कसा करावा या भयगंडाचा निचरा

कसा करावा या भयगंडाचा निचरा
माझ्या या गावातच झालो मी उपरा

या वेळी पाहु ,कुणाचा नंबर येतो
घात लावुनी बसल्या शहराच्या नजरा

कधी कधी जीवन बनते कचराकुंडी
आपण बनतो त्या कुंडीमधला कचरा

निव्वळ डोकी हवीत येथे हे समजा
नाव गाव ओळख शिक्का सगळे विसरा

वस्तूंनी गजबजलेल्या हाटी आपण
वस्तू बनतो, बनतो वस्तूचा नखरा

नको नकोशा दिवसांशी बोलणे नको
झाकुन ठेऊ भाग मनाचा हा दुखरा.....

मेंदू अपुला म्हणजे लोकल ट्रेन जशी
सापडेल त्या आठवणीचा बाक धरा

गझल: 

प्रतिसाद

ढवळेसाहेब, एकच षटकार!
मेंदू अपुला म्हणजे लोकल ट्रेन जशी
सापडेल त्या आठवणीचा बाक धरा
अबब! अजून पटत नाहीय!

मस्त गझल ...

 या वेळी  पाहु ,कुणाचा नंबर येतो
घात लावुनी बसल्या शहराच्या  नजरा

प्रलोभनांच्या अहमहिकेला अंतच ना...
रस्तो-रस्ती सुरूच रेड्यांच्या टकरा

मेंदू अपुला म्हणजे लोकल ट्रेन जशी
सापडेल त्या आठवणीचा बाक धरा

हे तिन्ही शेर फार आवडले. त्यातही  ´मेंदूच्या लोकल ट्रेनवरील आठवणींचा सापडेल तो बाक धरणे´ वेगळेआणि जबरदस्त. वाव्वा!!  मक्ता पहिल्या ओळीतच संपला, असे वाटले.

मेंदू अपुला म्हणजे लोकल ट्रेन जशी
सापडेल त्या आठवणीचा बाक धरा

कधी कधी जीवन बनते कचरा कुंडी
आपण बनतो त्या कुंडी मधला कचरा
छान...! पण
प्रलोभनांच्या अहमहिकेला अंतच ना...
रस्तो-रस्ती सुरूच रेड्यांच्या टकरा
या शेरात अहमहमिका  म्हणायचे आहे का?

हार्डहिटिंग गझल आहे. लोकल ट्रेनचा शेर सर्वाधिक आवडला. तिसर्‍या शेरात अहमहमिका हवं. 

लोकल ट्रेनचा शेर मलाही खुप आवड्ला.

अनंत,
ही 'मॉडर्न' गझल आवडली.'लोकल ट्रेन'चा शेर कायम लक्षात राहील असा!
पुढील लेखनाची प्रतीक्षा!
जयन्ता५२

अनंत,
कसा करावा या भयगंडाचा निचरा
माझ्या या शहरातच झालो मी उपरा
हा मतला आवडला.
'घात लावुनी बसल्या शहराच्या  नजरा' यातला 'घात लावुनी' हा शब्दप्रयोग खटकला. 'फास लावुनी' किंवा 'शस्त्र परजुनी' किंवा यापेक्षा काही चांगला शब्दप्रयोग व्हावा असं वाटलं.
- कुमार

लोकल् ट्रेन चा शेर मस्त!

मेंदू अपुला म्हणजे लोकल ट्रेन जशी
सापडेल त्या आठवणीचा बाक धरा
क्या बात है!

