गझल आणि सुबोधता - आग्रह की दुराग्रह

गझला लिहिण्याचा प्रयत्न सुरू केल्यापासून ह्या विषयावर बराच काळ विचार केल्यावर मला पडलेले काही प्रश्न नि माझे विचार खाली मांडतोय. त्यावर इतर गझलकारांची तथा वाचकांची मतं जाणून घ्यायला आवडेल.

   1. सुबोधता हा गुण आहे हे निश्चित. परंतु सुबोधतेचा अतिरेकी अट्टाहास हा क्वचित अन्य काव्यगुणांना मारक ठरत नाही का?
   2. दुर्बोधतेसाठी दुर्बोधता असू नये हे निर्विवाद आहे. पण साऱ्या भाव-भावना, सारे अनुभव सरल व सुगम असतात का? अनेकदा जे सांगायचं असतं ते धूसर, शब्दांच्या चिमटीत निटसं पकडता न येण्यासारखं असतं. मानवी मनाची स्पंदनं, त्याचे खेळ, त्याचे मनोव्यापार, माणसांच्या कृतींचा कार्यकारणभाव हे सर्व खरचं २+२=४ इतकं सरळ, सोपं व ढोबळ असतं? मग शेरांतील त्यांची शब्दचित्रंही तशीच किंचित अंधूक, अस्पष्ट, वेगवेगळ्या छटा असणारी उमटायला नकोत का? ती जर आपण काटेकोर, सुस्पष्ट, कृष्णधवल चितारली तर ती आकर्षक दिसली तरी गाभा हरवून बसलेली वाटतील.
   3. इतर कविता वाचताना आपण त्यात येणारी प्रतीकं स्वीकारतो. प्रथमदर्शनी अर्थबोध झाला नाही तर त्यावर विचार करतो, चिंतन करतो व अर्थ लावतो. हाच न्याय, हीच मोजपट्टी गझलेला का लावू नये ? गझल हीसुद्धा कविताच असते ना? किंबहुना कुठलीही गझल म्हणजे किमान पाच कविता (पाच शेर). मग गझलेच्या बाबतीतच ती पहिल्या वाचनात कळलीच पाहिजे हा आग्रह का? इतर कवितांप्रमाणे शेर तीन-चारदा वाचूनही सुजाण वाचकाला कळला नाही तर तो फसला असं खुशाल समजावं. पण तो वाचताना आपल्याला डोकं अजिबात वापरायला लागू नये ही भूमिका निदान मला तरी पटत नाही.
   4. Allusions/संदर्भ : गझलेत राजकीय / सामाजिक/ ऐतिहासिक/ पौराणिक allusions (माफ करा, पटकन मराठी प्रतिशब्द आठवत नाही आहे.) व संदर्भ वापरले आणि ते वाचकांनी उचलले, त्यांना समजले तर लेखकाला होणारा आनंद अवर्णनीय असतो. निदान मला तरी होतो. तुमचं मत काय आहे?
   5. गझल लिहिणाऱ्यांनी आपल्या वाचकांना प्रौढ आणि बुद्धिमान का समजू नये? दरवेळी वाचणारा बालबुद्धी आहे असा समज करून घेऊन आपल्या शेरात जे सांगायचे आहे ते ह्तोडा मारल्यासारखं त्याच्या डोक्यात मारायलाच हवं का? Is there no room for subtlety in a ghazal?

गझलचर्चा: 

प्रतिसाद

हे प्रश्न प्रत्येक नव्या गझलकाराला पडतात.
यांचे निराकारण होणे गरजेचे आहे.
आणखी  एक मुद्दा - "'लोकांना' कळतील अशा" कविता आणि गझला लिहील्यामुळे काव्य हा प्रकार एकूणच सवंग होत चालला आहे का? लोकांचे मराठी तितके चांगले नाही आणि  लोकांना अवघड कल्पना समजू शकणार नाहीत असा पूर्वग्रह कविंनीच बाळगला तर कविता आणि व्यवहार यांच्यातला फरक कसा टिकेल?- याकडेही नजर टाकली पाहिजे. नाहीतर, केवळ यमके जुळतात ते काव्य अशी वेळ येण्यास वेळ लागणार नाही.
 मराठी कवितेस अगोदरच वाळवी लागली आहे. तिचा दर्जा कायम राखण्याचा प्रयत्न करायचा की प्रवाहपतीत होवून लोंढ्याबरोबर वहात जावे हे कविंनी एकदाचे ठरवले पाहिजे. 
नाहीतर - "वरं ढगाला लागली कळं"  हे  "पाऊस कधीचा पडतो" पेक्षा उत्तम काव्य आहे असे मान्य करणे भाग पडेल! 

खरे तर असे प्रश्न पडण्याची काही गरजच नाही. गझल ही खरे तर मुळात एक कविता असतेच. आणि प्रत्येक कविता जन्म घेताना स्वतःचा एक आकार घेऊनच जन्माला येते. कविवर्य श्री. मंगेश पाडगावकरांच्या शब्दात सांगायचे तर-
केवढे भाग्य की कविता थांबली न कुबड्यांसाठी
जाणते ओढ शब्दांची  ही  पाउसओली  माती.

तेव्हा लिहा, लिहीत रहा. जसं सुचेल तसं, स्फुरेल तसं लिहीत रहा. आकाराची चिंता करू नका. फार फार पूर्वीच पु लं नी आपल्याला 'जो जे वांछील तो ते लीहो' असा मुक्त परवाना दिला आहे. तेव्हा उगीच नसती चिंता करू नका. तू चाल रं पुढं तुला रं गड्या भीती कुणाची, पर्वा बी कुणाची

विन्९८मुळे नव्याने लिहिला आहे. कृपया पुन्हा वाचावा.

