वर्तुळे

मनांची मोडलेली वर्तुळे जोडून जाताना
कशाची खंत नाही राहिली येथून जाताना

अधोरेखीत झाले दोष माझ्या पोहण्यामधले
तुझ्या डोळ्यांतल्या लाटांसवे वाहून जाताना

तुला पटले असावे चालतो नाकासमोरी मी
तुला मी पाहिले नाही तुला खेटून जाताना

कुठे जाणार ह्याची योजना मांडू कशासाठी
ठरवतो मागचा रेटाच लोंढ्यातून जाताना

तुझीही हार माझाही पराभव ह्या निरोपाने
तुला घेऊन येतो मी मला सोडून जाताना
---------
विजय दिनकर पाटील

गझल: 

प्रतिसाद

वा. छान गझल. 'लोंढ्यातून जाताना'चा शेर विशेष आवडला. अतिशय सफाईदारपणे आला आहे आणि लगेच रजिस्टर होतो.

तुला पटले असावे चालतो नाकासमोरी मी
तुला मी पाहिले नाही तुला खेटून जाताना

गझल आवडली.

जमीनही आवडली, काफिया रदीफ ह्यांचे काँबिनेशन छान आहे.

सगळे शेर आवडले

कुठे जाणार ह्याची योजना मांडू कशासाठी
ठरवतो मागचा रेटाच लोंढ्यातून जाताना

आवडला.