कसा करावा या भयगंडाचा निचरा
माझ्या या गावातच झालो मी उपरा
भयगंड - सतत घाबरे घाबरे वाटणे किंवा वाटत राहणे असा एक प्रॉब्लेम! अशी अवस्था कधी होते? एक शक्यता - मुळातच आत्मविश्वास नसणे. दोन - भूतकाळात काहीतरी असा घाव वा धक्का बसलेला असणे ज्यामुळे 'आपण चांगले वागूनही आपले चांगले होईल की नाही' असे वाटत राहणे. तीन - भोवतालचे जग क्रूर असणे ( म्हणजे माणुसकी नसलेले असे ).  कवीला ही अवस्था नकोशी झाली आहे. ही अवस्था नकोशी होण्याचे कारण म्हणजे मुळात कवीला एक शांतता असलेले जीवन जगायचे आहे. ज्याअर्थी ही इच्छा कवीला होत आहे त्याअर्थी 'भयगंड' निर्माण होण्याचे पहिले कारण नष्ट होते. म्हणजे एक तर कवीच्या पुर्वायुष्यात एक कुठलीतरी विसरण्याजोगी घटना तरी घडली आहे किंवा भोवतालचे जग निर्दय तरी आहे. शेर हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर दोन ओळी येतात. पहिल्या ओळीत काहीतरी सांगणे अन दुसर्‍या ओळीत त्या मुद्याचा असा शेवट करणे की माणसाच्या छाती व पोट यामधे जो एक पडदा असतो ( डायफ्रॅम ) तो थरथरून घशातून 'ओह', 'वाह', 'क्या बात है', 'वा वा ..वा वा' असे काहीतरी उच्चार नैसर्गीकपणे आले पाहिजेत. 'माझ्या या भयगंडाचा कसा काय निचरा करावा बुवा? ---मी तर माझ्या या गावात स्वतःच उपरा झालोय!' हे विधान पद्यात्मक करण्यात कवीला छान यश मिळाले आहे. दुसरी ओळ संपल्यावर ऐकणारा किंवा वाचणारा शांत बसून राहण्याची शक्यता जास्त आहे कारण कवीला भयगंड का आहे अन तो बिचारा गावात उपरा का झाला आहे ते समजायला जरा अवघड जाऊ शकेल. आता 'प्रतिमां'च्या भाषेत वगैरे चालले असेल तर माहीत नाही. म्हणजे 'गाव' म्हणजे माझे शरीर, भयगंड म्हणजे माझ्या मनातील आत्मा वगैरे! पण रसिकाच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून शेर रचणे चुकीचे आहे. म्हणजे 'तुम्हाला काय समजायचे ते समजा, मला तर वेगळेच म्हणायचे होते' असे शेर करणे!

या वेळी  पाहु ,कुणाचा नंबर येतो
घात लावुनी बसल्या शहराच्या  नजरा
घात करणे किंवा घात होणे असे वाक्प्रचार ऐकिवात होते. शब्दसमृद्धी झाली हा ही गझल वाचण्यातील आमचा एक ठळक फायदा झाला असे म्हणता येईल. 'घात लावणे'! यातील घात हा फास, जाळे, आग, चटका यापैकी काहीतरी लावण्यासाखा आहे की 'लावणे' हे करणे, होणे यापैकी काही आहे हे कवी स्वतःच सांगू शकेल. सगळ्या शहराच्या नजरा घात लावून बसल्या आहेत, बघुचया आता कुणाचा नंबर येतो ते' असे विधान पद्यरूप घेताना फार छान वाटते. त्यासाठी 'लावुन'चे 'लावुनी' केले आहे.  या शेराला एक सामाजिक झालर आहे. शहरातील सर्व माणसे सतत कुणालातरी मारण्यासाठी टपलेली असतात किंवा आहेत असे विधान केले आहे. सुंदर शेर! ते शहर असे का आहे यावर चर्चा करणे अनुचित ठरेल. रसास्वाद घेणे उत्तम!

नको नकोशा दिवसांशी बोलणे नको
झाकुन ठेऊ भाग मनाचा हा दुखरा.....
व्वा! खरोखरच अप्रतिम शेर आहे. क्या बात है! येणारा प्रत्येक दिवस नकोनकोसा वाटतो. दुसर्‍या ओळीमधे 'मनाचा एक भाग' असे म्हणायचे नसून 'शरीराचा हा मन नावाचा भाग' असे म्हणायचे आहे. सुंदर शेर. मन झाकून ठेवू. व्वा! हासिले गझल!


मेंदू अपुला म्हणजे लोकल ट्रेन जशी
सापडेल त्या आठवणीचा बाक धरा
 लोकल ट्रेन हा शब्दप्रयोग अत्यंत विचारांती वापरला आहे. या कवीने गझलेवर खूप विचार केलेला आहे हे त्याच्या चर्चेतून व गझलांमधून दिसतेच. उगाचच परभाषेतील शब्द हा कवी वापरणार नाही. जे शब्द आता मराठी भाषेत मराठी पर्यायी शब्दांपेक्षा खूपच जास्त प्रचलित आहेत ते घ्यायला काय हरकत आहे? लोकल ट्रेनमधे जी अभूतपुर्व गर्दी बघायला मिळते तशी क्वचितच कुठे बघायला मिळेल. तिथे प्रवेशणारा प्रत्येक माणूस जागा मिळण्यासाठी हपापलेला असतो. त्यासाठी धक्काबुक्की होते, शिवीगाळ होते. 'जागा मिळाली' हेच खूप असते. ती कुठे आहे, बाक तुटका आहे का, खिडकी फुटली आहे का' वगैरे विचारांना तिथे वावच नसतो.  अशा ट्रेनची उपमा मेंदूल दिली आहे. आठवणींना बाक म्हंटले आहे.अतिशय सुंदर कल्पना! मात्र यात आम्हाला एक घोळ जाणवत आहे. मेंदू ही जर लोकल ट्रेन असेल तर सापडेल तो बाक धरणारा कोण?  कारण बाक धरणे ही क्रिया करण्याचा संदेशही मेंदूच देणार! लोकल ट्रेन थोडीच म्हणते प्रवाशांना की मिळेल तो बाक धरा? म्हणजे एक तर बाक धरणारे 'मन' असायला हवे ( जे मेंदूचाच काल्पनिक भाग समजले जाते ) किंवा लोकल ट्रेन ही उपमा 'भूतकाळा'ला दिली जावी. कारण आठवणी या भूतकाळातच साठवलेल्या असतात, ट्रेनमधील बाकांसारख्या घट्ट बसलेल्या असतात.

