आई मेंढ्या हाकत आहे, बाप दिवंगत आहे

आई मेंढ्या हाकत आहे, बाप दिवंगत आहे
लुगड्याच्या झोपाळ्यावरती बाळ तरंगत आहे

पायामध्ये चाळ बांधुनी बैठकीस आल्यावर
मूल रडत नाही ना बघणे फार विसंगत आहे

स्थलांतराच्या सातत्याची चिंता नाही त्यांना
स्वार्थासाठी त्यावरती लिहिणारा खंगत आहे

तुम्ही फक्त माझे काका ना, म्हणत बिलगली पोरे
हीच एक त्या अनाथ जगण्यामधली रंगत आहे

ढकलाढकली करत मिळवती जागा जेवायाला
उद्या कदाचित नसणार्‍यांची अंतिम पंगत आहे

मीच एकटेपणा स्वतःचा इथे घालवत बसलो
वृद्धांना तर आश्रमात स्मरणांची संगत आहे

कुटुंबवत्सल होण्याची वेश्येला इच्छा नाही
घरात नुसत्या नजरांनी कौमार्य दुभंगत आहे

मनातले जर व्यक्त न केले, अशीच घुसमट होते
तुला रात्रभर झोप न येणे पूर्ण सुसंगत आहे

आमच्यातले प्रेम कसे वाढेल...... पाहण्यामध्ये
मी पारंगत नसलो तर मग ती पारंगत आहे

'बेफिकीर' दुनियेचे वास्तव नकोस रेखाटू तू
दुनिया तर सुधरत आहे पण गझल सवंगत आहे

-'बेफिकीर'!

गझल: 

प्रतिसाद

वेगळ्या दुनियांत, वातावरणांत नेणारी गझल आहे.

मनातले जर व्यक्त न केले, अशीच घुसमट होते
तुला रात्रभर झोप न येणे पूर्ण सुसंगत आहे

तुम्ही फक्त माझे काका ना, म्हणत बिलगली पोरे
हीच एक त्या अनाथ जगण्यामधली रंगत आहे

वाव्वा. मस्तच. मतलाही.

चित्तरंजनशी सहमत. वेगळ्या वातावरणात नेणारी गझल. मनातले जर व्यक्त न केले.. हा शेर आवडला.

मनातले जर व्यक्त न केले, अशीच घुसमट होते
तुला रात्रभर झोप न येणे पूर्ण सुसंगत आहे

वा

सर्व शेर आवडले

Gazal tar awadaleech !

मनातले जर व्यक्त न केले, अशीच घुसमट होते
तुला रात्रभर झोप न येणे पूर्ण सुसंगत आहे

आमच्यातले प्रेम कसे वाढेल...... पाहण्यामध्ये
मी पारंगत नसलो तर मग ती पारंगत आहे

khass !

Dhanyawad !!