चर्चाप्रस्ताव - कविता आहे की गझल?

श्री. वैभव जोशी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या, मोजक्या सरी मोजकी उन्हे, या रचनेवरील प्रतिसादांपैकी माझ्या प्रतिसादातील एक विधान व त्यावर मानस ६ यांनी 'यावर विस्तृत चर्चा व्हायला हवी' असे काढलेले उद्गार यामुळे मला हा चर्चा प्रस्ताव मांडावासा वाटला.

एखादी गझल तंत्रातील व समभाषिक सज्ञानाला सहज समजू शकणारी रचना आशयाच्या दृष्टीने गझल म्हंटली जावी की नाही यावर 'स्पेसिफिक' लेखन उपलब्ध नसावे असे वाटते. तसेच, हा कलाप्रकार असल्याने कोणाचेच म्हणणे अंतीम ठरणार नाही त्यामुळे मतमतांतरे होणार व दोन अधिक दोन म्हणजे चार असे सूत्र मांडता येणार नाही याचीही जाणीव आहे. जुन्या जमान्यातील व सध्याच्या श्रेष्ठ कवी व समीक्षकांच्या मार्मिक टिपण्ण्यांपैकी या विषयावर एखादे औपचारिक लिखाण केलेले असावे असे वाटत नाही.

मी स्वतःच्या नावाने केलेल्या (भूषण / बेफिकीर) आंतरजालीय लिखाणापैकी जे लिखाण 'दुसर्‍याच्या कलाकृतीवर दिलेला प्रतिसाद ' आहे त्यात एक ते दोन टक्के लिखाण सोडले तर बाकी लिखाण कोणताही व्यक्तीगत अजेंडा मनात ठेवून केलेले नाही. जे तसे केले आहे तेही मी माणूसच आहे म्हंटल्यावर झाले आहे. हे इथे मधेच सांगण्याचे कारण असे की एखाद्याच्या गझलतंत्रातील रचनेला सर्वांसमक्ष कविता म्हणण्यात मला मूळ कवीच्या नावामुळे काळजी किंवा भीती वाटत नाही व सूड घेतल्याचे समाधानही मिळत नाही. माझ्या मनात जे विचार आपोआप येतात ते 'अनफिल्टर्ड' पद्धतीने मांडण्याचा माझा विचार असतो.

गझल की कविता या विषयावर आपल्या सर्वांच्या मतांचा पुर्ण आदर आहे. पण प्रस्ताव मी मांडल्यामुळे मला स्वतःचे मत आधी लिहायला हवे. ते खालीलप्रमाणे:

गझलेचा आशय कसा असावा यावर ही चर्चा नसल्यामुळे 'गझलेचा आशय हा जीवनानुभुतीवर आहे' असे गृहीत धरत आहे.

आशय गझलेत मांडण्याच्या पद्धतीमुळे रसिकाला खालीलपैकी एक गोष्ट अनुभवायला मिळावी असे माझे मत आहे.

१. "ओह... असे म्हणायचे होते होय याला?" (अनप्रेडिक्टॅबिलिटी)

२. अतिशयोक्तीमुळे 'निखळ' हसू येणे

३. प्रस्थापित संस्कृतीवरील मिश्कील व सभ्य भाषेत मार्मिक ताशेरे मारले गेल्याचा आनंद घेता येणे

४. विरोधाभासामुळे हसू येणे

५. दु:खी होणे

यापैकी 'हसू येणे' यात शेर विनोदी असावा असे मला अभिप्रेत आहे असे कृपया समजले जाऊ नये. अशा शेरांचे सहज आठवणारे उदाहरण म्हणून एक उर्दू शेर देत आहे. बहुधा मोमीनचा असावा.

मै भी कुछ खुष नही वफा करके
तुमने अच्छा किया निबाह न की

आता ती जर वफादार असती तर हा वफा करून खुष झालाच असता ना? पण हा जणू त्रयस्थाप्रमाणे तिला असे सांगतोय की तू वफादार नव्हतीस ते बरे झाले, मी पण वफा करून शेवटी विरहात जळतोच आहे. जणू तिचे प्रेम इतर कुणावर तरी होते अन याचे तिसर्‍याच कुणावर तरी!

या व्यतिरिक्त असलेल्या पद्धतींनी माडलेला आशय हा (मल स्वतःला) कवितेचा वाटतो. याचे कारण तो सरळ सांगीतला जातो. त्यात उत्तम शब्दरचना, प्रतिमा, लहजा, सरळ साध्या बोलल्यासारख्या ओळी, प्रवाहीपणा, रदीफ / काफियांचे नावीन्य यातील व याशिवाय इतर काहीही उत्तम असू शकते. पण आशय व आशय मांडण्याची पद्धत जर मेंदूला पीळ पाडणारी नसेल तर मला ती कविता वाटते.

आपली मते देण्यामुळे एक बर्‍यापैकी चर्चा होईल असे वाटते.

माझ्या मतांमधून मला कुणालाही दुखवायचे नाही. तसे कुणी दुखवले गेल्यास क्षमस्व! मला स्वतःला तरी या चर्चेचा निश्चीत फायदा होईल असे मला वाटते.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