कधी कधी जीवन बनते कचरा कुंडी
आपण बनतो त्या कुंडी मधला कचरा........
अनावश्यक शेर! 'कचरा' हा काफिया कितीतरी सशक्त पद्धतीने वापरता आला असता. मुळात हा शेर म्हणजे एखाद्या चारोळीचा भाग वाटतो. जीवन कचरा कुंडी आहे, आपण त्यातील कचरा आहोत वगैरे! तसेच या शेराची 'ऍप्लिकॅबिलिटी'सुद्धा खूप आहे. म्हणजे असे कुणाकुणाला वाटू शकेल, काय काय कारणांनी वाटू शकेल, कधी कधी वाटू शकेल, वगैरे. असे सर्वव्यापी शेर गझलेत घेताना गझलेच्या त्वचेवर ओरखडे उठणार नाहीत याची काळजी घेतली जावी असे आमचे ठाम मत आहे. अतिरंजित शब्दांमुळे गझलेची नाजुकता जाऊन ती सुरकुतलेल्या म्हातारीसारखी दिसायला लागते. एक महत्वाचा मुद्दा असा की 'गझल ही एखादी लावण्यवती नसली' तरीही 'गझलची बांधणी लावण्ययुक्त असावी'! कचरा, गटार, चिळकांड्या वगैरे सारखे शब्द गझलेला एकंदर हानिकारक ठरू शकतात.  

 

लोकल ट्रेन - कल्पना जबरदस्तच आहे. खरच...कवी किती भावनांना हात घालू शकतो अन किती क्रिएटिव्ह असू शकतो हे या शेरातुन लक्षात येऊ शकेल.

आवडली गझल !

कवी किती भावनांना हात घालू शकतो अन किती क्रिएटिव्ह असू शकतो हे या शेरातुन लक्षात येऊ शकेल.

आवडली गझल !

मेंदू अपुला म्हणजे लोकल ट्रेन जशी
सापडेल त्या आठवणीचा बाक धरा
शेरात नाविन्य ..आठवणीचा बाक हे रुपक तर फार आवडले...

प्रलोभनांच्या अहमहिकेला अंतच ना... या शेरात अहमहमिकाच  म्हणायचे आहे . पण तसा शब्द तिथे आणला तर वॄत्ताचा सारा तोलच बिघडेल. त्यामुळे तिथे मतितार्थ कळेल आणि वृत्तातही बसेल अशा पद्धतीने तो शब्द कवीने  modify करून घेतलाय. आजवर मराठीतल्या सर्वच कवीनी हे स्वातंत्र्य घेतले आहे. कुसुमाग्रजांचा 'श्रीमान् इमारतींचा थाट' तर प्रख्यातच आहे.

व्वा..छान्..शेर आवडला
मेंदू अपुला म्हणजे लोकल ट्रेन जशी
सापडेल त्या आठवणीचा बाक धरा

मेंदू अपुला म्हणजे लोकल ट्रेन जशी
सापडेल त्या आठवणीचा बाक धरा

नको नकोशा दिवसांशी बोलणे नको
झाकुन ठेऊ भाग मनाचा हा दुखरा.....


मेंदू अपुला म्हणजे लोकल ट्रेन जशी
सापडेल त्या आठवणीचा बाक धरा

शेर आवडले

Farach chan

नको नकोशा दिवसांशी बोलणे नको
झाकुन ठेऊ भाग मनाचा हा दुखरा.....

मेंदू अपुला म्हणजे लोकल ट्रेन जशी
सापडेल त्या आठवणीचा बाक धरा

vaa vaaa ! hye sher visheesh awadale.

या वेळी पाहु ,कुणाचा नंबर येतो
घात लावुनी बसल्या शहराच्या नजरा

मेंदू अपुला म्हणजे लोकल ट्रेन जशी
सापडेल त्या आठवणीचा बाक धरा

वा वा

मतला आणि

नको नकोशा दिवसांशी बोलणे नको
झाकुन ठेऊ भाग मनाचा हा दुखरा..... >>

सर्वात जास्त आवडले सर

:)