
भरून होते ग्रह ताऱ्यांचे सण तेंव्हाही...

लिलाव सारे थांबवले मी स्वप्नांचे पण...
कुठे थांबली भावांची घसरण तेंव्हाही?

सुरू असावी फक्त सखे श्वासांची भाषा...
मधून बोले कसे तुझे काकण तेंव्हाही!!

तुला पाहुनी खुलुआ दिलाने छान म्हणावे
कशी कळेना तुला जमे तणतण तेंव्हाही!

तुला सांगुनी गेलो सारी भगवत गीता
मनात माझ्या जरी माजले रण तेंव्हाही....

-- प्रसाद शिरगांवकर




प्रतिसाद

घसरण, तणतण, काकण हे शेर फार सुंदर आहेत.

मनात माझ्या काहिच नव्हते पण तेंव्हाही
उगाच होते केले मी भांडण तेंव्हाही!
तुझा शोध घेण्यासाठी मी फिरून थकलो
निवांत मिटले डोळे... वणवण तेंव्हाही...( हा शेर चुकला आहे असे माझे मत आहे )
मिठीत येता सर्व गुन्ह्यांना माफी असते
मिळे कसे तुज रुसण्याचे कारण तेंव्हाही! ( मिठीत आल्यावर सर्व गुन्ह्यांना माफी कशी असते? मुळात गुन्ह्यांना माफ केल्याशिवाय ती किंवा तो मिठीत कसा येईल? इथे असे भासू शकते की मिठी मारल्यामुळे रुसली वगैरे असावी )
उगाच वाटे काळ थांबला कालच्यापरी
उडून गेले होते सारे क्षण तेंव्हाही... ( या शेरात काल काळ का थांबल्यासारखे वाटत होते ते समजले नाही. त्यामुळे कालच्यासारखा तो आजही थांबला असे वाटणे याचे महत्व थोडे कमी होऊ शकते. )
तुझ्या नि माझ्या मधली सारी प्रकाशवर्षे
भरून होते ग्रह ताऱ्यांचे सण तेंव्हाही...( प्रकाशवर्षे हा शब्द फार सुंदर वापरला आहे )
लिलाव सारे थांबवले मी स्वप्नांचे पण...
कुठे थांबली भावांची घसरण तेंव्हाही?( उचित वाटल्यास याचा अर्थ कळवावात अशी विनंती )
सुरू असावी फक्त सखे श्वासांची भाषा...
मधून बोले कसे तुझे काकण तेंव्हाही!! ( फार छान शेर आहे. )
तुला पाहुनी खुलुआ दिलाने छान म्हणावे
कशी कळेना तुला जमे तणतण तेंव्हाही! ( उत्तम शेर आहे )
तुला सांगुनी गेलो सारी भगवत गीता
मनात माझ्या जरी माजले रण तेंव्हाही....( वा. छान प्रकटीकरण आहे )

काकण आणि घसरण हे शेर फार आवडले!

तुझा शोध घेण्यासाठी मी फिरून थकलो
निवांत मिटले डोळे... वणवण तेंव्हाही...

फारच छान...सुंदर.
सुरू असावी फक्त सखे श्वासांची भाषा...
मधून बोले कसे तुझे काकण तेंव्हाही!!

सुंदर...