चर्चाप्रस्ताव - अनुकरण की प्रभाव की उत्स्फुर्तता?

सुरेश भट

चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला

काय तो वेडा इथेही बोलला?
हा शहाणाही चळाया लागला

ओठ ओठांना सतावू लागले
श्वास गालाला छळाया लागला

हालते भिंतीवरी छाया तुझी
दीप हा कैसा जळाया लागला

मी खरे बोलून जेव्हा पाहिले
हा टळाया... तो पळाया लागला

हाक दाराने मला जेव्हा दिली
उंबरा मागे वळाया लागला

तोच मी होतो गडे हा तोच मी
जो तुला आता कळाया लागला

इलाही जमादार -

तोल किरणांचा ढळाया लागला
सूर्य आता मावळाया लागला

दाह विरहाचा छळाया लागला
देह आत्म्याचा जळाया लागला

सूर मुरलीचा घुमाया लागला
तोल राधेचा ढळाया लागला

वेदनांचे पाट वाहू लागता
अर्थ स्वप्नांचा कळाया लागला

ऐकुनी किस्से पतंगाचे जुने
दीप आशेने जळाया लागला

खंजिरावरच्या ठशांना पाहुनी
हात दोस्तांचा कळाया लागला

कोणते सत्कार्य मी केले असे?
हा टळाया तो पळाया लागला

स्पर्श हा कैसा तुझा आहे फुला
श्वास माझा बघ जळाया लागला

कोणत्या होत्या खुणा वाटेवरी?
पाय माझा अडखळाया लागला

भेट शेवटची 'इलाही' आपुली
भैरवीचा स्वर ढळाया लागला

प्रदीप निफाडकर -

आसवांना मी छळाया लागलो
हुंदके सारे गिळाया लागलो

वर्तमानाने पुन्हा झिडकारले
भूतकाळाला कळाया लागलो

ही सुखाची सावली येता पुढे
वेदनेला आवळाया लागलो

चांदणे यावे तुझ्याही अंगणी
याचसाठी मावळाया लागलो

फूल आहे कोणते या अंतरी
आसमंती दर्वळाया लागलो

ओळ मी लिहिली अशी की शेवटी
मीच माझ्यावर जळाया लागलो

डॉ. भगवान कौठेकर -

अभाळी चंद्र हा आता ढळाया लागला आहे
तुझा अंदाज येण्याचा कळाया लागला आहे

कशाला बोलली होती मला खोटेच तेव्हा तू
जरा हा थेंब अश्रूंचा गळाया लागला आहे

उरी या वेदना माझ्या मला आल्यात माराया
उगी हा हुंदका आता गिळाया लागला आहे

मनाने सोडला आहे मुक्याने धीर हा सारा
तुझा संकेत हा तोही छळाया लागला आहे

रिकामा बैसलो आहे कशी मी वाट पाहूनी
उभा हा देह माझा का जळाया लागला आहे

डॉ. भगवान कौठेकर -

आज वाटा छळु लागल्या
आसवांना कळू लागल्या

काय हातातल्या माझिया
दैवरेखा पळू लागल्या

छेडताना जरा सूर हा
ओळी ओळी गळू लागल्या (यांचा तांत्रिक बाबींवर जरा रागच असावा)

हाक देतो भरोशात मी
मोह माया ढळू लागल्या

जोडली मी जरी माणसे
त्वाच दोस्ती टळू लागल्या

दीपक करंदीकर -

कसे ओठांवरी गाणे रुळाया लागले आहे?
तुझा झाल्यावरी सारे कळाया लागले आहे

उभा मी एकटा होतो तिथे आलीस तू जेव्हा
मनाचे मौन माझ्याही ढळाया लागले आहे

कशी मी पावलांमागे तुझ्या ही पावले टाकू
तुझे पाऊल माघारी वळाया लागले आहे

कशाला मी निराशेचा दिवा लावून ठेवावा?
पुन्हा काळीज आशेने जळाया लागले आहे

गडे येना, पुन्हा बोलू, पुन्हा काढू जुन्या गोष्टी
पुन्हा आयुष्य एकाकी छळाया लागले आहे