विसूनाना, "हे प्रश्न प्रत्येक नव्या गझलकाराला पडतात" हे तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण "यांचे निराकारण होणे गरजेचे आहे" ही गोष्ट मला पटत नाही. कवितेच्या दर्जाचा तिच्या सुबोधतेशी किंवा दुर्बोधतेशी काहीच संबंध नाही. प्रत्येक गझल ही कविता असतेच. त्यामुळे तिलाही हाच नियम लागू आहे. त्या कवितेतून होणारे जीवनदर्शन किती यथातथ्य आहे ही कवितेच्या यशाची एकमेव मोजपट्टी आहे. मुळात जीवनाचे सर्वसामान्य लोकांचे आकलन ज्या दर्जाचे असते त्याच दर्जाचे त्यांचे कवितेचे आकलन असणार. या प्रश्नांना याहून वेगळे उत्तर नाही.

माझी मते --

१) कोणताही शेर हा शक्यतो सुबोध असावा. वाचणार्‍याला किंवा ऐकणार्‍याला तो समजावा, त्याला "भिडावा", त्याला त्याची अनुभूती यावी.  उगाच दुर्बोध लेखन करण्यात धन्यता मानण्यासारखे काही नाही. जो शेर, जी कविता वा गझल रसिकाला समजत नाही, ती कलाकृती म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे होत. ग्रेसाळलेल्या भाषेला गझलेत तरी किंमत नाही. काही लोक त्याला सौंदर्यलक्षी शब्दकळा वगैरे म्हणाले तरी.
२)सारे अनुभव सुगम नसतात हे खरे म्हणून प्रतिकांचा वापर अपरिहार्य ठरतो. किमान अनुभावाच्या जवळ जाता येतं.
३) सहमत
४)सहमत
५) सर्वसामान्यांची अनभिज्ञता हे कारण आहे. वाचक किंवा श्रोता निर्बुध्द असतो असे नाही. पण जो पारंगत नाही त्यालाही आस्वाद घेता यावा, या भूमिकेतून लिहिणे जास्त लोकाभिमुख आहे असे वाटते.
 ---अगस्ती

सर्वसामान्यतः अगस्ती यांच्या भूमिकेवर सहमती होऊ शकेल. पण ही भूमिका कितपत अवलंबता येईल यावर मला शन्का आहे. शेवटी शक्यतो सुबोध यातला शक्यतो हा कवीच्या शक्यतेवरच सोडावा लागणार.
सर्वसामान्यांची अनभिज्ञता हे कारण आहे. वाचक किंवा श्रोता निर्बुध्द असतो असे नाही. पण जो पारंगत नाही त्यालाही आस्वाद घेता यावा, या भूमिकेतून लिहिणे जास्त लोकाभिमुख आहे असे वाटते.
ही भूमिकाही लोकशाहीवादी आहे हे खरे. पण कवितेला लोकशाहीच्या दावणीला बांधणे तरी कितपत योग्य आहे? कवीने कविता लिहावी आणि 'इदं न मम' म्हणून रसिकांच्या हवाली करावी हेच बरे.

सोपेपणा  व सपकपणा ह्यात अंतर आहे  .सुबोध म्हणजे सपक नाही.
गझल सपक नसावी.

माझे मत!

प्रश्न १ ते ५ - साधारण एकाच मुद्यावर असल्यासारखे वाटले. -

सुबोधता, दुर्बोधता वगैरे काहीही ठरवून कसे आणता येईल? कवीला जे सुचते ते सुचते! ते सुबोध आहे की दुर्बोध हा विचार वाचकांनी / रसिकांनी करत बसावा. कवीने कशाला करायचा? प्रकाशित करायचे की नाही इतकाच विचार कवीने करावा असे माझे मत!

बरेच 'महिन्यांपुर्वी' मी एक शेर केला होता.

रचावा खंड रक्ताने, बनावी आजची गीता
मिशा हुंगायला सरसावती प्रत्येक पानाशी

याचा अर्थ कृपया फणसेंनी सांगावा. मला हे असेच सुचले. (आणि अक्षरशः असेच सुचले.) हा शेरच नाही आहे म्हणणार्‍यांचे आधीच आभार!

(मला अभिप्रेत अर्थ! आपण आपल्या अनुभवांना रक्त आटवून कवितेत गुंफल्यावर जरी त्या खंडकाव्याला आजच्या युगाच्या गीतेसारखी मान्यता मिळाली तरीही काही किडे असतात जे त्या पुस्तकाच्या पानांना रक्ताचा वास आल्यामुळे आपल्या मिशा घेऊन ती पाने हुंगू लागतात)

प्रश्न क्रमांक ४ -

गझलेत राजकीय / सामाजिक/ ऐतिहासिक/ पौराणिक allusions (माफ करा, पटकन मराठी प्रतिशब्द आठवत नाही आहे.) व संदर्भ वापरले आणि ते वाचकांनी उचलले, त्यांना समजले तर लेखकाला होणारा आनंद अवर्णनीय असतो. निदान मला तरी होतो. तुमचं मत काय आहे?

मला ते संदर्भ वाचकाला आवडले तर आनंद होतो. नुसतेच समजले तर नाही होत.

अवांतर - सदानंद डबीरांनी लिहिलेले मत फणसे यांनी विचारलेच नाही आहे असे जाणवते. तरी स्वतंत्ररीत्या मत मान्य आहे.

-'बेफिकीर'!

अगस्ती आ णि सदानंद डबीर यांच्या मताशी एकदम सहमत..

डॉ.कैलास