प्रतिसाद

आपण मांडलेला चर्चाप्रस्ताव चांगला आणि अवघड आहे. अवघड अशा कारणासाठी की काही समोर असेल (म्हणजे शेर वगैरे...), ते कोणी लिहिलेत हे माहित असेल तर सांगणे सोपे जाते. पण नुसता विचार करून, बुद्धीलाही घाम आणणारे काम वगैरे..... म्हणजे जरा अवघडच. असो.
मला असे वाटते की, दुसर्‍या ओळीतील प्रभावी समारोप हा मुद्दा शेरासाठी यशस्वी ठरावा. बरेच लोक आरंभशूर असतात. नंतर ढेपाळतात. तसे, पहिली ओळ सुंदर आणि भाव खाऊन जाणारी तर दुसरी ओळ त्यामानाने सामान्य असे कित्येकवेळा होते. तिथे तो चांगला शेर म्हटला जाऊ नये.
बाकी वाचकाला किंवा ऐकणार्‍याला काय वाटते हा भागच निराळा. वाचक तरी काय करणार? त्याने जे वाचले त्यावरूनच आडाखे बांधणार ना? त्यामुळे वाचल्यावर त्याच्या मनात काय निर्माण होईल हे सांगणे कठीणच. एकाला हसू येईल तर दुसर्‍याला दु:ख होईल.
कित्येकांना काय काय वाटत असते. पण उघडपणे बोलू शकत नाहीत बिचारे..! मग आपण कसे ठरविणार काय चांगले ते..? हे अवघडच आहे. म्हणून... लयीत वाचता येणारी(अर्थातच गझलकार सोडून इतरांना), रदीफ-काफियाचे नियम सांभाळलेली , एकमेकांवर अवलंबून नसणार्‍या ५ द्विपदी म्हणजे गझल. अशीच व्याख्या करणे भाग पडते.
मात्र, तुम्ही म्हणता तशी सरळसोट रचना म्हणजे "बकवास गझल" असे आपण म्हणू शकतो फारतर. पण, तुम्ही उल्लेख केलेली रचना तितकी सरळसोट वाटत नाही.
असो. सध्या एवढेच.

बाराखडीतल्या व्याख्येप्रमाणे असलेली, गझलेचा आकृतीबंध व्यवस्थितपणे सांभाळणारी, रदीफ, काफिया, अलामत, वृत्तादी नियम पाळणारी आणि कवीने 'गझल' म्हणून प्रकाशित केलेली कुठलीही रचना गझल समजण्यात यावी, असे मला वाटते.
मग ती रचना/ तिचा भावार्थ कवितेसारखा आहे, भावगीतासारखा आहे, अभंगासारखा आहे किंवा लावणीसारखा आहे वगैरे चर्चा झाल्यास हरकत नाही. अशा चर्चांमधून नक्कीच अनेकांना काहीतरी शिकायला मिळत असते.
कविता की गझल? असा प्रश्न विचारतांना आपण नकळत कविता म्हणजे काहीतरी खालच्या पायरीवरचा, अधम प्रकार आहे असे गृहीत धरतो. एखाद्या (कथित)गझलेला "ही तर कविता आहे" अशा शब्दात हिणवले जाते, तेव्हा गंमत वाटते. कारण प्रत्येक गझल ही कविताच असते.
कविता कुठे संपते, आणि गझल कुठून सुरू होते हे सांगणारी सुस्पष्ट अशी रेषा कुठे आखलेली नाही, आणि आखणे योग्यही नाही.

ही चर्चा शेवटी इथल्या सुप्रसिद्ध अशा 'वडे' आणि 'भजी' वळणावरच जाईल की काय, असे वाटते !

भूषण ,

तुमच्या मतांनुसार व निकषांनुसार मी गझल लिहीत नसलो तरीही ह्या गझलचा उल्लेख झालेला आहे म्हणून हे लिहीतो आहे.

मोजकी उन्हे , मोजक्या सरी , मोजकेच वारे होते
शेवटी किती मोजले तरी मोजकेच सारे होते - निकष ४ व ५ (४ साठी किती मोजले तरी मोजके...मधील विरोधाभास पहावात)

पाहिले तिने , गूढ हासली , मान डोलली थोडीशी
हे जुनेच होते नकार की हे नवे इशारे होते - (टंग इन चीक पध्द्दतीने काही गोष्टी मांडण्याचा एक प्रकार असतो तो आपल्या निकषात नाहीये . " हे जुनेच होते नकार की हे नवे इशारे होते" हा प्रश्न ज्याला पडतो तो दु:खी होवू शकतो वा खेदाने हसू शकतो .

कालही तुझ्या बरसण्यामधे आलबेल नव्हते सारे
कालही तुझ्या पावसातले दोन थेंब खारे होते - निकष ५ (हा निकष मी अशासाठी लागू म्हणतो आहे की ह्या शेरातील दु:ख नीट पोचल्यास फार तीव्रतेने जाणवेल असे मला वाटले होते. अजय जोशी म्हणतात त्यानुसार पाऊस आला की अश्रू आले वगैरे इतकंच नसतं प्रत्येकवेळी. उदा: तुम्ही मला भेटल्यानंतर कडकडून मिठी मारून आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यातील अवघडलेपण आणि त्यामागील कारणे माझ्या लक्षात येऊ शकतात आणि मी खेदाने वरील शेर म्हणू शकतो. शेर पोचला नसेल तर मी विचार करेनच))

मस्तकी टिळा लावला कुणी , हात जोडले काहींनी
छान वागले भक्तगण तुझे .. छान हातवारे होते - निकष ३

पण तुझ्या नभी नेहमी सखे पौर्णिमाच नांदत होती
मी खिशामधे ठेवले तसे दोन चार तारे होते - निकष ४ व ५ (तिच्या नभी पौर्णिमा आणि माझ्या खिशात दोन चार (च) तारे ह्यात विरोधाभास दिसला नाही ह्याचेच मला हसू आले :-))

घट्ट बंद कर ओठ आपले , लाव शांततेची पट्टी
ह्या जगी कुणी शब्द काढला की अरेस का रे होते - निकष ३

वारला म्हणे गुदमरून तो श्वास रोखलेला पक्षी
आठवांवरी, आसवांवरी रात्रभर पहारे होते - निकष ५

मला सुरुवातीपासूनच ही केस डिफेंड करण्याची अजिबात इच्छा नव्हती. वाचकांनी अनुभूती घ्यावी व चांगली वाईट जी काय असेल ती प्रतिक्रिया द्यावी . मुळात कवी त्याला काय म्हणायचं होतं हे सांगू लागतो तिथूनच घसरण सुरू होते. आपण गझल आवडली नाहीत म्हणालात मी आपल्या मताचे सहर्ष स्वागत केले. कारणेही दिलीत जी मी माझा अभ्यास म्हणून नोंदून घेतली.

