आपुलिया बळें -१
माझ्या उण्यापुऱ्या पंचेचाळीस वर्षाच्या काव्यलेखनाच्या जीवनात माझे आजपर्यंत एकूण तीन काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेतः 'रूपगंधा'(१९६१), 'रंग माझा वेगळा'(१९७४) आणि 'एल्गार'(१९८३).
आता दहा वर्षानंतर मी माझा हा 'झंझावात' नावाचा काव्यसंग्रह महाराष्ट्राच्या हवाली करीत आहे. लिहू लागल्यापासून आजपर्यंत मी जे काव्य लेखन केले, ते फार श्रेष्ठ दर्जाचे किंवा मौलिक होते, असे माझे आजही म्हणणे नाही.
किंवा 'झंझावात' नावाचा हा माझा आयुष्यातील चौथा काव्यसंग्रह म्हणजे मराठी काव्याचे सर्वोच्च शिखर आहे, असाही माझा खरोखर दावा नाही.
कवी आणि त्याच्या काव्याचा फैसला सामान्य जनताच करीत असतात. स्वतः कवी किंवा समीक्षक नव्हेत.
ज्या भाषेत काव्य लिहिले जाते, त्या भाषेत काव्यलेखन करणाऱ्या कवीचे सर्वोच्च न्यायालय, म्हणजे ती भाषा बोलणारी सामान्य जनताच असते. हे साधे सत्य मला ठाऊक आहे. हे सत्य मी आयुष्यभर स्वतः अनुभवलेले आहे, आणि मराठी समीक्षेच्या एकूण प्रामाणिकपणावर माझा विश्वास नाही. सर्वसाधारणपणे मराठी समीक्षा आधी ठरवून केली जाते.
ज्याच्या त्याच्या जगण्याच्या मूल्यांनुसार ज्याच्या त्याच्या काव्यलेखनाचा व समीक्षेचा सौंदर्यबोध( Aesthetic Sense) असतो. चिमणीच्या खोप्यात आकाशाची चर्चा करणाऱ्यांचा कसला सौंदर्यबोध?
मी येथे आत्मचरित्र लिहायला बसलेलो नाही, पण काव्यलेखन करीत असताना मला वर्षानुवर्षे जो सामाजिक अनुभव मिळाला, त्याच अर्क असा:
मलाच आली कीव खरोखर मजला हसणाऱ्यांची
हसतानाही त्यांचे हसणे केविलवाणे होते!
त्यांनी तर घरट्यातच चिवचिव दिव्यत्वाची केली
मी जगलो माणसांत, माझे क्षुद्र घराणे होते!
मी सौंदर्यशास्त्राचा अभ्यास केलेला नाही. जर मी तेवढा विद्वान असतो, तर कवी कशाला बनलो असतो? पण माझा एक सोपा सिद्धांत आहे:
जो फक्त स्वतःवर प्रेम करतो, जो माणसांवर प्रेम करू शकत नाही, ज्याला चीड व संताप येत नाही, तो इसम संवेदनाशून्य असतो, आणि ज्याच्या 'संवेदना' फक्त स्वतःपुरत्याच मर्यादित असतात, तो कोडगा इसम कवीच कशाला, माणूससुद्धा नसतो. म्हणूनच मी कबीर आणि तुकारामाला मानतो!
'आता महाराष्ट्र माझ्या काव्यसंग्रहाचे कसे काय स्वागत करणार आहे?' हा विचार करण्याच्या फंदात मी पडणार नाही. जर मी चांगले लिहिले असेल, तर मराठी जनता 'झंझावात'चे मनमुराद कौतुक करील, आणि जर हा काव्यसंग्रह मराठी जनतेच्या पसंतीला उतरला नाही, तर मी मला नापास समजेन.
पण तसे होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण त्यांची 'जनता' वेगळी आणि माझी जनता वेगळी! तर ते असो. काही आठवणी आल्या. हसू आले. राहवले नाही, म्हणून लिहून टाकले, एवढेच.
माझ्या या काव्यसंग्रहात बहुसंख्य गझला किंवा गझल फॉर्ममधील कविता आहेत, मी नुसत्याच गझला का लिहितो? मी नेहमीच्या कविता का लिहीत नाही? अनेकजण माझ्यावर नाराज आहेत. या बाबतीत माझ्यावर अनेकांचा आक्षेप आहे. पहिली गोष्ट अशी, की 'गझल' म्हणजे माझे व्यसन आहे. ती माझी कमजोरी आहे. मला तिच्यावाचून करमत नाही, आणि तिला माझ्यावाचून करमत नाही. 'तू मन शुदी, मन तू शुदम्' अशी आमची स्थिती आहे. म्हणजे तू मी झालीस, आणि मी तू झालो!