कुणी या चांदण्यारात्री स्वरांची पाजली मदिरा?
शहाणे गीत हे माझे चळाया लागले आहे

आशा पांडे -

टाळती का लोक मजला हे कळाया लागले
शब्द माझे बाण झाले ते पळाया लागले

घाव माझ्या अंतरीचे मी न त्यांना दाविले
काय त्यांचे आज अश्रू ओघळाया लागले

देह कोमेजून गेला, संपला नाही लढा
सोसणे पाहून माझे ते जळाया लागले

शक्य नाही जीत माझी पेलणे लोकांस या
ते पहा, आता मुठींना आवळाया लागले

कोणते मी नाव घेऊ? गाव माझे कोणते?
विश्व हे माझेच आहे ते कळाया लागले

विद्यानंद हडके यांची नुकतीच प्रकाशित झालेली गझल - (मराठी गझल या स्थळावर)

सारे वसंत मजला छळू लागले
ऐकेक पान माझे गळू लागले

कोठेच रंग नाही मनासारखा
दु:खात सौख्य आहे कळू लागले

सांगा कुणी मला मी कसा सावरु
आधारस्तम्भ सारे ढळू लागले

आता नवीन कोठे मरण राहिले
आयुष्य रोज येथे दळू लागले

हासून जीवनाशी जरा बोलता
ईर्शेत लोक सारे जळू लागले

हाका कुणास देऊ अता शेवटी
सारेच ऐनवेळी पळू लागले

इलाही जमादार -

तोल कळीचा ढळू लागला
गुंजारव दरवळू लागला

पुन्हा एकदा आली किरणे
कोलाहल सळसळू लागला

चिरंजीव ही फुले तरी पण
रंग तयांचा मळू लागला

आठवणींचा सूर्य कसा हा
हळूहळू मावळू लागला

दिवे गूढ अन पतंग कोडे
कोण कुणास्तव जळू लागला

अर्थ तुझ्या कवितांचा उशीरा
मला 'इलाही' कळू लागला

हे भटांच्या मूळ गझलेचे काही प्रमाणात अनुकरण आहे असे वाटते का? की प्रभाव आहे असे वाटते? (मीटर बदलणे हे एक मिनिट बाजूला ठेवा.) (मला यात प्रभाव वाटतो.)

'केव्हातरी पहाटे' अन 'एवढे तरी करून जा' यांच्याही बाबतीत अशी उदाहरणे आहेत.

माझ्या व्यक्तीगत मतानुसार थांबून अनुकरणे करण्यापेक्षा किंवा प्रभावित होण्यापेक्षा न थांबून चार अर्थहीन गझला अन एखादी एकुणपन्नासकशी गझल करणे बरे! :-))

धन्यवाद!

गझलचर्चा: 

प्रतिसाद

माझे मत थोडे वेगळे आहे. ते केवळ गझल लेखनालाच नाही तर कलेशी निगडित मानता येईल.

एखादी कथा/ कविता/ गझल हा कोणताही प्रकार आवडला तर त्याचे अनुकरण करणे गैर नाही. त्याच जमिनीवर गझल करणे ही तर मान्यताप्राप्त गोष्ट आहे.

सुरुवातीला तंत्राकरता, शिकण्याकरता आणि त्या व्यक्तीच्या लेखनाच्या/ कलाकृतीच्या प्रभावामुळे असे अनुकरण होणे मला नैसर्गि़क वाटते.

कोणत्याही कलाप्रांतात नाव घेतले जाईल, अनुकरण करावे असे अनेकांना वाटेल अशा व्यक्ती दरवर्षी जन्म घेत नाहीत हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. गायनामध्ये घराणी आहेत. त्यांची वैशिष्ट्ये आहेत. याला अनुकरण म्हणत नाहीत. पण जेव्हा एखादा गायक त्याची स्वतःची भर त्या घराण्यात घालू शकत नाही, स्वतःचे वैशिष्ट्य निर्माण करण्यास असमर्थ ठरतो तेव्हा त्याच्या यशाला मर्यादा येतात. लेखनाला तेच लागू असावे असे वाटते.

पण प्रत्येक कलाकाराला/ व्यक्तीला/ लेखकाला/ शायराला केव्हाही आपली कलाकृती आपली वाटावी असेच मनापासून वाटणे हेही तेवढेच नैसर्गिक आहे. निदान मला तरी तसेच वाटते. (सध्या मात्रावृत्तात गडबडलेली गझल म्हणजे सोनालीची:० असे जरी समीकरण असले तरी मला ते मान्य आहे, अभिमानाचे वाटते कारण मी माझी अशी 'ओळख ' निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे. )

खरा प्रश्न केव्हा पडावा जेव्हा एखादा कलाकार / लेखक जन्मभर / कायम कुणाच्यातरी प्रभावाखालीच लिहितांना / निर्मिती करतांना दिसतो तेव्हा . त्या व्यक्तीच्या मतांचे, त्याच्या जाणिवांचे, सभोवताच्या घटनांचे प्रतिबिंब जर कधीच दिसत नसेल तर तुमचे अनुकरणप्रिय गझला छापण्यापे़क्षा चुकीच्या /सामान्य अनेक रचना आणि एक खणखणीत रचना करण्याचे विधान योग्य आहे असे मी मानते.

प्रभाव्,उत्स्फूर्तता ही तेव्हा म्हणावी...जेव्हा एखादा शेर......अर्थाने,किंवा सध्या प्रचलित शब्द......अथवा मतला...इत्यादि मध्ये आधीच्या एखाद्या अथवा समकालीन रचनेशी साम्य दाखवितो.......( शेर टकराना..असे ज्याला म्हटले जाते.....परंतु पूर्ण गझल एखाद्या आधिच्या गझलेशी साम्य दखवते.....तेव्हा त्यास निश्चितच अनुकरण असेच म्हणावे लागेल......आणी अनुकरण जसेच्या तसे असणे यास कितपत नवनिर्मिति म्हाणावे हे ज्येष्ठांनीच ठरवावे असे वाटते.

डॉ.कैलास गायकवाड.

प्रथम,
कैलास,
अनुकरण जसेच्या तसे असणे यास कितपत नवनिर्मिति म्हाणावे हे ज्येष्ठांनीच ठरवावे असे वाटते.
मी ज्येष्ठ/कनिष्ठ मानीत नाही. ते वयामुळे/अनुभवामुळे आपोआप होते. मी लहान/मोठा असेही कोणालाही मानीत नाही. फक्त प्रसिद्ध/अप्रसिद्ध असे मी मानतो. प्रसिद्ध असलेल्या व्यक्तिला ज्येष्ठ किंवा मोठा असे म्हणू नये असे मला वाटते. त्यामुळे आपण केवळ ज्येष्ठांचा(आपल्या मतानुसार) विचार न घेता सर्वांचा घ्यावा.

सोनाली,
आपल्या मतात परस्परभिन्नता आहे.
एखादी कथा/ कविता/ गझल हा कोणताही प्रकार आवडला तर त्याचे अनुकरण करणे गैर नाही. त्याच जमिनीवर गझल करणे ही तर मान्यताप्राप्त गोष्ट आहे.
जर ही मान्यताप्राप्त गोष्ट असेल तर...
खरा प्रश्न केव्हा पडावा जेव्हा एखादा कलाकार / लेखक जन्मभर / कायम कुणाच्यातरी प्रभावाखालीच लिहितांना / निर्मिती करतांना दिसतो तेव्हा .
हा प्रश्न तरी कशाला पडावा?
कोणी एक जन्मभर एखाद्याच्या प्रभावाखाली निर्मिती करताना दिसत असेल तर बिघडले कुठे? संत ज्ञानेश्वर म्हणतात मी निवृत्तीनाथांचा, संत जनाबाई म्हणते मी नामदेवांची, अ‍ॅरिस्टॉटल म्हणत असेल मी प्लेटोचा, जैमिनी म्हणतात मी व्यासांचा, मधुच्छंद म्हणतात मी विश्वामित्रांचा, पं. भीमसेन जोशी किराणा घराण्याचे, पं. भास्करबुवा बखले ग्वाल्हेर घराण्याचे, असे कितीतरी दाखले आहेत की ज्यांनी फार मोठी निर्मिती केलेली आहे आणि आम्ही कोणाचेतरी आहोत हे सांगताना त्यांना कमीपणा वाटत नाही.
तेन त्वम् असि | (त्याच्यामुळे तू आहेस) या औपनिषदिक सल्ल्यामुळे निर्मितीनंतरही नम्रता राहते.
हे सर्व मी लिहिले ते आपण 'निर्मिती' हा शब्द वापरल्यामुळे.
निर्मिती आणि नक्कल यात फरक आहे. कोणाच्यातरी प्रभावाखाली किंवा मार्गदर्शनाखाली निर्मिती करणे गैर नाही. मात्र तशीच नक्कल करून स्वतःच्या नावावर खपविणे हा अपराधच मानला पाहिजे.

बेफिकीर,
उपरोक्त गझलांबाबत आपण आपले स्पष्ट मत दिलेले नाहीत. ते द्यावे.

अजय अनंत जोशी,
आपण ''ज्येष्ठ'' बाब्त जे म्हणालात ते एकदम मान्य.......परंतु ''अनुकरण जसेच्या तसे असणे यास कितपत नवनिर्मिति म्हाणावे'' याबाबत भाष्य करणे आपण टाळले आहे.........मात्र ''निर्मिती आणि नक्कल यात फरक आहे. कोणाच्यातरी प्रभावाखाली किंवा मार्गदर्शनाखाली निर्मिती करणे गैर नाही. मात्र तशीच नक्कल करून स्वतःच्या नावावर खपविणे हा अपराधच मानला पाहिजे'' हे आपले स्पष्ट मत आवडले.

डॉ.कैलास

सर्वांना धन्यवाद!

१. सोनाली - आपण खूप चांगले मतप्रदर्शन केले आहेत असे माझे मत! तसेच, मात्रावृत्तात गडबडलेली गझल म्हणजे आपली असे मला मुळीच् वाटत नाही. आपल्या गझला वेगळ्या, उगाचच स्त्रीवादी नसलेल्या, फ्रेश व चांगल्या असतात. त्यात काही ना काही नावीन्य असते. माझे म्हणणे असे आहे की आपली गझल जर भटांसारखी वाटत असेल तर जाणीवपुर्वक ती एकतर प्रकाशित करू तरी नये किंवा ती उत्स्फुर्त आहे हे त्या गझलेमधून जाणवायला हवे. चार दिवसांपुर्वी मी तीन शेर रचून एक गझल बंद केली. खालीलप्रमाणे:

वसते मनात नाते, मन वापरून जाते
तेव्हा रुसायचीही इच्छा मरून जाते

या जीवनात येतो टप्पा कधी असाही
खोटे हसायचीही इच्छा मरून जाते

घेतात माणसे ते डोक्यावरी परंतू
माझे विधान माझ्या डोक्यावरून जाते

ही गझल बंद करण्याचे कारण मला लक्षात आले की 'हा वापरून गेला, तो वापरून गेला, जो भेटला मला तो वांधा करून गेला' या गझलेच्या जमीनीसारखी आहे. (भटसाहेबांचे नेमके शब्द कदाचित मी लिहिताना चुकले असतील.)

तरही गझल ही आमंत्रिक केली जायची. आज आपण 'यांच्या यांच्या जमीनीवर मी गझल करत आहे' असे म्हणतो. पुर्वी शायरांचे कौशल्य तपासून स्पर्धा घडवण्यासाठी तसे व्हायचे असे मला वाटते.

२. अजय - नक्कल हा अपराध आहे खराच! पण मला वरील गझला या नक्कला वाटत नाहीत. मला फक्त त्यात रुळलेली जमीन वापरणे वाटते. आशय प्रत्येकाचा वेगळा आहे. पण रुळलेली जमीन वापरणे हा सततच्या वाचनाचा किंवा संपर्काचा प्रभाव असू शकतो.

३, कैलास - नवनिर्मीती हा शब्द मात्र फार आवडला. एक्झॅटली मला तेच म्हणायचे होते. अशी गझल नवनिर्मीती वाटणे जरा अवघड आहे.

सर्वांचे धन्यवाद!

चर्चेचा विषय चांगला आहे. माझे मत

१) वरील सर्व रचना वाचूनही त्यातल्या त्यात भटांचीच गझल जास्त भिडली.

२) यमके , अंत्ययमके तीच येणे ह्यात काही गैर वाटत नाही. रोजच काही सुचत असेल तर रोज नवीन कुठून आणणार ? वृत्त पण तेच येऊ लागल्यावर शंकेला सुरुवात होते असे माझे मत. किंवा मग मूळ गझल आठवू लागते असे म्हणू या. त्यानंतर वाचक डोळ्यांत दोन तीन थेंब अधिक तेल घालून वाचू लागला तर आश्चर्य नाही.

३) त्यानंतरच मग दोन रचनांमधील विचार किती सारखे/वेगळे आहेत ह्याचा शोध घेतला जाऊ लागता तिथे जर साम्य सापडले तर अनुकरण केल्याची टीका होते , नाही सापडले तर कुणाला खटकत नाही. असे वाटते.

४) कुणाच्याही रचना (किंवा लेख) वाचून एखाद्या कलेकडे / उपप्रकाराकडे , प्रेरित झालेल्यांच्या (ह्यात सगळेच आले ) रचनेत काही अंशी हा प्रभाव दिसणारच

५) आपण लिहीतो ते कुणाचेच अनुकरण नाही असे बहुतेक सर्वांनाच वाटत असते. म्हणूनच ते इतक्या छातीठोकपणे मांडले जात असावे. (अपवाद वगळता) . ह्यात थांबून वा न थांबता लिहीणारे सारेच आले.

६) साठते डोळ्यांत पाणी कारणावाचून का?
मामला नाजूक आहे कारणे मागू नका

ही माझी पाच एक वर्षापुर्वीची रचना . त्यातली पहिली ओळ मला जशीच्या तशी भटांच्या "आकाश गंगा" मधल्या ओळीत सापडली. ती मी आकाशगंगा वाचण्याआधी जरी लिहीलेली ओळ होती तरीही अस्वस्थता आलीच. बरेचदा आपण आपल्याला सुचलेल्या एखाद्या ओळीवर , शेरावर अत्यंत खुश होतो आणि पाठोपाठ कुणीतरी एखाद्या तशाच ओळीची आठवण करून देते किंवा आपल्यालाच आठवते.

" मी कितीजणांशी हसून बोलत आहे
मी स्वतःस नक्की कुणांत शोधत आहे

मी रुजलो , फुललो , सुकलो , तुटलोसुध्दा
जग अजून माझे मूळ विचारत आहे "

ही सध्या पडून असलेली रचना . कारण ही लिहील्यानंतर मला चित्तची " मी मिटून डोळे" चे वजन , लय सर्व काही आठवले. पुढे लिहाविशी नाही वाटली. ही ओळ जर तेव्हा आठवली नसती तर मी न थांबता पुढे लिहून टाकली असती. आणि किती का कशी असेना का वा अर्थहीन असेना का माझी आहे असे म्हणता आले असते. त्याने काय साध्य झाले असते? त्याने ह्या दोन्ही ओळीत जे काही थोडेबहुत साम्य आहे ते कमी जास्त झाले असते का?

उद्या कदाचित मला ह्या गोष्टीचे काही वाटणार नाही. आणखी काही लोक भेटतील , कशाला, स्वतः चित्त सुध्दा म्हणेल की "काही नाही रे. छान आहे . लिही पुढे." आणि कदाचित लिहीले जाईल. किंवा मीच त्यातील वेगळेपण इतकं मोठं शोधून काढेन की साम्य असल्यास किमान मला तरी खुपणार नाही. ( समजा लिहीलं तर काय बिघडलं इतका बेरडपणा येण्याची शक्यताही आहेच )

माझे ह्यावर अनुभवाने तयार झालेले मत असे आहे की ...

आपल्याला स्वतःला जर जाणवले की अनावधानाने का होईना एखाद्या चांगल्या रचनेचा प्रभाव आहे आणि त्याची बोच (सध्यातरी ) आहे तर लिहू नये (हे सापेक्ष आहे).

जर पूर्ण रचना लिहून झाल्यानंतर जाणवले किंवा कुणी निदर्शनास आणून दिले तर अजिबात लाज वाटून घेऊ नये .

बेफिकिर ह्यांना आज स्वतःच्या ज्या रचना (अर्थहीन /एकुणपन्नासकशी कुठल्याही) कुणाचे अनुकरण वा प्रभाव वाटत नाहीत त्या रचना , ते विचार , तशाच वृत्तामधे , तशाच यमकांसहित .. दूर कुठेतरी लातूर , नंदुरबार मधे प्रकाशित झालेल्या असू शकतात. तो काव्यसंग्रह (दुर्दैवाने/सुदैवाने) कधी समोर आलाच आणि त्यातील प्रत्येक रचनेचा रचनाकाल आपण लिहीण्याआधीचा आहे असा प्रामाणिक कौल त्यांच्या मनाने दिलाच ..... तर?

बेफिकीर,
पण मला वरील गझला या नक्कला वाटत नाहीत. मला फक्त त्यात रुळलेली जमीन वापरणे वाटते.
हे जर इतके सहज होते तर त्यासाठी इतका आटापिटा कशाला?
तसेच,
आशय प्रत्येकाचा वेगळा आहे. पण रुळलेली जमीन वापरणे हा सततच्या वाचनाचा किंवा संपर्काचा प्रभाव असू शकतो.
हेच जर आपले म्हणणे होते तर...
(मीटर बदलणे हे एक मिनिट बाजूला ठेवा.) (मला यात प्रभाव वाटतो.)
माझ्या व्यक्तीगत मतानुसार थांबून अनुकरणे करण्यापेक्षा किंवा प्रभावित होण्यापेक्षा न थांबून चार अर्थहीन गझला अन एखादी एकुणपन्नासकशी गझल करणे बरे! :-))
हे कशाला लिहिले होतेत?
नक्कल हा अपराध आहे खराच! पण मला वरील गझला या नक्कला वाटत नाहीत.

मी कुठे म्हटले आहे की वरील सर्व गझला या निव्वळ नक्कल आहे म्हणून....? :(
पण मला थोडी शंका आहे...

सुरेश भट

चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला

हालते भिंतीवरी छाया तुझी
दीप हा कैसा जळाया लागला

मी खरे बोलून जेव्हा पाहिले
हा टळाया... तो पळाया लागला

इलाही जमादार -

तोल किरणांचा ढळाया लागला
सूर्य आता मावळाया लागला

ऐकुनी किस्से पतंगाचे जुने
दीप आशेने जळाया लागला

कोणते सत्कार्य मी केले असे?
हा टळाया तो पळाया लागला

ठळक केलेल्या ओळी पहाव्यात. (यात वैयक्तिक असे काहीही नाही. विषय आहे म्हणून लिहिले.)