गझल आहे की नाही हा (विनोदी) प्रश्न आल्याने मी हे इथे लिहीले. जर आपणां सर्वांना मान्य असलेले कुणी तज्ञ असते तर गझल ला वाहिलेल्या ह्या संकेतस्थळावर नक्की किती गझला आहेत हा आकडा बघायला मजा आली असती

पण तसे नाहीये तोपर्यंत ह्या चर्चा होतच राहणार. आणखी एक प्रश्न असा की आपण जे गझल मुशायरे घडवून आणता त्यातील माझ्या-तुमच्यासकट सादर करणा-या सर्वांच्या गझल ह्या निकषांनुसार गझल असतात काय ? की फक्त सादरकर्त्यंची व रचनांची संख्या सांभाळायची असते? ह्यापुढे तरी हे निकष सांभाळले जाणार आहेत काय?

तुमची कळकळ मात्र वाखाणण्याजोगी आहे.
शुभेच्छा

तळटीप १ :- मी माझ्या रचनेत लावलेल्या निकषांचे नंबर चुकले असल्यास फक्त माफ करा .. ह्या रचनेचा उल्लेख करून एक नवीन चर्चा कृपया नको. बाकी, निकष कसे किती योग्य , अयोग्य हा ही एक चांगला मुद्दा आहे चर्चेसाठी.
धन्यवाद

तळटीप २ :- आपल्याला असे म्हणायला वाव आहे की मी ही रचना गझल नाही असे म्हणालोच नाही त्या अनुषंगाने प्रस्ताव मांडला आहे फक्त. तसे असल्यास ह्या रचनेचा उल्लेख ह्या चर्चेतून कृपया टाळावा.
धन्यवाद

अजय,

'मी वैभव यांच्या रचनेवर हा प्रस्ताव मांडलेला आहे' असा आपला समज झाला नसेल अशी आशा आहे. असल्यास तो कृपया बदलून 'वैभव यांच्या रचनेमुळे ट्रिगर झालेला प्रस्ताव' अशी दुरुस्ती करून घ्यावीत.

मला आपला प्रतिसाद गद्य असूनही समजला नाही याबद्दल क्षमस्व!

ज्ञानेश,

आपण कविता अधम समजतो, गंमत करतो, हिणवतो हे आपण या प्रस्तावाला उद्देशून लिहीले नसावेत अशी आशा आहे. कारण मी तसे काही समजत नाही हे आपण जाणताच. प्रत्येक गझल ही कविता असते हे सांगीतल्याबद्दल आभारी आहे. अर्थातच चर्चा प्रस्ताव फक्त 'गझल' आहे की 'कविता' असा आहे व त्याचा 'सुरेश भट' या संकेतस्थळावर गझलकार म्हणून लिहिणार्‍यांनी 'गझलेचा आशय व गझलेची शैली असलेली मांडणी असणारी रचना आहे की साध्या कवितेसारखी' असा घ्यावा असे मी स्पष्ट करायला हवे होते की काय असे वाटत आहे. गझल नाही म्हणजे लावणी, अभंग, पोवाडा, भावगीत, ओवी, आयटेम सॉन्ग, कव्वाली, लोकगीत, मुजरा यातील काहीतरी आहे असे मला म्हणायचे नाही हे बहुधा प्रस्तावात स्पष्ट झालेले नसावे. असो. आपल्या प्रतिसादातून दोन चांगले मुद्दे मात्र निघाले.

१. सुस्पष्ट रेषा आखणे अयोग्य आहे. - मला हे पटत नाही. आठवा. 'नीरज' यांच्या 'तुझेच ओठ व्हायचे तुझेच गीत गायचे' वरील चर्चेत मी त्या रचनेला कविता म्हणालो होतो व आपण विरोध केला होतात. नंतर आपणच चित्तरंजन यांच्याशी चर्चा करून मला पुन्हा प्रतिसाद देऊन सहमती दर्शवली होतीत. तसेच, त्याचवेळेस भटसाहेबांची रूपगंधा ही गझलतंत्रातील रचना 'त्यात गझलेचा भाव नाही म्हणून भटांची कविता या सदरात आहे' या माझ्या मतावरही आपण चित्तरंजन यांनी सांगीतल्यावर सहमती दर्शवली होतीत. तेव्हा सुस्पष्ट रेषा आखणे अत्यावश्यक आहे असे माझे मत!

२. भटांची गझलेची व्याख्या - अनुभवाने एखाद्या गोष्टीत जर इनअ‍ॅडिक्वसी जाणवली तर? केवळ सगळे मान्य करतात म्हणून आपणही मान्य करायचे? भटसाहेबांनी गझलेची ती व्याख्या केली तेव्हा कदाचित त्या काळातील कवींना तंत्राबाबतचीच माहिती पचायला अवघड गेली असेल. आता हजारो गझलकार झाल्यावर जर भटसाहेब असते तर त्यांनी बाराखडीच्या पुढचे काहीतरी लिहून ठेवले असते असे मला तरी वाटते. परवाच येथे एक रचना लयीहीनतेवरून विचाराधीन झाली. आपल्या व्याख्येत लयीचा उल्लेख काय आहे? 'सर्व ओळी एका वृत्तात असाव्यात' असे बाराखडीत म्हंटले आहे. वृत्तच जर मात्रावृत्त असेल तर? मग एका लयीत असाव्यात हे मत महत्वाचे ठरेल. बाराखडीतील व्याख्येत मात्रावृत्तातील लयीबाबत उल्लेख नाही. मग ती गझल येथील विश्वस्तांनी विचाराधीन केली याचा अर्थ बाराखडीबाहेरही काही गोष्टी जाणवू शकतात ना?

वैभव जोशी यांना मात्र मला स्वतंत्र प्रतिसाद द्यावा लागत आहे.

धन्यवाद!

वैभव,

आपल्या प्रतिसादातील बराचसा भाग मला 'चर्चा प्रस्ताव व्यक्तीगतरीत्या घेतल्याप्रमाणे' व डिरेल्ड वाटला. 'मोजकी उन्हे मोजक्या सरी' ही रचना गझल आहे की कविता असा हा चर्चा प्रस्ताव नाही हे कृपया लक्षात घ्यावेत अशी विनंती! त्यामुळे आपली 'केस डिफेंड करण्याची इच्छा नसणे' हा मुद्दा मला लक्षात आला नाही. प्रस्ताव विनोदी वाटणे ही आपली प्रतिक्रिया असून मी आपल्या मताचा आदर ठेवतो.

'एखाद्याने एखादा मुद्दा चर्चेला काढल्यावर त्याने स्वतः आत्तापर्यंत काय काय केले व त्यावेळेस त्याने कुठे हे नियम पाळले' अशा पद्धतीचा मूळ मुद्याशी संबंध नसलेला मुद्दा आपण महिन्याभरात दुसर्‍यांदा मांडलात. आपण ज्या भरत नाट्यमच्या मुशायर्‍यात होतात त्या मुशायर्‍यात दिग्गज मंडळी असूनही एकही गझल (आपली 'कसे व्हायचे' व चित्तची 'कृतार्थ आभास सागराचे' सोडून) आवडण्यासारखी नव्हती. (गझलकार समेवर येतो तेव्हा साडू, दीर, वहिन्या, नणंदा वगैरे लोक वाहवा म्हणतात हे आपणही जाणताच.) मग निकषांचीच चर्चा करायची असेल तर आपण कोणत्या निकषांवर तेथे उपस्थित राहिलात हे समजेल काय?

आपली तळटीप २ - मी आपली ती रचना गझल अजूनही समजत नाही.

एकंदर या प्रस्तावावर आपण फारच व्यक्तीगत प्रतिसाद दिलात त्यामुळे चर्चा पुढे गेली नाही.

वेळ दिल्याबद्दल मात्र आभार!

कविता कुठे संपते, आणि गझल कुठून सुरू होते हे सांगणारी सुस्पष्ट अशी रेषा कुठे आखलेली नाही, आणि आखणे योग्यही नाही.
१००% पटले.

मुळात कवी त्याला काय म्हणायचं होतं हे सांगू लागतो तिथूनच घसरण सुरू होते.
१००% पटले.

बेफिकीर यांचा 'भटांची गझलेची व्याख्या' हा मुद्दाही पटला.

शेवटी ही चर्चा 'गझल म्हणजे जीवनाचे सूत्र' वगैरे असल्या व्हेग वाक्याने संपू नये हीच अपेक्षा.
अनेकदा मग असे वाटते
हे होणे आवश्यक नव्हते

बेफिकीर,
एखाद्याच्या गझलतंत्रातील रचनेला सर्वांसमक्ष कविता म्हणण्यात मला मूळ कवीच्या नावामुळे काळजी किंवा भीती वाटत नाही व सूड घेतल्याचे समाधानही मिळत नाही. माझ्या मनात जे विचार आपोआप येतात ते 'अनफिल्टर्ड' पद्धतीने मांडण्याचा माझा विचार असतो.
हे आपले म्हणणे मात्र खरे आहे. याचा सर्वांनाच अनुभव आहे.
प्रस्थापित संस्कृतीवरील मिश्कील व सभ्य भाषेत मार्मिक ताशेरे मारले गेल्याचा आनंद घेता येणे
हा आपला ३रा मुद्दा बरेच लोक वापरताना दिसतात. विरह वगैरे संकल्पना आता जुन्या झाल्या. त्यामुळे तू नसलास/नसलीस तर बिघडले कुठे? वगैरे संकल्पना गझलेत याव्यात असे काहींचे म्हणणे कितपत योग्य आहे हे मला माहित नाही. ज्या मनाच्या भावना आहेत त्या यायला काहीच हरकत नसावी.

ज्ञानेश,
कविता की गझल? असा प्रश्न विचारतांना आपण नकळत कविता म्हणजे काहीतरी खालच्या पायरीवरचा, अधम प्रकार आहे असे गृहीत धरतो. एखाद्या (कथित)गझलेला "ही तर कविता आहे" अशा शब्दात हिणवले जाते, तेव्हा गंमत वाटते. कारण प्रत्येक गझल ही कविताच असते.
गझलेला कविता म्हणून हिणवले जाते - असे नाही. हिणवले जात नाही. त्या काव्याचा पोत गझलेसारखा नसतो. कारण, गझलेत दोन ओळीत विषय पूर्ण व्हावा लागतो. जर तसे वाटले नाही तर ? विषय अपूर्णपणे मांडला आहे किंवा केवळ शब्दाला शब्द जोडला आहे असे वाटले तर ती कविता आहे असे साधारणपणे म्हटले जाते. यात गझलेपेक्षा कविता हीन आहे वगैरे असा भाव नसावा.
ही चर्चा शेवटी इथल्या सुप्रसिद्ध अशा 'वडे' आणि 'भजी' वळणावरच जाईल की काय, असे वाटते !
कोण नेणार...?

