इतके धुळकट रस्ते इथले....

इतके धुळकट रस्ते इथले
रक्ताचेही डाग न दिसले

तुझे  स्मीत सांगते मला की
तुलाच माझे  गूढ उमगले

पानगळीच्या पानांवरती
आठवणींचे  ऊन उतरले

मेघ रिकामे ,  गुमसुम वारा
देवच जाणे  काय  बिनसले

विचार करतो आहे आता
हातामधुनी काय निसटले

विझता विझता उठल्या ज्वाळा
आणिक मग तू डोळे मिटले.......

***

 

गझल: 

प्रतिसाद

कल्पना छान असून ही मत्ला उतरला नाही नीट, असेच वाटते.
पानगळीच्या पानांवरती
आठवणींचे  ऊन्ह उतरले
(थोडा बदल करून)
सुंदर शेर
शेवटचा शेर ही उत्कट वाटला.

पानगळीच्या पानांवरती
आठवणींचे  ऊन उतरले
वा! सुंदर! चित्रमय! मक्ताही भारी आहे.

तुझे  स्मीत सांगते मला की
तुलाच माझे  गूढ उमगले
आवडले. स्मीत चालते का? नाहीतर मला हास्य म्हणून सुद्धा आवडले.
पानगळीच्या पानांवरती
आठवणींचे  ऊन उतरले
छानच.

विचार करतो आहे आता
हातामधुनी काय निसटले
वा वा. शेवटचा शेर म्हणून हाही आवडला.
विझता विझता उठल्या ज्वाळा
आणिक मग तू डोळे मिटले.......
ज़बरदस्त.

अनंत,
गझल आवडली. मतला अगदी सहज आला आहे आणि आशयघन आहे.
'ऊन उतरले' आणि 'काय निसटले' सुद्धा.
मेघ रिकामे ,  गुमसुम वारा
देवच जाणे  काय  बिनसले -
हा शेर थोडा बदलूनः
गगन रिकामे, गुमसुम वारा
कुणा न कळले काय बिनसले
असा सुचवावासा वाटला. 'मेघ' रिकामे नसतात, 'आकाश' (गगन) असू शकतं असं वाटलं. दुसर्‍या ओळीतला बदल मी निरीश्वरवादी असल्यामुळे.
- कुमार

मतला आणि मक्ता आवडला. बाकीचं सगळ फारच सरळसोट आहे. बालकवींच्या कवितेसारखे
हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या मखमालीचे...

त्या सुंदर मखमालीवरती
खेळत होती फुलराणी ती

असं.
गझलियत कुठेच दिसली नाही.  कविता म्हणून छान आहे.
आपला,
(तौलनिक) धोंडोपंत
 
 
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

बा धोंडोपंता , तुझे अज्ञान अगाध आहे , या गझलेत मक्ता नाही !
गझलियत म्हणजे काय , हे तुम्हाला माहीत आहे काय ?  नाही.तेंव्हा असा आगाउपणा करू नका.
दुसरी गोश्ट , स्वतःच्या नावाखाली प्रतिक्रिया नोंदवा . तुम्हाला भीती  कशाची वाटते  ? या असे समोरासमोर या ! बोलुयात .
 
 

क्या बात है! अनंतराव -
आपल्या गझलांमध्ये एक खासियत जाणवते ती अशी -
कांही सांगणार आहे    - पण जास्त बोलणार नाही
मी तसे साधेच बोलेन  - पण सारे उमगणार नाही.
गझलेतले संयत शब्द हे तर आपले सोबतीच! चालत रहा...

श्री विश्वस्त महाशय,

एखाद्या व्यासपीठावर मांडले गेलेले साहित्य हे लोकाभिप्रायासाठी खुले होते. त्यावर मत देण्याचा अधिकार हा प्रत्येक सदस्याला असतोच.

ज्यांना या लोकशाही मूल्यांचे पालन करणे जमत नसेल, त्यांनी आपल्या कविता कड्याकुलूपात बंद करुन लॉकरमध्ये ठेवाव्या.

The very fact that when a poem is displayed on a fourm, it immediately becomes entirely open to public scrutiny and opinion.

आम्ही त्या "कवितेबद्दल" आमचे मत दिले आहे. आम्ही कोणतेही अपमानकारक वैयक्तिक स्वरूपाचे उल्लेख केलेले नाहीत.

त्याला उत्तर देतांना त्या कविवर्यांनी जी भाषा वापरली आहे, ती सुसंस्कृततेला धरून नाही. आमच्या मतांशी त्यांची असहमती आम्ही समजू शकतो आणि तिचे स्वागत ही करतो, कारण असहमती शिवाय वैचारिक देवाणघेवाण होत नाही. 

पण अशा प्रकारची भाषा वापरून ते स्वतःची पातळी खालावून घेत आहेत असे आम्हाला वाटते.

आम्ही कोणावरही वैयक्तिक द्वेषारोप करीत नाही आणि ते कोणाकडून आमच्यावर करवून घेत नाही याची समज त्यांना द्यावी.

तसेच "तखल्लुस" नसला तरी ग़ज़लेच्या (किंवा ग़ज़लेच्या फॉर्ममधील कवितेच्या) शेवटच्या शेराला मक्ताच म्हणतात हे ही त्यांना सांगावे.

आदरणीय दादांचा शेर आठवला

गटारात खुपसुनी माना, सूर्य शोधती जे
गगन का तयांचे मिंधे राहणार आहे?

आपला,
(आकाशगामी) धोंडोपंत

शेवटी, कोणाचेही  नाव ही त्या व्यक्तिची खाजगी बाब असल्याने, त्यावर भाष्य करण्याचा अधिकार कोणाला नाही.

आम्ही आमचे नाव कसेही असले तरी अभिमानाने मिरवतो आणि  आज धोंडोपंतांना मराठी ई-विश्वात विविध समुदायांवर हजारो लोक ओळखतात.
आपला,
(नामांकित) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रतिक्रिया देताना थोडा विचार केला गेला , तर या स्वातंत्र्याला काही अर्थ आहे.एरवी जिव्हेचा गैरवापर ........

इतके धुळकट रस्ते इथले
रक्ताचेही डाग न दिसले >> vvaah

मेघ रिकामे , गुमसुम वारा
देवच जाणे काय बिनसले >> vaah