स्त्री समीप येते ...
स्त्री समीप येते प्रेम वाटल्यावरती
पण तुमची होते सत्य बोलल्यावरती
जे कळले नव्हते का जपायची होती
ते कळले आता लाज सोडल्यावरती
जे अपुले नाही त्यात तू नको गुंतू
मन होते बघ परकेच गुंतल्यावरती
ज्यांना जे मिळते आणखी मिळो त्यांना
आपल्यास मिळणे फक्त आपल्यावरती
जे दिसत नसे त्यालाच फक्त पूजावे
जे दिसते, येतो हक्क पूजल्यावरती
डोळ्यांनाही इतकी तहान लागावी
की पितात अश्रूंनाच साठल्यावरती
नाती अनेक आहेत सांगण्याइतकी
एकटा तरीही भाव दाटल्यावरती
भळभळा मनाची जखम वाहते आहे
थांबवू कशी मी प्रेम टोचल्यावरती
नसतेच प्रिये नाते असे जपायाचे
येतात लोक जे फक्त जिंकल्यावरती
रागवू नको तू आपल्या अपयशाला
त्याचेही असेल प्रेम आपल्यावरती
ते फुसके ठरले बार 'अजय' प्रेमाचे
बघ, असेच होते आव आणल्यावरती
गझल: