कुणाकुणाला मार हवा

सांगितले मी कुणातरी की शब्दाला आकार हवा
कुण्या कवीने म्हटले मजला 'कुणाकुणाला मार हवा?'

'मीही आहे तयार' म्हटले, 'पण थोडेसे थांबा ना..'
विष काढण्याआधी जरासा नागाचा फुत्कार हवा

तिने पहावे, तिने म्हणावे किती काम सांगशी तिला?
तीच अता कंटाळुन म्हणते, 'बसण्यासाठी पार हवा'

चोरुन घेती शब्द कुणाचे अन खाऊनी जाती भाव
सलाम यांना करण्यासाठी निश्चित वेडा ठार हवा

दुर्मुखला चेहरा घेऊनी प्रेमाचे गुणगान करी
टाळ्या पडण्या यांना लाखों रसिक तसाच टुकार हवा

टेकडीवरी कुठल्या झाले प्रसन्न यांना देव म्हणे
अरे खुळ्यांनो, प्रसन्न होण्या पर्वतही मंदार हवा

ध्यान लावुनी गुरू पहुडले हवेत काही फुटांवरी
टेकू लावुन चेले म्हणती गुरूसही आधार हवा

(इतरत्र प्रकाशित)

गझल: 

प्रतिसाद

सांगितले मी कुणातरी की शब्दाला आकार हवा
कुण्या कवीने म्हटले मजला 'कुणाकुणाला मार हवा?'

'मीही आहे तयार' म्हटले, 'पण थोडेसे थांबा ना..'
विष काढण्याआधी जरासा नागाचा फुत्कार हवा

छानच!

तिने पहावे, तिने म्हणावे किती काम सांगशी तिला?
तीच अता कंटाळुन म्हणते, 'बसण्यासाठी पार हवा'

हाहाहा!! 'बसण्यासाठी पार हवा!'

मस्त झालीये हझल!

अरे? ही हझल आली की पुन्हा!

सलाम यांना करण्यासाठी निश्चित वेडा ठार हवा - हा हा!

(आज संध्याकाळी म.सा.प. मधे जाणारात का? काही सलाम घेणारे येणार आहेत म्हणे.)

ध्यान लावुनी गुरू पहुडले हवेत काही फुटांवरी
टेकू लावुन चेले म्हणती गुरूसही आधार हवा

हा हा!

एकंदर हझल भलतीच जोमदार!

धन्यवाद ऋत्विक, बेफिकीर.
एकूण ७ पैकी तुम्हा दोघांना ५ बरे वाटले हे पाहून मलाही बरे वाटले.

मुद्दाम कोणाला डोळ्यासमोर ठेवून ही हझल रचलेली नाही. डोळ्यासमोर ठेवायचे झाल्यास तसे प्रत्येकालाच ठेवता येईल (माझ्यासकट).

पुन्हा एकदा प्रतिसाद दिलेल्या आणि न दिलेल्या सर्वांना धन्यवाद.