वैभव,
आणखी एक प्रश्न असा की आपण जे गझल मुशायरे घडवून आणता त्यातील माझ्या-तुमच्यासकट सादर करणा-या सर्वांच्या गझल ह्या निकषांनुसार गझल असतात काय ? की फक्त सादरकर्त्यंची व रचनांची संख्या सांभाळायची असते? ह्यापुढे तरी हे निकष सांभाळले जाणार आहेत काय?
आपण म्हणता ते बरोबर आहे. परंतु, निदान मुशायरे घडवले जातात हे पहा ना..! अन्यथा आपापल्या प्रसिद्धीसाठी अहोरात्र झटणारे आणि हे काय - ते काय करीत बसणारे आहेतच की या दुनियेत.

या मुद्यावर सर्वांना एकच सांगावेसे वाटते की, चित्तरंजन यांनी गझल पोहोचावी यासाठी चांगले आणि जिवंत संकेतस्थळ सुरू केले, आम्ही इतके नाही तरी निदान मुशायरा वगैरे आयोजित करून जुन्या-नव्या गझलकारांना लोकांसमोर एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. ज्या गझल तज्ज्ञांना गझलेसाठी काही करावेसे वाटते त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आमच्यापेक्षा चांगले करावे की..! इच्छा असल्यास आम्ही आहोतच बरोबर. आम्ही मुशायरे आयोजित करतो ते गझल हा प्रकार सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी.... आणि त्याचे फळ नक्कीच पोझिटीव्ह आलेले आहे हे नक्की.

टीप : मी येथे लिहिलेले मुद्दे वैभव यांच्या रचनेशी संबंधित नाहीत. कविता की गझल यावर आहेत.
धन्यवाद..!

@बेफिकीर-
बाराखडीतल्या व्याख्येप्रमाणे असलेली, गझलेचा आकृतीबंध व्यवस्थितपणे सांभाळणारी, रदीफ, काफिया, अलामत, वृत्तादी नियम पाळणारी आणि कवीने 'गझल' म्हणून प्रकाशित केलेली कुठलीही रचना गझल समजण्यात यावी, असे मला वाटते.
पुन्हा स्पष्ट करतो, असे मला वाटते. हे असेच आहे/असावे असे काहीही मी सुचवत नाही आहे.

नीरजच्या गझलेबद्दल आणि रूपगंधा बद्दल मी तुमची मते मान्य केली, याचा अर्थ इतकाच की 'केस टू केस' विचार करून असे काही ठरवता येणे शक्य आहे. (मी वरही म्हटलेच आहे की, "मग ती रचना/ तिचा भावार्थ कवितेसारखा आहे, भावगीतासारखा आहे, अभंगासारखा आहे किंवा लावणीसारखा आहे वगैरे चर्चा झाल्यास हरकत नाही. अशा चर्चांमधून नक्कीच अनेकांना काहीतरी शिकायला मिळत असते.") मला इतकेच म्हणायचे आहे, की गझलेच्या आकृतीबंधातल्या सदर रचनेचे गझल हे 'स्टेटस' हिरावून घेतले जाऊ नये. अशा रचनेला फसलेली गझल, हजल, कवितेसारखी गझल, भावगीतासारखी गझल, गझलियत नसलेली गझल वगैरे काहीही म्हटले गेले, तरी मला काहीच हरकत नाही.
माझा मुद्दा फक्त इतकाच आहे!

आपण कविता अधम समजतो, गंमत करतो, हिणवतो हे आपण या प्रस्तावाला उद्देशून लिहीले नसावेत अशी आशा आहे.
अजिबात नाही.

'गझलेचा आशय व गझलेची शैली असलेली मांडणी असणारी रचना आहे की साध्या कवितेसारखी' असा घ्यावा असे मी स्पष्ट करायला हवे होते की काय असे वाटत आहे
हे विधान कळले नाही.

प्रत्येक गझल ही कविता असते हे सांगीतल्याबद्दल आभारी आहे.
हे विधान अनावश्यक आहे. हे मी तुम्हाला किंवा इतर कोणाला सांगत नाहीये. आधीच्या विधानाला जोडून आलेला भाग आहे तो.

भटांच्या व्याख्येबद्दल- आता हजारो गझलकार झाल्यावर जर भटसाहेब असते तर त्यांनी बाराखडीच्या पुढचे काहीतरी लिहून ठेवले असते असे मला तरी वाटते.
हो, हे शक्य आहे. गझलेचा एकंदर पैस अधिक व्यापक करणारे लेखन भटांसारख्या अधिकारी व्यक्तीच्या हातून झाले असते. पण एखाद्या संज्ञेची व्याख्या इतक्या कमी कालावधीत तरी बदलत नसावी, असा माझा अंदाज आहे.
अवांतर- समाजातले दोन-तीन टक्के लोक साक्षर असतांना लिहीली गेलेली बाराखडी (खरोखरीची, गझलेची नव्हे ! ) आज इतक्या शतकानंतरही बदललेली नाही, हे केवढे आश्चर्य आहे !

अजय जोशींच्या मुशायर्‍याच्या मताशी सहमत. अजय आणि भुषण या दोहोंनी कुठलेही अर्थकारण न आणता सुरू केलेला मुशायर्‍यांचा उपक्रम चांगलाच आहे. शिवाय या मुशायर्‍यांमधे ठराविक कवींच्या शेरांना दाद देणारे बोगस प्रेक्षकही नसतात : )

:-)

आपल्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा

ह्या चर्चाप्रस्तावावरचे प्रतिसाद जरा उशीराच वाचले. खरे तर ह्या चर्चेत पडायचा कंटाळा आला होता. पण असो. माझे मत मांडतो आहे. पटलं तर घ्या. नाही तर सोडून द्या.

आशय गझलेत मांडण्याच्या पद्धतीमुळे रसिकाला

खालीलपैकी एक गोष्ट अनुभवायला मिळावी असे माझे मत आहे.

१. "ओह... असे म्हणायचे होते होय याला?" (अनप्रेडिक्टॅबिलिटी)
२. अतिशयोक्तीमुळे 'निखळ' हसू येणे
३. प्रस्थापित संस्कृतीवरील मिश्कील व सभ्य भाषेत मार्मिक ताशेरे मारले गेल्याचा आनंद घेता येणे
४. विरोधाभासामुळे हसू येणे
५. दु:खी होणे

असे बेफिकीर ह्यांनी म्हटले आहे.माझ्यामते ह्यातले २,३,४ व ५ हे निकष दखलपात्र नाहीत. फुसके आहेत. त्यावर मी वेळ दवडणार नाही. आता पहिला निकष. अनप्रेडिक्टेबिलिटी किंवा अनपेक्षितता. माझ्यामते ह्या गोष्टीला जरा जास्तच महत्त्व दिले जात आहे. एक तर, प्रेडिक्टेबिलिटी ही गोष्ट अतिशय सापेक्ष आहे. एखाद्या बहुश्रुत रसिकाला जो शेर अतिशय प्रेडिक्टेबल वाटतो तो इतरांना अतिशय अनप्रेडिक्टेबल वाटू शकतो असा अनुभव आहे.

"ओह... असे म्हणायचे होते होय याला?" पेक्षा "मला का असे सुचले नाही?" ह्याला मी महत्त्व देईन. हे झाले नावीन्य. मग ते कल्पनानावीन्य असू शकते, लहजा नवीन असू शकते. तसेच नावीन्य प्रतिमांच्या वापरात असू शकते.

दुसरे म्हणजे अनप्रेडिक्टेबिलिटी आणण्यासाठीच आपण शेर लिहीत असतो का? एखादा उत्कट अनुभव, विशिष्ट मनस्थिती जशीच्या तशी मांडण्याचा प्रयत्नही शेरातून होऊ शकतो. माझ्यामते गझलेचा शेर अनेकदा एखाद्या फॉसिलसारखा किंवा जीवाश्मासारखा असतो. (जीवाश्म एखाद्या फुलपाखराचे असू शकते, त्यात एखादा कीटक असू शकतो किंवा अगदी डानसॉरही.) एखादे फॉसिल किंवा जीवाश्म बघितल्यावर तो काळ, म्हणजे ज्या काळातले ते फॉसिल आहे, जिवंत होतो. त्या काळाची कल्पना येते, त्या प्राण्याबद्दल माहिती मिळते. त्याप्रमाणे अनेक शेरही असतात, असू शकतात.

तिसरी गोष्ट म्हणजे शेराचा सच्चेपणा व प्रामाणिकपणा. शेरात सच्चेपणा पाहिजे. You know one when you see one. वाचून म्हणजे एखाद्या कल्पनेसाठी, भावनेसाठी अनुभवासाठी केलेली शब्दांची निवड, लहजा आणि लिहू-शकत-असून-जे-काही-लिहिलेले -नाही आहे ह्यावरून ह्या गोष्टी कळायला मदत होते असे मला वाटते.

असो. शेर कवितेचा आहे की गझलेचा ह्याची चर्चा करत बसपेक्षा प्रतिसादात "हा शेर चांगला आहे, तो शेर तेवढा चांगला नाही" असेही म्हणता येते. किंवा बेस्ट म्हणजे गप्प राहता येते.

या मुशायर्‍यांमधे ठराविक कवींच्या शेरांना दाद देणारे बोगस प्रेक्षकही नसतात.

:) :) मुशायऱ्यांमध्ये ठराविक कवींच्या शेरांना दाद देणारे बोगस प्रेक्षक नसतात हे कशावरून? [संपादित] शेवटी दुसऱ्याचे ते कार्टं! नाही का?

ज्ञानेश आणि चित्तरंजन ह्यांच्या मतांशी सहमत....बाराखडीतले नियम सांभाळणारी असेल ती गझल म्हटली जावी. आशय हा निकष तिचा दर्जा ठरवू शकेल (अर्थात हेही व्यक्तिसापेक्ष अन कालसापेक्ष आहे.), पण तिचे गझलत्व नाही ठरवू शकणार!

चित्तरंजन,

[संपादित. वैयक्तिक टिप्पणी करण्यासाठी वा गप्पा मारण्यासाठी इतर सुविधा आहेत. ]
मला वाटलेले निकष 'तसे का वाटले' याबद्दल मी काही शेर या पुढील प्रतिसादामधे देणार आहे. उर्दूचा अभ्यास कमी असल्यामुळे मला ते सगळेच शेर लगेच शब्दशः आठवणे शक्य नाही. त्यामुळे 'रिफर' करून मी ते शेर येथे देईन. बाकी माझी मते पटण्यासारखी नाहीत या मताचा संपूर्ण आदर आहे.

मधुघट,
अर्थात आपल्याही मताचा आदर आहे. मात्र मागे मनोगतवर अशाच स्वरुपाच्या चर्चेत कुणीतरी 'बाराखडीप्रमाणे असली की गझल' असे म्हंटल्यावर मी तेथेच प्रतिसादात एक रचना करून अपलोड केली होती. ती आत्ता नेमकी आठवत नसली तरी वृत्त व रदीफ आठवत आहे व त्याच स्वरुपाची रचना मी येथे देत आहे. त्या रचनेला गझल म्हणता येईल का हेही कृपया सांगावेत व 'दर्जाहीन पण निदान गझल' तरी म्हणता येईल का हेही सांगावेत अशी विनंती!

हल्ली फारच वाळत आहे अमुचा कुत्रा
अश्रू उदास ढाळत आहे अमुचा कुत्रा

जे देऊ ते खातो, चोरावर ओरडतो
घर सारे सांभाळत आहे अमुचा कुत्रा

लाथ मारतो त्राग्याने केव्हाही आम्ही
पण पायी घोटाळत आहे अमुचा कुत्रा

एक गुबगुबित मनी जराशी काय रुसावी
विरहाने भंजाळत आहे अमुचा कुत्रा

पिसाळल्यावर इतका समजुतदार निघाला
आम्हालाही टाळत आहे अमुचा कुत्रा

बेफिकीर,
परवाच येथे एक रचना लयीहीनतेवरून विचाराधीन झाली. आपल्या व्याख्येत लयीचा उल्लेख काय आहे? 'सर्व ओळी एका वृत्तात असाव्यात' असे बाराखडीत म्हंटले आहे. वृत्तच जर मात्रावृत्त असेल तर? मग एका लयीत असाव्यात हे मत महत्वाचे ठरेल. बाराखडीतील व्याख्येत मात्रावृत्तातील लयीबाबत उल्लेख नाही. मग ती गझल येथील विश्वस्तांनी विचाराधीन केली याचा अर्थ बाराखडीबाहेरही काही गोष्टी जाणवू शकतात ना?
हे आपले म्हणणे हास्यास्पद आहे.
मुळात, बाराखडीत असलेले नियम न पाळणार्‍या गझलाही विचाराधीन झालेल्या नाहीत. पूर्वी तुमची मतितार्थ सारी शायरी ही गझल 'अ' चा 'आ' झाल्याने विचाराधीन झाली होती. आता फक्त वैयक्तिक मुद्द्यांवरच गझला विचाराधीन होतात असे एकंदर परिस्थिती पाहता दिसते.
आकाशातुन तुटता तुटता तारा मजला म्हटला आहे-
अर्थ नसे मरणाला आणिक अर्थ कुठे जगण्याला आहे !’
इथे नवीन माणसाला दिलेली सवलत समजू शकतो. पण, तसा उल्लेख व्हायला हवा ना?

गझलेची बाराखडी हे संदर्भ पुस्तक आहे. ती नियमावली नाही असे माझे स्पष्ट मत आहे. अर्थात, इथे लिहिताना त्याचा(च) आधार घेतला जावा हे खरे. बाराखडीच्या पलिकडे काय आहे हा संशोधनाचा विषय आहे. मुळात, बाराखडीत कोणते '१२' विचार मांडले आहे हे अजून मला समजले नाही. माझ्यामते 'बाराखडी' हे प्रतिकात्मक नाव सुरेश भटांनी वापरले असावे. असे असेल तर ती पक्की नियमावली होऊ शकत नाही. काही प्राथमिक गोष्टी सांगणारी नक्कीच होते की किमान इतके इतके असावे. सुरेश भटांनी मराठी गझलेसाठी केलेल्या कार्यामुळे 'बाराखडी' ही नियमावली वाटू लागली. कोणती वृत्ते कशी वापरावीत याचे अनेक प्रकार आहेत.
आपण, सरसकट 'गा' चे 'लल' करतो. हे मूळ नियमात बसत नाही. यतिभंग हा आणखी एक वादाचा मुद्दा होऊ शकेल. माहित असलेली मात्रावृत्तेच मानणारे कवीही आहेत. मराठी काव्यशास्त्रात अक्षरगणवृत्ते याचा अर्थ केवळ मात्रा-लय नाही तर 'गा ल' क्रमही जसाच्या तसाच हवा. जितकी अक्षरे आणि जसा 'ल गा'क्रम वरच्या ओळीत तितकीच अक्षरे आणि तसाच 'ल गा' क्रम खालच्या ओळीत हवा. असा नियम आहे. असे आपण किती करतो ..? तरीही ती गझल अक्षरगणवृत्तात आहे असे म्हणतो. त्याचप्रमाणे "अक्षरछंद" हाही प्रकार मराठी काव्याने स्वीकारलेला आहे. (म्हणजे मात्रा न पाहता फक्त अक्षरे पाहणे.) मराठी गझल तो किती स्वीकारेल हा भाग निराळा.
असो. मी काही भाषाशास्त्राचा अभ्यासक वगैरे नाही. (खरेतर, मराठीच्या भाषा अभ्यासकांनी 'गझल' हा विषय अजूनही तसा बाजूलाच टाकला आहे. त्यामुळे, मेडिकल डॉक्टर्स, इंजिनिअर्स वगैरे गझल करताना दिसतात....::)) अर्थात, मी म्हटले तरी कोण मानणार आहे म्हणा...:) त्यामुळे थांबतो.

टीप :: चर्चा कोणी वैयक्तिक घेऊ नये. माझाही तसा हेतू नाही.
धन्यवाद..!

काही शेर!

उधर है मंजिले-मक्सूद अपनी (अंतीम ध्येय)
कि जिस जानिब कोई रस्ता न जाये

राहमे काटे बिछे होंगे कि फूल
जिसको थी ये फिक्र बैठा ही रहा

शक न कर मेरी खुश्क आखोंपर
यूं भी आसू बहाये जाते है

जौरे कमकम का शुक्रिया... बस है (हळूहळू अत्याचार करणे, वेगात किंवा खूप न करणे)
आपकी इतनी मेहरबानी भी

न होना ही मेरा, इक फल्सफा है तेरी हस्ती का (फल्सफा - फिलॉसॉफी)
तेरी हस्ती कहा, गर मेरी हस्ती, मेरी हस्ती है

तू जो मिलजाये तो तकदीर निगू होजाये (निगू - वाकेल / झुकेल)
यूं न था, मैने फकत चाहा था, यूं होजाये

मुद्दते गुजरी तेरी याद भी आई न हमे
और हम भूल गये हो तुझे ऐसा भी नही

मै घरसे तेरी तमन्ना पहनके जब निकलू
बरहना शहरमे कोई नजर न आये मुझे (बरहना - नग्न)

कसर दुष्मनीकी कोई रहगयी है
तो इक रोज तशरीफ ले आईयेगा

वो फिर वादा मिलनेका करते है.. यानी
अभी कुछ दिनो हमको जीना पडेगा

जाती है गुजर जी पर उस वक्त कयामतसी
याद आवे है जब तेरा यकबारगी आ जाना (अचानक)

तंग इतना दामने-फिक्रोअमल होता गया (कर्तव्ये, कामे)
जिंदगीभर आजकलही आजकल होता गया

उंगलियोंको तराश दू फिर भी
आदतन उसका नाम लिख्खेंगी

दुनियामे हू, दुनियाका तलबगार नही हूं (प्राप्तीची इच्छा असलेला नाही आहे)
बाजारसे गुजरा हू, खरीदार नही हूं

चटपटीत शेरही बरेच मिळू शकतात.

कैस जंगलमे अकेला है मुझे जाने दो (मजनू)
खूब गुजरेगी जो मिल बैठेंगे दीवाने दो

कासिद तेरे हडताल के कुर्बान जाईये
वो आगये है खुद मेरे खत के जवाब मे

मै और बझ्मे-मयसे यू तश्नाकाम जाऊ (तृषार्त, तहानलेला)
गर मैने की थी तौबा साकी को क्या हुवा था

तुम्हारे पयामीने सब राज खोला
खता इसमे बंदेकी सरकार क्या थी

क्या चाल ये निकाली होकर जवान तुमने
जब जब चलो हो दिल को ठोकर लगा करे है

इत्तिफाकन बेवकूफोंके कबिले मे 'जफर'
मैहि इक चालाक हूं तो क्यों न सरदारी करू

असे वाटते की जास्त लोकांमधे रुजण्यासाठी आकर्षक मांडणी आवश्यक आहे व अशा मांडणीवरून ती सीमारेषा तयार व्हावी. सच्चाई असलेले शेर वाचायची सामान्य माणसाची इच्छा कमी असेल असे वाटते. पण सच्चाई नाट्यमय किंवा आकर्षक शैलीत प्रकाशित झाली तर इच्छा जास्त होईल.

असेही वाटते की सच्चेपणा व सच्चेपणाची टक्केवारी या बाबीही सापेक्ष आहेत. एखाद्याचा शेर किंवा गझल खरेपणातून उतरलेली नाही असे कितपत म्हणता येईल शंका वाटते.

निदान मल तरी पहिल्या दोन मुशायर्‍यामधे कुणी बोगस प्रेक्षक दिसले नाही : )

ता. क. वैद्यांनी कविता लिहू नयेत असे चरक अथवा सुश्रुतात वाचल्याचे मला तरी स्मरत नाही : ) ...आमचा वाग्भट तर सिध्दहस्त कवीच होता !

गझलेतील सर्व प्रश्नाची उत्तरे गझलेच्या बाराखडीत सापड्तील आशी आशा ( नव्हे हट्ट ) करणे कितपत योग्य आहे असाही प्रश्न पडतो...

अनंत,
ता. क. वैद्यांनी कविता लिहू नयेत असे चरक अथवा सुश्रुतात वाचल्याचे मला तरी स्मरत नाही : ) ...आमचा वाग्भट तर सिध्दहस्त कवीच होता !
तुमचे म्हणणे बरोबर आहे. मला असे म्हणावयाचे आहे की आपण भाषाशास्त्राची पदवी न घेताही हे काम करीत आहोत. खरेतर आपण त्यांचेच काम करीत आहोत. भाषातज्ज्ञ फक्त व्याकरण आणि र्‍हस्वदीर्घ म्हणजे भाषा एवढेच करताना दिसतात. गझल या विषयात हवे तितके कुणीही अजून शिरले नाही. कारण, लिहिणार कोण? .... आणि तपासणार कोण... हा प्रश्न उद्भवत असावा...:)
असो. मूळ विषय आहे गझल की कविता. तो भाषेच्या अभ्यासकांना किती सोडवता येईल याबाबत मलातरी शंकाच आहे.

या चर्चेत 'गझलेच्या बाराखडीची परिपूर्णता' व 'गझल सहयोगच्या मुशायर्‍यांमधील जेन्युइनिटी आणि दर्जा' हे मुद्दे खरे तर कसे काय आले असेच वाटत आहे.

अवांतर - चला, निदान कुणी असे तरी (जाहीररीत्या) म्हणाले नाही की गझलकारही बोगस असतात व आयोजकही!

अनंत ढवळे यांच्या शेवटच्या दोन्ही प्रतिसादांशी सहमत आहे. पण 'कविता व गझल' यातील फरकाबद्दलही त्यांनी त्यांचे मत मांडावे अशी विनंती! तसेच, त्यांनी मुशायर्‍याबाबत प्रेमाने जाहीर केलेल्या भावनांनी, खोटे कशाला सांगू, मूठभर मांस निश्चीतच चढले.

अवांतर - 'भेटलेली माणसे' हा मुशायरा माझे माजी-सहकारी मित्र (साधारण २५ ते ४०) जे अजूनही किर्लोस्कर ऑईल इंजिन-बेअरिंग डिव्हिजन खडकी येथे कामाला आहेत त्यांच्यासाठी होणार होता. ज्यायोगे नवीन व कवितेशी अजिबात फारसा संबंध नसलेले श्रोते / रसिक मिळणार होते.

मूळ चर्चाप्रस्तावावर मुद्देसूद प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल ज्ञानेश, चित्त, मधुघट व ऋत्विक यांचे आभार!

एकंदरीत अधिक लोकांना असे वाटत असावे की अशी सीमारेषा नसावी व तंत्राच्या फ्रेमवर्कबाहेर विचार करण्याची गरज नाही. या इनपुट्स सह पुढे जाऊ.

चर्चा अजूनही ओपनच आहे, कुणीही मते नोंदवावीत, अभ्यासासाठी उपयोग होईल.

धन्यवाद!